‘खाकी’च्या मागे आता बदलीचा भुंगा !

By admin | Published: May 23, 2017 11:30 PM2017-05-23T23:30:10+5:302017-05-23T23:30:10+5:30

‘खाकी’च्या मागे आता बदलीचा भुंगा !

'Khaki' behind the weevil! | ‘खाकी’च्या मागे आता बदलीचा भुंगा !

‘खाकी’च्या मागे आता बदलीचा भुंगा !

Next


लोकमत न्यूज नेटवर्क+
कऱ्हाड : पोलिस चोवीस तास ड्यूटीवर असतात; पण या चोवीस तासांच्या ड्यूटीपेक्षा सध्या शेकडो पोलिसांना नव्या ‘टेन्शन’ने घेरलंय. पोलिस ठाण्यात पाच वर्ष पूर्ण झालेल्या कर्मचाऱ्यांच्या बदल्या येत्या काही दिवसांत होतायत. याच आठवड्यात त्यातील पहिला टप्पाही पार पडतोय. त्यामुळे बदली कुठे होणार, असा प्रश्न पोलिसांना सतावतोय.
जिल्हा पोलिस दलातील कर्मचाऱ्यांच्या बदलीचे ‘गॅझेट’ याच आठवड्यात होणार आहे. त्याची तयारीही अंतिम टप्प्यात आली आहे. या गॅझेटनुसार शेकडो पोलिस कर्मचाऱ्यांना त्यांचे सध्याचं पोलिस स्टेशन सोडून दुसऱ्या पोलिस स्टेशनमध्ये जावं लागणार आहे. या बदल्या जिल्ह्यांतर्गत असल्या तरी पोलिस कर्मचाऱ्याला त्याच्या कुटुंबाचंही स्थलांतर करावं लागतं. त्यामुळे पोलिसांचे दैनंदिन जीवन काही दिवसांसाठी विस्कळीत होते. दरवर्षी अशाच पद्धतीने पोलिस कर्मचाऱ्यांच्या बदल्या होत असतात. एका पोलिस ठाण्यातील कर्मचारी दुसऱ्या ठिकाणी नेमण्यात येतात. तर तेथील कर्मचाऱ्याला तिसऱ्याच ठाण्यात कर्तव्यावर जावे लागते.
वास्तविक, पोलिस ज्याठिकाणी कार्यरत असतो त्याचठिकाणी त्याचे कुटुंब वास्तव्यास असते. कुटुंबाच्या सोयीसाठी संबंधित पोलिसाला सारासार विचार करावा लागतो. मुलांचे शिक्षण, दैनंदिन खरेदी, पाण्याची सोय, वातावरण याचा विचार करूनच पोलिसांना भाडेतत्त्वावर खोली घ्यावे लागते. त्याठिकाणी कुटुंबाला स्थिरस्थावर करावे लागते. मुलांना योग्य शिक्षण मिळावे, यासाठी शाळांमध्ये हेलपाटे घालून दाखला घ्यावा लागतो. हे करीत असतानाही पोलिसांना अनंत अडचणींचा सामना करावा लागतो. एवढे करून पोलिस व त्याचे कुटुंबीय संबंधित ठिकाणी स्थिर होत असताना बदलीचा भुंगा पोलिसांच्या मागे लागतो. रूळावर आलेलं दैनंदिन जीवन विस्कळीत करून पोलिसाला दुसरं शहर गाठावं लागतं.
सध्या यावर्षीच्या बदल्यांचे गॅझेट काही दिवसांवर येऊन ठेपले आहे. त्यामुळे अनेक पोलिसांचा जीव टांगणीला लागला आहे. कुटुंबाला स्थलांतरीत करावे लागणार असल्याने काहींनी पॅकिंग करण्यासही सुरुवात केली आहे. कुठे ना कुठे बदली होणार, हे माहीत असल्याने कर्मचाऱ्यांनी तशी मानसिकताही केली आहे. मात्र, बदलीच्या विचाराने कुटुंबीयांची झोप उडाल्याचे दिसते. सध्या साताऱ्यासह महत्त्वाच्या पोलिस ठाण्यांतील कर्मचाऱ्यांच्या बदल्या पहिल्या टप्प्यात होण्याची शक्यता आहे. मात्र, सर्वच ठाण्यांतील कर्मचाऱ्यांच्या बदल्या एकाचवेळी केल्या जाण्याची शक्यता व्यक्त करीत आहेत.
विशेष पथकातील
पोलिसही गॅसवर
जिल्ह्यातील वेगवेगळ्या पोलिस ठाण्यांसह विशेष पथकातील काही पोलिसांचीही यावर्षी बदली होणार आहे. जिल्हा पोलिस दलात मुख्यालय, कंट्रोल रूम, स्थानिक गुन्हे शाखा, बीडीडीएस, जिल्हा विशेष शाखा, वाहतूक शाखा, एमटीएस, वायरलेस, वुमेन सेल, दहशतवाद विरोधी, पोलिस वेलफेअर, सीसीटीएनएस अशी विशेष पथके आहेत.
अधिकाऱ्यांची तीन वर्षांनी बदली
पोलिस कॉन्स्टेबल, पोलिस नाईक, हवालदार, सहायक फौजदार या पद्धतीने कर्मचाऱ्यांची पदे असतात. या कर्मचाऱ्यांची बदली दर पाच वर्षांनी होते. तर फौजदार, सहायक पोलिस निरीक्षक व पोलिस निरीक्षक या पदावरील अधिकाऱ्यांच्या बदल्या दर तीन वर्षांनी केल्या जातात.
गावाजवळ जावं
हीच इच्छा
ऐच्छिक बदलीच्या अर्जात अनेक पोलिस कर्मचाऱ्यांनी त्याच्या मूळ गावानजीकचे पोलिस ठाणे सुचविले आहे. मात्र, पोलिस कर्मचारी ज्या गावातील आहे त्याच गावात शक्यतो त्याची बदली केली जात नाही.
पोलिस अधीक्षकांनी परवानगी दिली तरच कर्मचाऱ्याला त्याच्या तालुक्यात बदली मिळते, असे कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे.
सध्या आपल्या गावाजवळचं पोलिस स्टेशन मिळावं, अशीच अनेक कर्मचाऱ्यांची मनोमन इच्छा आहे.

Web Title: 'Khaki' behind the weevil!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.