खंडाळा पोलिसांची पथके रवाना
By admin | Published: December 23, 2014 12:30 AM2014-12-23T00:30:55+5:302014-12-23T00:30:55+5:30
गूढ कायम : पुण्यातून शवविच्छेदन अहवालाची प्रतीक्षा
खंडाळा : अहिरे, ता. खंडाळा येथील गत आठवड्यात गायब झालेल्या गायत्री जमदाडे या सहा वर्षीय बालिकेचा मृतदेह शनिवारी रात्री उशिरा आढळून आला. मात्र, तिच्या मृत्यूचे गूढ अद्यापही कायम आहे. तिचा मृत्यू अकस्मात मयत होते की खून, याबाबत तपास सुरू आहे. या मृत्यूच्या तपासासाठी खंडाळा पोलिसांची पथके रवाना करण्यात आली आहेत. पुणे येथून शवविच्छेदनाचा अहवाल आल्यावरच मृत्यूचे खरे कारण स्पष्ट होणार आहे.
गायत्री जमदाडे ही दि. १४ रोजी अहिरे येथून गायब झाली होती. आठ दिवस पोलिसांनी तपास केला. मात्र, कोठेही ती मिळून आली नाही. शनिवारी वीर धरणाच्या उजवा कालव्यात तिचा मृतदेह आढळला; परंतु तिच्या मृत्यूचे कारण स्पष्ट होऊ शकले नाही. त्यासाठी पुणे येथील ससून रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले आहे. परंतु, त्याचा अहवाल प्राप्त झाला नाही. अतिशय छिन्नविच्छिन्न व सडलेल्या अवस्थेत मृतदेह आढळल्याने पोलिसांना तपास करणे जिकिरीचे बनले आहे. गुन्हे अन्वेषण पथकाने घटनास्थळी पाहणी करून श्वानपथकामार्फत माग घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, अद्यापतरी काहीच हाती लागले नाही. विविध ठिकाणी पोलिसांनी पथके रवाना केली आहेत. गायत्री अचानक गायब होण्यामागच्या कारणाचा शोध पोलिसांनी सुरू केला आहे. तसेच तिला पळवून नेले असेल तर हे कृत्य कोणाचे व त्याच्या हेतूचाही शोध घेत आहेत. खंडाळ्याचे पोलीस निरीक्षक अशोक शेळके तपास करीत आहेत. (प्रतिनिधी)