खाकीचा वाढदिवस आॅनड्युटी

By admin | Published: August 31, 2014 12:16 AM2014-08-31T00:16:19+5:302014-08-31T00:20:41+5:30

अधीक्षकांच्या निर्णयावर रजा अवलंबून : ‘पोलिसांना सुटी’ घोषणा पूर्वीचीच; अंमलबजावणी वाऱ्यावरच

Khakee's birthday is induction | खाकीचा वाढदिवस आॅनड्युटी

खाकीचा वाढदिवस आॅनड्युटी

Next

सातारा : पोलिसांना स्वत:चा वाढदिवस आणि लग्नाच्या वाढदिवसाला सुटी मिळेल, असे गृहमंत्र्यांनी चार वर्षांपूर्वीच जाहीर केले होते. तेव्हापासून सुट्या मिळत होत्या. परंतु गेल्या दोन वर्षांपूर्वी अशा प्रकारच्या सुट्या मिळण्यामध्ये खंड पडला. त्यामुळे आता या नव्या घोषणेमुळे पोलिसांच्या आशा पुन्हा एकदा पल्लवीत झाल्या आहेत.
पोलिसांना चोवीस तास ड्युटी केल्यानंतर आपल्या कुटुंबाला वेळ देता येत नाही. दिवाळी, गणेशोत्सव, रक्षाबंधन, रमजान ईद यासारख्या सणाला पोलिसांना बंदोबस्तासाठी तैनात केले जाते. त्यामुळे असे सण कुटुंबासमवेत साजरे करणे पोलिसांच्या नशिबात नसते. समाजाच्या सुरक्षिततेसाठी पोलीस अहोरात्र ड्युटी करत असतात. त्यामुळे साहजिकच अतिरिक्त कामाचा तणाव पोलिसांवर असतो. या सर्व बाबी लक्षात घेऊन गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी चार वर्षांपूर्वी पोलिसांच्या वाढदिवसाला आणि त्यांच्या लग्नाच्या वाढदिवसाला हक्काची सुटी मिळणार, अशी घोषणा केली होती. या घोषणेनंतर काही ठिकाणी या आदेशाचे काटेकोर पालन करण्यात आले. मात्र, सातारा जिल्हा पोलीस दलात सुद्धा अशा सुट्या मिळण्याचा खंड पडला.
तत्कालीन पोलीस अधीक्षक के. एम. एम. प्रसन्ना यांच्या कालावधीमध्ये वाढदिवसाच्या सुट्या बंद करण्यात आल्या होत्या. त्यामुळे अनेक अधिकारी आणि कर्मचारी या हक्काच्या सुटीपासून वंचित राहिले होते. मात्र, गृहमंत्र्यांनी सुटीची योजना पुन्हा एकदा महाराष्ट्र पोलीस दलात राबविण्याचा निर्णय घेतला. यापार्श्वभूमीवर ‘लोकमत’ने काही पोलिसांना बोलते केले. यावेळी नाव न सांगण्याच्या अटीवर काही पोलिसांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
पोलिसांच्या हक्काच्या सुट्या खरंतर सगळ्यांना मिळाल्याच पाहिजेत.
आपण एखाद्या सणाला घरात नसलो, तर आपली काय स्थिती होते, हे खासगी काम करणाऱ्या नागरिकांना ठावूक असेल. पर्यायी व्यवस्था करून पोलिसांना सणासुदीला सुटी मिळाली पाहिजे, असे मतही एका कर्मचाऱ्याने व्यक्त केले.
बऱ्याचदा सुटीसंदर्भात वरिष्ठांकडून आदेश होत असतात; परंतु त्याचे पालन आमच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी केले पाहिजे. काही वर्षांपूर्वी वाढदिवसाला सुटी मिळत होती. परंतु गेल्या दोन वर्षांपासून अशा वाढदिवसाच्या सुट्या बंद झाल्या होत्या. आता पुन्हा एकदा आमच्या भावनेला साद घालणाऱ्या सुट्या मिळणार असल्याने आम्हाला फार आनंदच आहे. मात्र, हा निर्णय कायमस्वरूपी आणि सर्वसमावेशक असावा, अशी अपेक्षा अनेक पोलीस कर्मचाऱ्यांनी व्यक्त केली. (प्रतिनिधी)
कुटुंब आम्हाला गृहित धरत नाही...
कुठल्याच सणासुदीला अथवा एखाद्याच्या मयतीलाही आम्ही पोहोचणे, असे आम्हाला आमची कुटुंबे गृहित धरत नाहीत. बेभरवशाचे आमचे काम आहे. हे घरातल्यांना माहिती आहे. त्यामुळे आम्हाला वाढदिवसाला सुटी मिळाली नाही तरी त्याचं फारसं दुख: होत नाही, असे एका अधिकाऱ्याचे म्हणणे आहे.
पत्नी नव्हे... आई चिडली
एक कर्मचारी सांगत होता. ‘माझ्या लग्नाचा वाढदिवस होता. त्याच दिवशी मला बंदोबस्त होता. पत्नीला फोन करून त्याची कल्पना दिली. तिने माझी नोकरी मान्य केली आहे. त्यामुळे तिला हे माहिती होतं; परंतु माझ्या आईला हे पटलं नाही. काहीही करून साहेबाला सांग आणि घरी ये, असा आईचा हट्ट होता; पण मला जाता आले नाही. दुसऱ्या दिवशी घरी गेलो तर आई प्रचंड चिडली होती. पण, काय करणार, नोकरी करायची म्हटल्यानंतर असंच चालणार, असं भावनाविवश होऊन एका कर्मचाऱ्याने स्वत:ला आलेला अनुभव कथन केला.

Web Title: Khakee's birthday is induction

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.