कोरोनामध्ये खंडाळा नगरपंचायत ठरली संकटमोचक !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2021 04:37 AM2021-05-17T04:37:37+5:302021-05-17T04:37:37+5:30
खंडाळा : सातारा जिल्ह्यासह खंडाळा तालुक्यात कोरोना प्रसार वेगाने होत आहे. दुसऱ्या लाटेतील होणाऱ्या त्रासाचा विचार करता लोकांमध्ये भीतीचे ...
खंडाळा : सातारा जिल्ह्यासह खंडाळा तालुक्यात कोरोना प्रसार वेगाने होत आहे. दुसऱ्या लाटेतील होणाऱ्या त्रासाचा विचार करता लोकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. खंडाळा तालुक्यातही रुग्णांची संख्या सात हजार पार पोहोचली आहे. मात्र, खंडाळा नगरपंचायत क्षेत्रात केवळ सात रुग्ण बाधित आहेत. कुशल प्रशासनाच्या जोरावर विविध उपाययोजना करून खंडाळा शहराला कोरोनापासून अबाधित राखण्यात यश आले आहे. त्यामुळे जिल्ह्यात सर्वांत कमी रुग्ण असलेली नगरपंचायत ठरली आहे. तसेच कोरोनाच्या महामारीत खंडाळा नगरपंचायत लोकांसाठी संकटमोचक ठरली आहे.
खंडाळा तालुक्यात कोरोनाचा वाढता प्रसार पाहता नगरपंचायतीने शहरात लॉकडाऊनचे नियम कडक केले. त्याची काटेकोर अंमलबजावणी करून ज्या लोकांचे वागणे बेजबाबदार असल्याचे दिसून येत होते त्याच्यावर निर्बंध घातले. सर्वप्रथम सुपरस्प्रेडर लोकांची स्वतंत्र यादी बनवून त्यांचे विलगीकरण करण्यात आले. शहरात दररोज प्रत्येक घरी जाऊन सर्वेक्षण सुरू आहे. त्यामुळे संक्रमित लोक तसेच त्यांच्या संपर्कातील लोकांना वेळीच उपाययोजना करता आली. नगरपंचापतीचे नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष व सर्व नगरसेवक यांच्या सहकार्याने शहरातील सर्व व्यापारी, दुकानदार, भाजीविक्रेते, फळविक्रेते अशी एकूण २५० लोकांची तपासणी करण्यात आली होती. यापैकी बाधितांना लगेच उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्यामुळे कोरोनाचा प्रसाराला आळा घातला गेला. तालुक्यात हजाराच्या प्रमाणात रुग्ण असताना खंडाळा शहरात केवळ सात रुग्ण आहेत हे नगरपंचायतीच्या यशस्वी कारभाराचे द्योतक आहे.
शहरात नियमित साफसफाई यासाठी स्वच्छता कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. तसेच सर्वत्र सातत्याने जंतुनाशक औषध फवारणी केली जात आहे. त्याचबरोबर प्रशासन अधिकारी व कर्मचारी यांचे दक्षता पथक तयार करण्यात आले असून, त्याद्वारे लोकांवर नजर ठेवली जात आहे. विशेषतः शहरात विनाकारण फिरणाऱ्यांवर कडक कारवाई केली जात असून, विनामास्क एकही नागरिक घराबाहेर पडत नाही. त्यामुळे प्रसाराचा वेग मंदावला आहे.
(चौकट)
अंत्यसंस्काराचा भार...
तालुक्यात खासगी हॉस्पिटल वगळता ग्रामीण रुग्णालय हे एकमेव कोरोना सेंटर आहे. खासगी रुग्णालयात उपचार घेणे सर्वसामान्य लोकांना परवडणारे नाही. त्यामुळे येथे मोठी गर्दी होते. तसेच गंभीर रुग्णांना याशिवाय दुसरा पर्याय नाही. मात्र, उपचारादरम्यान मृत्यू झालेल्या रुग्णांवर अंत्यसंस्कार करण्याची जबाबदारी नगरपंचायतीकडे आहे. दुसऱ्या लाटेत आजपर्यंत ५० रुग्णांवर अंत्यसंस्कार कोणताही मोबदला न घेता केले आहेत. मात्र यासाठी लागणाऱ्या खर्चाचा भार नगरपंचायतीवर येत आहे.
कोट..
नगरपंचायतीच्या माध्यमातून जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशाचे काटेकोर पालन सुरू आहे. कोरोनाशी लढा देताना शहरातील अनेक सामाजिक संघटना व दानशूर व्यक्ती यांचे सहकार्य मिळत आहे. पदाधिकारी व अधिकाऱ्यांच्या समन्वयातून लोकांना विविध सुविधा पुरविल्या जात आहेत. यासाठी नगरसेवकांचे प्रयत्न मोलाचे आहेत.
-डॉ. योगेश डोके, मुख्याधिकारी
.......................................
१६खंडाळा
फोटो - खंडाळा शहरात येणाऱ्या सर्व लोकांची कसून तपासणी पोलीस यंत्रणेकडून केली जात आहे. (छाया : दशरथ ननावरे)