खंबाटकी घाटात धोक्याची घंटा कायम
By Admin | Published: February 1, 2015 08:59 PM2015-02-01T20:59:54+5:302015-02-02T00:02:01+5:30
संरक्षक कठड्यांची दुरवस्था : लोखंडी खांबही टिकेनात; प्रशासकीय यंत्रणा मेटाकुटीला!
खंडाळा : पुणे-सातारा महामार्गावरील खंबाटकी घाटातील तुटलेले संरक्षक कठडे प्रवाशांसाठी धोकादायक ठरत आहेत. यावर पुन्हा-पुन्हा दुरुस्ती करूनही वाहन ठोकरल्याने कठडे कोसळले जात आहेत. म्हणून ‘न्हाय’च्या प्रशासनाने घाटातील जागोजागी तुटलेल्या कठड्यांच्या जागी लोखंडी खांब व लोखंडी रोप बसवले आहेत. मात्र, वेगाने येणारी वाहने व जड वाहनांमुळे ही उपाययोजनाही कुचकामी ठरत आहे. संरक्षक कठडे आज बसविले की, उद्या ते तुटत आहेत. त्यामुळे प्रशासकीय यंत्रणाही मेटाकुटीला आली आहे. खंबाटकी घाटातील वळण रस्त्यांवर तुटलेल्या संरक्षक कठड्यांमुळे प्रवास करणे धोकादायक बनले होते. याबाबत ‘लोकमत’मधून अनेकदा आवाज उठविला होता. त्यानंतर हायवे प्रशासनाने दखल घेत संरक्षक कठड्यांऐवजी लोखंडी खांब रोवून रोप लावले होते. मात्र वळण रस्त्यावर जड वाहने, कंटेनर वळविताना रस्ता अरुंद असल्याने हे उभारलेले कठडे वारंवार तुटले जातात. वास्तविक प्रत्येक शनिवार व रविवारी महाबळेश्वरकडे जाणाऱ्या पर्यटकांमुळे घाटात वाहनांची संख्या वाढत असते. अशावेळी जड वाहनांमुळे घाट ठप्पही होत असतो.वाहनांच्या गर्दीतून मार्ग काढण्याच्या नादात हे कठडे तुटले जातात. त्यामुळे वारंवार ते दुरुस्त करावे लागतात. यासाठी लोखंडी ग्रीलचे कठडे उभारले; मात्र तेही जड वाहनांमुळे मोडकळीस आले आहेत. या समस्येवर उपाय म्हणून वळणावरील रस्त्याचे रुंदीकरण होणे गरजेचे आहे. आजही घाटातील काही ठिकाणी तुटलेल्या कठड्यांच्या जागी केवळ रिफ्लेक्टर कापडी पट्ट्या लावलेल्या आहेत. मात्र याठिकाणी भक्कम संरक्षक कठड्यांचे बांधकाम होणे गरजेचे आहे. त्याचबरोबर जड वाहनांना वळण रस्त्यावर सूचना फलक लावले गेले पाहिजेत. तसेच हलक्या वाहनांना वेगमर्यादा ठेवली पाहिजे. घाटातील किमान सुविधांवर प्रशासनाने लक्ष देण्याची मागणी ग्रामस्थ व प्रवाशांमधून होत आहे. (प्रतिनिधी)
पडझड कायम
खंबाटकी घाटात संरक्षक कठड्यांची दुरवस्था आहे. ‘लोकमत’च्या वृत्तानंतर लोखंडी संरक्षक यंत्रणा उभारली गेली; मात्र जड वाहनांमुळेही वारंवार तुटली जात आहे. संरक्षक कठडे उभारण्याबरोबरच वळण रस्त्याचे रुंदीकरण झाले तर या समस्येवर तोडगा निघेल,जड कंटेनर वळणावर बसत नाहीत, त्यामुळे अनेकदा घाट ठप्प होतो, असे खंबाटकी मदत पथकाचे अध्यक्ष अजित यादव यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.