Satara: आम्हालाही जगायचंय, स्वच्छ हवा-पाणी हवं; केसुर्डी ग्रामस्थांचे प्रशासनाला साकडे
By नितीन काळेल | Published: January 25, 2024 06:02 PM2024-01-25T18:02:01+5:302024-01-25T18:04:10+5:30
प्रदूषण करणाऱ्या कंपन्यांवर कारवाईसाठी अर्धनग्न मोर्चा
सातारा : शासनाने आमच्या जमिनी काढून घेतल्या आणि तेथे कंपन्या आणल्या. आम्हाला जगायचंय, स्वच्छ पाणी आणि हवा पाहिजे. जमिनीत केमिकल नको. तुम्हाला वाटत असेल आम्ही जगायला नको, तर मरायलाही तयार आहे. यासाठी तुम्ही बघायला यावं, असे साकडे प्रशासनाला घालत केसुर्डी ग्रामस्थांनी प्रदूषण करणाऱ्या एमआयडीसीतील कंपन्यावर कारवाईची मागणी केली. यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर अर्धनग्न मोर्चा काढला.
खंडाळा तालुक्यातील केसुर्डी एमआयडीसीतील इलजीन ग्लोबल इंडिया आणि ओरिएंटल इस्ट या कंपन्यांमधील रसायनयुक्त दुर्गंधीमुळे शेती, पशुधनासह मानवी आरोग्यास हानी पोहोचत आहे. या कंपन्यांवर प्रदूषण नियंत्रण मंडळाने कारवाई करावी, अशी मागणी स्थानिक ग्रामस्थांकडून करण्यात आलेली आहे. तरीही प्रशासनाकडून कोणतीच पावले उचलली गेली नाहीत. त्यामुळे ग्रामस्थांच्यावतीने गुरुवारी केसुर्डी ते जिल्हाधिकारी कार्यालय असा अर्धनग्न मोर्चा काढण्यात आला. यामध्ये मोठ्या संख्येने ग्रामस्थ सहभागी झाले होते.
कंपन्यांमधून बाहेर टाकण्यात येणारी रसायनयुक्त राख व केमिकलची योग्य पद्धतीने विल्हेवाट लावली जात नाही. मागील अनेक वर्षांपासून हजारो टन राख खड्डे काढून त्यात गाडण्यात येत आहे. तसेच रासायनिक द्रवेही याच खड्ड्यांमध्ये सोडण्यात येत आहेत. हे घटक जमिनीत मिसळत आहेत, त्याचा अंश भूगर्भात जात आहे. या कंपन्यांतून निघालेल्या टाकाऊ रासायनिक द्रव्याची अवैधरित्या विल्हेवाट लावण्यात येत आहे. त्यामुळे केसुर्डी परिसरात मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरत आहे. त्यातील रासायनिक घटक जमिनी व जलसाठ्यांमध्ये आढळून येत आहेत.
मानवी आरोग्यासही ते घातक ठरत आहेत. या कंपन्यांकडून शासनाच्या प्रदूषणाबाबतच्या निकषांची पायमल्ली केली जात आहे. याबाबत प्रदूषण नियामक मंडळाकडे वारंवार तक्रार देऊनही संबंधितांकडून दुर्लक्ष होत आहे. याबाबत योग्य कारवाई करण्यात यावी, अशी मागणी केसुर्डी ग्रामस्थांनी केली. तसेच जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार घोषणाबाजीही केली.