‘लोकमत’च्या भूमिकेला ‘खाकी’चे पाठबळ!

By admin | Published: June 3, 2015 10:42 PM2015-06-03T22:42:11+5:302015-06-04T00:01:30+5:30

पोलीस अधीक्षकांचा निर्णय : जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांच्या माध्यमातून डॉल्बीबंदीसाठी बैठका घेणार---आव्वाज गावाचा... ..नाय डॉल्बीचा !

Khakee's support for Lokmat's role! | ‘लोकमत’च्या भूमिकेला ‘खाकी’चे पाठबळ!

‘लोकमत’च्या भूमिकेला ‘खाकी’चे पाठबळ!

Next

सातारा : लहानगी मुले, गर्भवती महिला आणि वयोवृद्धांवर दुष्परिणाम करणाऱ्या आणि कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्यास कारणीभूत ठरणाऱ्या डॉल्बीला जास्तीत जास्त गावांनी दूर ठेवावे, या ‘लोकमत’च्या भूमिकेला पोलिसांचे पाठबळ मिळाले आहे. जिल्ह्यातील सर्व ठाण्यांच्या माध्यमातून या मोहिमेत पोलीस सक्रिय सहभागी होणार आहेत. उत्सव, लग्नसमारंभ आणि अन्य कार्यक्रमात डॉल्बीचे अवास्तव वाढलेले स्तोम अनेक गैरप्रकारांना आमंत्रित करते आणि बहुसंख्य लोकांना डॉल्बीचा त्रासच होतो, असे पाहावयास मिळाल्यानंतर ‘लोकमत’ने यावर्षी डॉल्बीबंदीची हाक दिली. या मोहिमेचा श्रीगणेशा ग्रामीण भागात केल्याबरोबर अनेक गावांनी डॉल्बीबंदीची घोषणा केली, तर अनेक गावांनी तसा निर्णय घेण्यासाठी ग्रामसभांचे आयोजन नजीकच्या काळात केले आहे. मोहिमेच्या यशस्वी वाटचालीचा पुढचा टप्पा सुरू झाला असून, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी ‘लोकमत’ची भूमिका उचलून धरली आहे. इतकेच नव्हे, तर पोलीस दलाच्या माध्यमातून या मोहिमेत सक्रिय सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे. सर्व पोलीस ठाण्यांना मोहिमेत सहभागी करून घेतले जात आहे, असे अधीक्षकांनी सांगितले. डॉल्बीचे अनेक दुष्परिणाम असले, तरी कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न हे डॉल्बीचे प्रमुख अपत्य असल्यामुळे पोलीस यंत्रणेवर अनावश्यक ताण येतो. तो टाळण्यासाठी तसेच डॉल्बीचे अन्य दुष्परिणाम प्रबोधनाच्या माध्यमातून दूर करण्यासाठी पोलिसांनी या मोहिमेत सक्रिय सहभाग घ्यावा, अशी विनंती अधीक्षकांकडे करण्यात आली. डॉ. देशमुख यांनी ही मोहीम अत्यंत उपयुक्त आणि योग्य वेळी उचललेले पाऊल असल्याचे सांगून ‘लोकमत’च्या भूमिकेचे कौतुक केले. जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांना अधीक्षकांकडून संदेश पाठविण्यात येत असून, त्या-त्या पोलीस ठाण्यांच्या अखत्यारीतील गावांमधून डॉल्बी हद्दपार करण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत. (प्रतिनिधी) असा असेल पोलिसांचा सहभाग पोलीस अधीक्षकांकडून जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांना याविषयी संदेश रवाना करण्यात येत आहेत. प्रत्येक पोलीस ठाण्याच्या अखत्यारीत येणाऱ्या गावांमधील मंडळांच्या बैठका गणेशोत्सवाच्या दीड महिना आधीच बोलावल्या जातील. कार्यकर्ते आणि ग्रामस्थांना डॉल्बीच्या दुष्परिणामांविषयी माहिती देऊन डॉल्बीला फाटा देण्याची विनंती करण्यात येईल. या बैठकीस ‘लोकमत’चे प्रतिनिधीही उपस्थित असतील. या माध्यमातून जास्तीत जास्त गावांकडून उत्स्फूर्तपणे डॉल्बीबंदी केली जावी, असा प्रयत्न असेल. गणेशोत्सवापूर्वी जास्तीत जास्त गावांनी मोहिमेत सहभागी व्हावे, अशी अपेक्षा आहे. ‘लोकमत’ने योग्य वेळी योग्य विषयावर प्रबोधनात्मक मोहीम सुरू केली आहे. डॉल्बीचे गंभीर दुष्परिणाम विचारात घेता यासंदर्भात नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण होणे गरजेचेच आहे. या मोहिमेत पोलीस दलाचा सक्रिय सहभाग राहील. ग्रामस्थांकडून सकारात्मक भूमिकेची अपेक्षा आम्ही ठेवली आहे. - डॉ. अभिनव देशमुख, पोलीस अधीक्षक, सातारा आमदारांच्या बोपेगावचा डॉल्बीला ‘गुडबाय’ कवठे : माजी खासदार लक्ष्मणराव पाटील, आमदार मकरंद पाटील तसेच जिल्हा बँकेचे संचालक नितीन पाटील यांच्या बोपेगावाने (ता. वाई) डॉल्बीमुक्तीचा निर्धार करून ‘लोकमत’च्या अभियानास पाठिंबा दिला आहे. या अभियानाची सुरुवात वाई तालुक्यातील कवठे गावातून पाच महिन्यांपूर्वी, सहा जानेवारीच्या ग्रामसभेत डॉल्बीबंदीचा निर्णय घेऊन झाली होती. ही बातमी ‘लोकमत’ने प्रसिद्ध केल्यानंतर या अभियानाची मुहूर्तमेढ रोवली गेली. बोपेगावच्या निर्णयाचे सर्वत्र उत्स्फूर्त स्वागत होत आहे. डॉल्बीच्या दुष्परिणामांची जाणीव झाल्याने आणि त्यातून वाढत असलेल्या व्यसनाधीनतेचा त्रास इतरांना सहन करावा लागत होता. वयोवृद्ध लोक, आजारी लोक, गर्भवती महिला यांची पर्वा न करता डॉल्बीच्या भिंती रचल्या जात असल्याने दुष्परिणामांची जाणीव सर्वांनाच झाली. वरातीच्या नावाखाली होणाऱ्या नाहक खर्चाला आळा घालण्याच्या उद्देशाने याबाबत बैठक घेण्यात आली आणि संपूर्ण गावाने एकमुखाने डॉल्बीबंदीच्या ठरावास पाठिंबा दिला. बैठकीस सरपंच गीता शिंदे, उपसरपंच नितीन पाटील, महादेव जाधव, अरविंद जाधव, निवास जाधव, मारुती जाधव, नितीन जाधव, बबन चव्हाण, विठ्ठल शिंदे, नारायण शिंदे यांच्यासह ग्रामस्थ, महिला आणि विविध मंडळांचे युवक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. (वार्ताहर)

Web Title: Khakee's support for Lokmat's role!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.