खंबाटकीचे खामटाके अद्भुत प्राचीन जलस्रोत !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2021 04:33 AM2021-01-17T04:33:43+5:302021-01-17T04:33:43+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क खंडाळा : महाराष्ट्रात बहुतांश भागात उन्हाळ्यात पाणीस्रोत आटल्याने पाणीटंचाईच्या भीषण संकटाचा सामना करावा लागतो; पण ...
लोकमत न्यूज नेटवर्क
खंडाळा : महाराष्ट्रात बहुतांश भागात उन्हाळ्यात पाणीस्रोत आटल्याने पाणीटंचाईच्या भीषण संकटाचा सामना करावा लागतो; पण खंबाटकी घाटातील प्राचीन खामटाके मात्र आपल्या थंड पाण्याने वाटसरूंची तहान भागवत आहे. ऐन उन्हाळ्यातही हा नैसर्गिक पाणीस्रोत कायम राहत असल्याने प्रवाशांची सोय होते. निसर्गाच्या या अद्भुत किमयेमुळे प्राचीन खामटाके वरदान ठरत आहे.
खामजाईचे मंदिर व पाण्याचे खामटाके हा इतिहासाचा प्राचीन पुरावा आहे. तसेच याच मंदिराकडे येणारा शिवकालीन राजमार्गही आहे. त्यामुळे हा ऐतिहासिक ठेवा जपून महामार्गाचे विस्तारीकरण व्हावे, अशी भूमिका स्थानिक शिवप्रेमी व ग्रामस्थांनी घेतली होती. त्यानुसार ते जपण्यात यश मिळाले आहे. याच खामटाक्यात वर्षभर नैसर्गिक पाण्याचा प्रवाह चालू असतो आणि ते कायम टिकून असल्याने डोंगराच्या मध्यावरही पाणी साठून राहते.
खंबाटकी घाट चढताना साधारणपणे मध्यावर आल्यानंतर खामजाई मंदिर आहे. या मंदिराच्या लगत ही ऐतिहासिक टाकी आहे. विशेष म्हणजे डोंगरात खोदलेल्या या टाक्यांमध्ये खांब आहेत. पारगाव खंडाळा या गावामुळे हा घाट पूर्वी खंडाळा घाट म्हणून ओळखला जात होता. नंतर तो खांबटाकी म्हणून ओळखला जाऊ लागला. खंबाटकी हा त्याचाच अपभ्रंश आहे.
वास्तविक हा उत्तर व दक्षिण भारत जोडणारा प्राचीन महामार्ग आहे. मंचर येथे प्राचीन कुंड आहे. ते चौदाव्या शतकात बांधले असल्याचे तेथील लेखावरून समजते. पुढे आल्यानंतर शिरवळला यादवकालीन पाणपोई दिसते. त्यानंतर घाटात ही टाकी आहे. व्यापारी आणि प्रवासी मंडळींच्या सोयीसाठी ती खोदण्यात आली असावी, असे पुरातत्त्व तज्ज्ञ सांगतात. ही टाकी नक्की कधी खोदली याचा काळ सांगता येत नसला, तरी अठराव्या शतकात पेशव्यांचे गुरू ब्रह्मेंद्र स्वामी यांनी या टाक्यांसाठी ४५ हजार रुपये खर्च केला आहे. साताऱ्याजवळ धावडशी येथे त्यांची समाधी असून तेथे त्यांनी केलेल्या कामांची माहिती देणारा फलक आहे. त्यावर हा खर्चही नमूद करण्यात आला आहे. कोल्हापूर-सांगली-साताऱ्याकडे जाणाऱ्या बहुतांश गाड्या घाटात या स्थळी थांबतात आणि प्रवासी थंड पाणी पिऊन तृप्त होतात. तसेच, या टाक्यांमध्ये नाणी टाकण्याचीही परंपरा आहे.
कोट..
खंबाटकी घाटाचा विकास साधताना खामदेवी मंदिर व खामटाके हा ऐतिहासिक प्राचीन ठेवा जपण्यासाठी प्रयत्न केले आहेत. घाटाचे रुंदीकरण करताना या टाकीची जपणूक करणे शक्य आहे का? वारसा जपून विकास साधता येईल का? असा विचार केल्याचे दिसून येते. त्यासाठी स्थानिकांनीही सहकार्याची भूमिका घेतली आहे.
- शेखर खंडागळे, शिवप्रेमी
फोटो...
१६खंडाळा
खंबाटकी घाटातील प्राचीन खामटाके आपल्या थंड पाण्याने वाटसरूंची तहान भागवत आहे.