‘खाकी’लाही झाले अश्रू अनावर !
By admin | Published: August 2, 2015 12:09 AM2015-08-02T00:09:39+5:302015-08-02T00:11:17+5:30
पालक गहिवरले : प्रशिक्षणाला जाताना महिला पोलिसांची मने हेलावली; निरोप देण्यासाठी कुटुंबीयांची एकच गर्दी
सातारा : पोलीस म्हटलं की निगरगट्ट आणि कणखर असं व्यक्तिमत्त्व आपल्या डोळ्यांसमोर उभं राहतं; मात्र बाहेरहून त्यांचं व्यक्तिमत्त्व असं दिसत असलं तरी आतून ही लोकं खूप हळवी असतात. मग तिथे पुरुष असो, की महिला पोलीस. हे सांगण्याचं तात्पर्य म्हणजे पोलीस दलात नव्याने भरती झालेल्या महिला पोलिसांच्या तीन तुकड्या प्रशिक्षणासाठी शनिवारी नागपूरला रवाना झाल्या. त्यावेळी पोलीस ठाण्यासमोर झालेले भावूक वातावरण आणि सर्वच प्रशिक्षणार्थींना अश्रू अनावर झाले होते. हे दृष्य पाहून त्यांना सोडण्यास आलेल्या पालकांनाही गहिवरून आले.
काही महिन्यांपूर्वी जिल्हा पोलीस दलात भरती झालेल्या महिला पोलिसांना दोन महिन्यांच्या प्रशिक्षणासाठी नागपूर येथे नेण्यात येत होते. शनिवारी दुपारी पोलीस मुख्यालयासमोर तीन एसटी बसेस उभ्या करण्यात आल्या होत्या. सहलीला जाणाऱ्या मुलांना आपले पालक जसे सोडायला येतात. तशाच प्रकारे या महिला प्रशिक्षणार्थींचे कुटुंबीय त्यांना सोडण्यासाठी आले होते. जसजसी निघण्याची वेळ होत होती, तसतसे महिला पोलिसांचे अश्रू अनावर होऊ लागले. त्यामुळे त्यांच्या कुटुंबातील सदस्यांनाही राहावलं नाही. त्यांनाही गहिवरून आलं. एसटीतील वातावरण एखाद्या दु:खद घटनेत रूपांतरित झाल्यासारखी परिस्थिती झाली होती.
महिला पोलीस हमसून हमसून रडत होत्या. एसटीने हळूहळू वेग घेतल्यानंतर खिडकीतून हात बाहेर काढून आपल्या आप्तस्वकीयांना त्या निरोप देत होत्या. मध्येच एसटी थांबल्यानंतर पाठीमागून त्यांचे कुटुंबीय धावत होते. पुन्हा एसटीजवळ जाऊन हातात हात घेऊन त्यांना धीर देत होते. हे दृष्य पाहून तेथे उपस्थित असणाऱ्या नागरिकांचीही मने हेलावली. भावूक वातावरण झाल्यामुळे सगळ्यांनाच अश्रू अनावर झाले होते.
आपल्या कुटुंबाला सोडून पहिल्यांदाच एकटे बाहेर जात असल्यामुळे या महिला पोलिसांचे आपले अश्रू अनावर झाले. रडून-रडून अक्षरश: त्यांचे डोळे लाल झाले होते. वर्दीतीतील पोलीसही इतका हळवा असतो, याची प्रचिती यानिमित्ताने उपस्थितांना आली.
पोलीस दलात भरती झाल्यानंतर नवखा माणूस हा सर्वसामान्य माणसाप्रमाणेच हळवा असतो; परंतु एखादा का पोलीस दलाची खडान्खडा माहिती मिळाल्यानंतर तोच पोलीस मुरब्बी पोलीस म्हणून समाजात वावरतो. मात्र, ती वेळ येण्यासाठी नवख्या पोलिसांना बऱ्याच खस्ता खाव्या लागतात. तेथे उपस्थित असलेल्या काही जुन्या पोलिसांना महिला पोलिसांनी अश्रू ढाळल्यामुळे नवल वाटलं. मात्र, या पोलिसांनीही त्यांना धीर देऊन पुढील प्रशिक्षणासाठी शुभेच्छा दिल्या.