खामजाई मंदिर, खामटाके नामशेष होणार
By admin | Published: June 3, 2015 10:43 PM2015-06-03T22:43:01+5:302015-06-04T00:03:45+5:30
खंबाटकी घाट रुंदीकरण : ऐतिहासिक ठेवा वाचविण्याची ग्रामस्थांची मागणी
खंडाळा : पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर पुणे-सातारादरम्यान खंबाटकी घाटाच्या रुंदीकरणाचे काम लवकरच हाती घेण्यात येणार आहे. या घाटातील ऐतिहासिक खामजाई मंदिर आणि ‘खामटाके’ हा पाण्याचा नैसर्गिक झरा नामशेष होणार असल्याबद्दल खंत व्यक्त करण्यात येत आहे. याच ठिकाणाहून शिवकालीन राजमार्ग असल्यामुळे घाटाच्या रुंदीकरणावेळी हा ऐतिहासिक ठेवा वाचविण्यात यावा, अशी मागणी ग्रामस्थ आणि शिवप्रेमींमधून व्यक्त केली जात आहे.
राष्ट्रीय महामार्गाचे सहापदरीकरणाचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. त्यामुळे खंबाटकी घाटरस्त्याचे रुंदीकरणही करण्यात येणार आहे. घाटाच्या मध्यभागी रस्त्यालगत असलेले खामजाई देवीचे मंदिर आणि खामटाके काढण्यात येणार आहे. याबाबतची लेखी सूचना भूसंपादन उपजिल्हाधिकाऱ्यांनी मंदिराचे पुजारी संजय गोसावी यांना दिली आहे.
वास्तविक, शिवकालापासूनच खंडाळा हे गाव घाटाच्या पायथ्याशी होते. तेव्हापासूनच हे खामजाई देवीचे मंदिर आहे. शिवाय, पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी, यासाठी मोठे टाके खोदण्यात आले होते. त्याला ‘खामटाके’ असे संबोधण्यात येते. वर्षभर या टाक्यातून थंड आणि स्वच्छ पाणी उपलब्ध होते. परंतु रस्ता रुंदीकरणाची कुऱ्हाड मंदिरावर आणि ऐतिहासिक वास्तूवर कोसळणार आहे. त्यामुळे गेल्या साडेचारशे वर्षांपासून जपलेला हा ठेवा नष्ट होणार आहे. त्यामुळे ग्रामस्थांमधून खंत व्यक्त केली जात आहे. घाटरस्त्याच्या रुंदीकरणावेळी या वास्तूचा विचार व्हावा, ही मागणी जोर धरू लागली आहे.
खंबाटकी घाट आणि खामटाके यांचा जवळचा संबंध आहे. ‘खामटाके’ नावाच्या पाण्याच्या साठ्यावरूनच या घाटाचा नामोल्लेख ‘खामटकी घाट’ व पुढे ‘खंबाटकी घाट’ असा होऊ लागला. त्यामुळे या घाटाच्या नावाचा ऐतिहासिक पुरावाच नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. शिवाय, घाटातून प्रवास करताना लोकांना थांबण्याचे एक ठिकाणही नाहिसे होणार आहे. त्यामुळे या नोटिशीनंतर होणाऱ्या सर्वेक्षणात राष्ट्रीय महामार्ग विकास प्राधिकरण आणि स्थानिक प्रशासन नेमकी काय भूमिका घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. (प्रतिनिधी)
‘खामटाके’ हा ऐतिहासिक पुरावा आहे. शिवकालीन राजमार्गही येथूनच जात होता. त्यामुळे हा अनमोल ठेवा जपण्यात यावा; अन्यथा शिवप्रेमींना तीव्र भूमिका घ्यावी लागेल.
- शेखर खंडागळे, इतिहासप्रेमी
खामजाई देवीचे मंदिर शेकडो वर्षांपासून आहे. खंडाळा ग्रामस्थांचे ते श्रद्धास्थान आहे. गावाच्या वतीने देवीचा उत्सवही होतो. घाटाच्या रुंदीकरणात मंदिराला कोणतीही हानी पोहोचणार नाही, याची काळजी घेण्यात यावी. ग्रामस्थांच्या भावना जपल्या जाव्यात यासाठी शासनाने प्रयत्न करावेत.
- किरण खंडागळे, सरपंच, खंडाळा