‘सातारा-खटाव’मध्ये ‘खजुराहो’ची कलाकृती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 3, 2018 11:56 PM2018-07-03T23:56:29+5:302018-07-03T23:56:32+5:30

Khajuraho's artwork in 'Satara-Khatav' | ‘सातारा-खटाव’मध्ये ‘खजुराहो’ची कलाकृती

‘सातारा-खटाव’मध्ये ‘खजुराहो’ची कलाकृती

googlenewsNext


सातारा : मध्यप्रदेशातील खजुराहो येथील मंदिरे कामशिल्पासाठी प्रसिद्ध आहेत. अशाच प्रकारची तीन मंदिरे सातारा जिल्ह्यातील गुरसाळे, परळी आणि कारखटाव येथे आजही आपले अस्तित्व टिकवून उभी आहेत. सर्वसमावेशक भारतीय तत्वज्ञानाची मूक साक्षीदार असलेली ही मंदिरे आपल्या समृद्ध कलेइतिहासाचा वारसा असून, यांच्या संवर्धनाची गरज निर्माण झाली आहे.
आज जगभरात असलेल्या प्राचीन वास्तूंकडे पर्यटनाचे साधन तसेच कलेइतिहासाचा वारसा म्हणून पाहिलं जातं. महाराष्ट्रात तर हा ठेवा खेडोपाडी विखुरलेला आहे. त्यास सातारा देखील अपवाद नाही. सातारा जिल्ह्यातही अनेक प्राचीन मंदिरे, किल्ले, गड अशा अनेक ऐतिहासिक वास्तू आजही आपले अस्तित्व
टिकवून उभ्या आहेत. मध्यप्रदेशातील खजुराहो येथील हजारो वर्षे जुनी असलेली मंदिरे कामशिल्पासाठी प्रसिद्ध आहेत.
खटाव तालुक्यात गुरसाळे येथील रामेश्वराचे मंदिर, कातरखटाव येथील कात्रेश्वराचे मंदिर व सातारा तालुक्यातील परळी येथील केदारेश्वराचे मंदिरही अशाच प्रकारच्या शिल्पांसाठी प्रसिद्ध आहे.या मंदिरांवर कोरलेल्या कामशिल्पांमुळेच ही मंदिरे महाराष्ट्रातील खजुराहो म्हणून अल्प परिचित आहेत. मंदिरावर कामशिल्पे का असावीत, याबाबत संशोधकांचे वेगवेगळे मतप्रवाह आहेत. परंतु ही मंदिरे तांत्रिक उपासना सांप्रदायाच्या प्रभाव असणाऱ्या काळात उभारली गेली, यावर बहुतांश संशोधकांचे एकमत आहे. मद्य, मांस, मस्य, मुद्रा व मैथुनी या पाच गोष्टींना मिळून पंचमकार अशी संज्ञा तयार होते. याच गोष्टीचे वा उपासनामार्गाचे शिल्पांकन साताºयातील या तीन मंदिरांवर केलेले आढळते.
जिल्ह्याला या मंदिरांच्या रुपाने ऐतिहासिक वारला लाभला आहे. अनेक दशकांपासून उभी असलेली ही मंदिरे साताºयातील खजुराहो म्हणून ओळखली जातात. सध्या काही मंदिरांची दुरवस्था झाली आहे. हा ऐतिहासिक वारसा जतन करण्यासाठी पुरातत्व विभागाच्या वतीने ठोस पावले उचलावीत, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.
गुरसाळेतील पुष्करणी वैशिष्ट्यपूर्ण
गुरसाळे येथील रामेश्वर मंदिराचे छत मोठ्या दगडी शिळांचे बनलेले आहे. बाजूच्या भिंती आतून बाहेरून सपाट आहेत तर दर्शनी बाजू अलंकृत आहेत. मंदिराच्या बाहेरील दर्शनी बाजू पाने, फुले, वेगवेगळ्या भौमितिक रचनाच्या थरांनी सजवलेल्या आहेत. यातीलच सर्वात वरच्या थरात कामशिल्पांचे चित्रांकन केले आहे. या शिल्पात युगूल शिल्पे, मैथून शिल्पे, वेगवेगळ्या कामक्रीडांचे चित्रण असलेली शिल्पे आहेत. या मंदिराच्या प्रांगणात असणारी पु्ष्करणी हे आणखी एक वैशिष्ट्य. पुष्करणी किंवा बारव म्हणजे चौकोनी आकाराचा उतरत्या पायºयांची रचना केलेले कुंड.
कात्रेश्वरातील कन्नड शिलालेख
कातरखटाव येथील कात्रेश्वराची रचना देखील गुरसाळ्याच्या रामेश्वर मंदिरासारखीच आहे. फक्त याच्या समोरील पुष्करणी थोडी बाजूला आहे. कात्रेश्वराच्या मंदिराची व पुष्करणीची सध्याची अवस्था अतिशय बिकट आहे. मंदिराच्या दर्शनी भागातील शिल्पपटाचेदेखील नुकसान झाले आहे. या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे इथे असणारा कन्नड शिलालेख. तो देखील भग्न आहे. हजार एक वर्षांच्या इतिहासाच्या मूक साक्षीदार असणाºया विरगळी, नंद, भग्न मूर्ती मंदिर परिसरात उघड्यावर विखरून पडल्या आहेत.
परळीतील शिल्पे सुस्थितीत
सज्जनगडाच्या पायथ्याशी वसलेल्या परळी गावात असलेल्या केदारनाथ मंदिराची रचनाही रामेश्वर मंदिराप्रमाणेच असावी. मंदिराच्या छतास मोठमोठ्या शिळा वापरल्या आहेत. परंतु त्यांचाच भारामुळे खालच्या दगडी तुळ्या भंगल्या आहेत. त्याच्या आधारासाठी जागोजागी बाजूच्या भग्न मंदिराचे खांब वापरले आहेत. मुख्य प्रवेशद्वाराच्या बाजूला बाह्यांगावर असणारे नक्षीकाम, कामशिल्पे इतर मंदिरापेक्षा सुस्थितीत आहे.

Web Title: Khajuraho's artwork in 'Satara-Khatav'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.