खंडाळा न्यायालयाची दोघांना शिक्षा
By Admin | Published: February 15, 2017 11:27 PM2017-02-15T23:27:21+5:302017-02-15T23:27:21+5:30
जीपचालकाला सहा महिने साधी कैद; महिलेवर वार केल्याप्रकरणी दोन वर्षे सक्तमजुरी
शिरवळ : पाडेगाव या ठिकाणी जीपने दुचाकीवरील एकाला गंभीर जखमी करीत पलायन केल्याप्रकरणी जीपचालकाला सहा महिने साधी कैद व साडेतीन हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली. दुसऱ्या प्रकरणात शेतजमिनीच्या वादातून महिलेवर धारदार ब्लेडने वार करीत गंभीर जखमी केल्याप्रकरणी एका युवकाला दोन वर्षे सक्तमजुरी व दहा हजार रुपये दंडाची शिक्षा खंडाळा येथील दिवाणी व फौजदारी न्यायालयाने सुनावली आहे.
जीपचालक अमोल ऊर्फ विकास श्रीरंग पाटोळे (वय २८, रा. थोपटेवाडी, ता. बारामती, जि. पुणे) व उमेश जयवंत यादव (२७, रा. पारगाव-खंडाळा, ता. खंडाळा) असे शिक्षा सुनावलेल्या युवकांचे नाव आहे.
याबाबतची माहिती अशी की, लोणंदजवळील पाडेगाव हद्दीतील नीरा-लोणंद रोडवर दि. १२ मे २०१२ ला अमोल ऊर्फ विकास पाटोळे या जीपचालकाने (एमएच ४२ एच ४२६९) विरुद्ध दिशेला रस्त्यावरून निघालेल्या दुचाकीला (एमएच ११ एक्स १५९२) जोरदार धडक देत दुचाकीचालक चंद्रगुप्त तानाजी पवार (२६, रा. पिंपरे, ता. खंडाळा) याला गंभीर जखमी करीत घटनास्थळावरून पलायन केले.
याप्रकरणाचा तपास करीत लोणंदचे पोलिस हवालदार सतीश शिंदे यांनी खंडाळा येथील दिवाणी व फौजदारी न्यायालयांमध्ये दोषारोपपत्र दाखल केले. यावेळी सरकारपक्षातर्फे आठ साक्षीदार तपासले. यावेळी सरकारी वकील सुप्रिया मोरे-देसाई यांनी केलेल्या युक्तिवाद ग्राह्य धरत खंडाळा येथील दिवाणी व फौजदारी न्यायालयांच्या न्यायाधीश ए. पी. दिवाण यांनी जीपचालक अमोल ऊर्फ विकास पाटोळे याला दोषी ठरविले. यावेळी दोषी ठरविलेल्या अमोल पाटोळे याला न्यायालयाने सहा महिने कैद व साडेतीन हजार रुपये दंड सुनावला. दुसऱ्या प्रकरणात खंडाळा येथे शेतजमिनीच्या वादातून ९ जून २०१२ ला घरात घुसून महिलेवर धारदार ब्लेडने वार करीत शीला दत्तात्रय यादव यांना उमेश जयवंत यादव याने गंभीर जखमी केले होते. यावेळी या घटनेचा सहायक पोलिस उपनिरीक्षक महादेव अनपट यांनी तपास करीत खंडाळा न्यायालयामध्ये सहायक पोलिस उपनिरीक्षक चंद्र्रकांत निकम यांनी दोषारोपपत्र दाखल केले होते. यावेळी सरकार पक्षातर्फे सहा साक्षीदार तपासण्यात आले. यावेळी सरकारी वकील सुप्रिया मोरे-देसाई यांनी केलेला युक्तिवाद ग्राह्य मानत याप्रकरणी उमेश यादव याला खंडाळा न्यायालयाने दोषी ठरविले. यावेळी खंडाळा येथील दिवाणी व फौजदारी न्यायालयांचे सहदिवाणी न्यायाधीश डी. एम. गिरी यांनी दोषी ठरविलेल्या उमेश यादव याला दोन वर्षे सक्तमजुरी व दहा हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली.
यावेळी सरकारी वकील सुप्रिया मोरे-देसाई यांना प्रॉसिक्युशन स्कॉडचे पोलिस हवालदार अविनाश नलावडे, पोलिस हवालदार सुनील गायकवाड, पोलिस हवालदार रवींद्र कदम यांनी मदत केली. (प्रतिनिधी)