खंडाळ्यात लोकसभेची साखरपेरणी ! : रामराजे, बकाजीराव पाटील यांची कमराबंद चर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2018 10:52 PM2018-05-16T22:52:39+5:302018-05-16T22:52:39+5:30
खंडाळा : राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या स्थापनेपासून खंडाळा तालुक्यात पक्षाची घडी बसविणारे तालुक्याचे ज्येष्ठ नेते बकाजीराव पाटील हे गेल्या दोन वर्षांत पक्षापासून दूर आहेत.
दशरथ ननावरे ।
खंडाळा : राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या स्थापनेपासून खंडाळा तालुक्यात पक्षाची घडी बसविणारे तालुक्याचे ज्येष्ठ नेते बकाजीराव पाटील हे गेल्या दोन वर्षांत पक्षापासून दूर आहेत. अलीकडच्या काळात पक्षाच्या कोणत्याही कार्यक्रमात त्यांनी सहभाग घेतला नाही. राष्ट्रवादीच्या सध्याच्या धोरणावर नाराज असलेल्या पाटील यांची राष्ट्रवादीचे नेते विधान परिषद सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी पारगाव येथे त्यांच्या निवासस्थानी अचानक भेट घेत सुमारे तासभर कमराबंद चर्चा केली. यामागे बकाजी आबांची नाराजी दूर करून लोकसभेसाठी चाचपणी असल्याची चर्चा तालुक्यात रंगू लागली आहे.
राष्ट्रवादी पक्षांतर्गत गटबाजीने हैराण झालेल्या ज्येष्ठ नेते बकाजीराव पाटील यांनी गत काही वर्षांपासून राष्ट्रवादीच्या स्थानिक बैठकींपासून फारकत घेतली आहे. परंतु गावोगावी आपल्या जुन्या कार्यकर्त्यांच्या बैठकांचा धडाका घेत आपली संपर्काची घडी कायम ठेवली आहे. दरम्यान, या त्यांच्या कार्यास नव्या जुन्या मंडळीनी चांगलाच हात दिला आहे.
गत दोन ते तीन वर्षांपासून राष्ट्रवादीच्या राजकीय पुलाखालून बरेच पाणी वाहू लागले आहे. अंतर्गत असणारी नव्या जुन्यांची गटबाजी चव्हाट्यावर आल्याने नाराजीचा महापूर वाहू लागला आहे. याचा फुगवटा वाढतच चालला आहे. परंतु या नाराजीला अटकाव घालण्यास पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाला यश आलेले दिसत नाही किंवा तसा प्रयत्नही झालेला नाही. दोन वर्षांपूर्वी झालेल्या जिल्हा बँकेच्या निवडणुकीत बकाजी आबांनी पक्षाविरोधी उघड बंड केले होते. तेव्हापासून नाराजी सत्र चालूच असून, गतवर्षीच्या जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीतही राष्ट्रवादीच्या स्थानिक बैठकीला रामराम केला होता. परंतु सवतासुभा मांडण्याचे धाडस केले नाही.
अलीकडच्या काही महिन्यांपासून नितीन भरगुडे-पाटील, आनंदराव शेळके-पाटील, रमेश धायगुडे-पाटील यांच्यासह इतर नाराज मंडळींशी वाढवलेली सलगी व जनमानसात बैठकांचा सुरू केलेला धडाका यामुळे नव्या राजकीय समीकरणांची नांदी निर्माण होऊ शकते. या सर्व प्रक्रियेमध्ये अनेक तर्क वितर्कांना उधाण आले होते. अशातच रामराजे नाईक-निंबाळकर यांनी बकाजीराव पाटील व माजी सभापती रमेश धायगुडे यांच्याशी अचानक भेट घेऊन कमराबंद चर्चा केली.
तालुक्यात घडत असलेल्या व आगामी काळात घडणाऱ्या राजकीय गोष्टींचा उहापोहाची चर्चा आहे. परंतु रामराजे नाईक-निंबाळकर यांनी बकाजीराव पाटील व माजी सभापती यांच्या भेटीने जिल्ह्याच्या बदलत्या राजकीय परिस्थितीनुसार लोकसभेची साखरपेरणी असल्याबाबत तर्क वितर्क लढवले जात आहेत.
अचानक भेटीमुळे जनतेत तर्क-वितर्क
ज्येष्ठ नेतृत्वाला अचानक भेटीने दिलेला आधार नाराजी थोपवणार का? बकाजीराव पाटील राष्ट्रवादीच्या बैठकीत पुन्हा सक्रिय होणार का? याविषयी जनतेमध्ये चर्चेला उधाण आले आहे. आता पक्ष नेतृत्व यावर काय भूमिका घेणार? याकडेही जनतेचे लक्ष लागून राहिले आहे.
ज्येष्ठ नेते बकाजीराव पाटील यांच्याशी विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर व रमेश धायगुडे यांनी कमराबंद चर्चा केली