राजेंच्या संघर्षात ‘खाकी’ तणावाखाली!

By admin | Published: February 22, 2017 10:53 PM2017-02-22T22:53:01+5:302017-02-22T22:53:01+5:30

निकालाची उत्कंठा शिगेला : तालुक्यात बाजीगर कोण, दोन्ही राजेंची प्रतिष्ठा पणाला... कार्यकर्ते खेळणार गुलालाची होळी....!

'Khaki' under stress of Raje's struggle! | राजेंच्या संघर्षात ‘खाकी’ तणावाखाली!

राजेंच्या संघर्षात ‘खाकी’ तणावाखाली!

Next



सातारा : जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या राजकारणात दोन्ही राजेंमुळे धुमसत राहिलेल्या जावळी खोऱ्यातील घडामोडींमुळे खाकी तणावाखाली आली आहे. सातारा तालुक्यात मनोमिलन इतिहासजमा झाले असल्याने जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीच्या निमित्ताने खासदार उदयनराजे भोसले व आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. तालुक्यातील बहुतांश गट व गणांचे निकाल धक्कादायक लागण्याची शक्यता असल्याने सर्वांची उत्कंठा शिगेला पोहोचली आहे.
पाटखळ गटातून पंचायत समितीच्या माजी सभापती वनिता गोरे यांना राष्ट्रवादीने उमेदवारी दिली आहे. याठिकाणी भाजप व सातारा विकास आघाडीने त्यांना आव्हान दिले आहे. भाजपने सीमा सोनटक्के उमेदवारी दिली होती. तर सातारा विकास आघाडीने शिवसेनेचे माजी जिल्हाध्यक्ष हणमंत चवरे यांच्या पत्नी हेमलता चवरे यांना उमेदवारी दिली आहे. येथील निकालही धक्कादायक लागण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादीने पूर्ण ताकदीने पाठखळ गट, गण तसेच शिवथर गण लढला आहे.
लिंब गटात राष्ट्रवादीने माजी जिल्हा परिषद सदस्य जितेंद्र सावंत यांना पंचायत समितीची उमेदवारी दिली. याठिकाणी प्रतीक कदम यांना राष्ट्रवादीने उभे केले. सातारा विकास आघाडीने शाहूपुरीतील माजी जिल्हा परिषद सदस्य व खासदार उदयनराजे भोसले यांचे निकटवर्तीय बाळासाहेब गोसावी यांना येथून उमेदवारी दिली. भाजपने रवींद्र वर्णेकर तर शिवसेनेने माजी जिल्हाध्यक्ष हणमंत चवरे यांना उमेदवारी दिली आहे. या गटातील निवडणूकही चुरशीची होणार आहे.
शाहूपुरी गणात सातारा विकास आघाडीतर्फे माजी सदस्य संजय पाटील व राष्ट्रवादीचे भारत भोसले यांच्यात सरळ लढत होणार, हे निश्चित आहे. भाजपने रामदास धुमाळ यांना तर दिलीप कडव यांनी अपक्ष उमेदवारी केली. शाहूपुरी गणात खासदार उदयनराजे भोसले व संजय पाटील यांचे वर्चस्व असल्याने मतदानादिवशी सुरुवातीला पाटील यांच्या बाजूने कौल दिसत होता. पण आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दुपारी याठिकाणी स्वत: हजेरी लावून कार्यकर्त्यांना सूचना केल्याने भारत भोसले यांचेही पारडे जड झाले.
कारी गटात राष्ट्रवादीने कमल जाधव यांना उमेदवारी दिली आहे. भाजपतर्फे तालुकाध्यक्ष अभय पवार यांच्या पत्नी श्वेता पवार निवडणूक लढत आहेत. ‘साविआ’तर्फे राजश्री शिंदे या लढत आहेत. मूळचा परळी नावाने असणारा हा गट मागील निवडणुकीत आमदार शिवेंद्रसिंहराजे यांच्याकडे असल्याने गटात आमदार गटाने मुसंडी मारली. या ठिकाणची परिस्थिती लक्षात घेतल्यानंतर खासदार उदयनराजे भोसले यांनीही याठिकाणी जोर लावला होता. या गटाचाही अनपेक्षित निकाल लागेल.
सातारा तालुक्यासह संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या वर्णे गटात ‘हाय व्होल्टेज’ टाईट वातावरण आहे. स्वाभिमानी शेतकरी पक्षातून कऱ्हाड उत्तर मतदार संघात निवडणूक लढलेले मनोज घोरपडे यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर महसूल मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी हा गट भाजपकडे पुन्हा येण्यासाठी आपली स्वत:ची प्रतिष्ठा पणाला लावली आहे. सातारा विकास आघाडीचे गणेश देशमुख व राष्ट्रवादीचे धनंजय कदम या दोन उमेदवारांचे घोरपडे यांना आव्हान असून, स्वाभिमानी शेतकरी संघटनचे उमेदवार राजू शेळके या ठिकाणी कुणाची मते खातात, त्यावरच विजयी उमेदवार ठरणार आहे. चारही उमेदवार एका वरचढ एक असल्याने येथील निकालही आश्चर्यजनक येण्याची शक्यता आहे.
शेंद्रे गटात आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी प्रा. डॉ. शिवाजीराव चव्हाण यांना उमेदवारी दिली. चव्हाण यांचा मूळचा लोकसंपर्क त्यांना फायद्याचा ठरला असून, काँगे्रस सरचिटणीस व माजी शिक्षण सभापती सुनील काटकर व माजी उपसभापती सूर्यकांत पडवळ यांच्यातील वैराचा फायदा कुणाला झाला? हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. सातारा विकास आघाडीने ऐनवेळी विठ्ठल ऊर्फ योगेश शिंदे यांना उमेदवारी दिली होती. (प्रतिनिधी)
गोडोली गटात ४४.४७ तर गणात अवघे ३७.२७ टक्के मतदान
गोडोली गटात अवघे ४४.४७ तर गोडोली गणात अवघे ३७.२७ टक्के मतदान झाले आहे. संपूर्ण जिल्ह्यात ही नीचांकी आकडेवारी असल्याने मतदानाची संख्या आहे. अनेकांनी सुटीच्या दिवशी मतदान करण्याऐवजी फिरायला जाणेच पसंत केल्याची चर्चा आहे.

Web Title: 'Khaki' under stress of Raje's struggle!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.