खंडाळा तालुका क्रीडा संकुलाला मिळणार गती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2021 04:41 AM2021-09-25T04:41:51+5:302021-09-25T04:41:51+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क खंडाळा : खंडाळा तालुक्यातील खेळाडूंना पुढील ध्येय गाठण्यासाठी सरावाची सुविधा असणे गरजेचे होते. ही बाब लक्षात ...
लोकमत न्यूज नेटवर्क
खंडाळा : खंडाळा तालुक्यातील खेळाडूंना पुढील ध्येय गाठण्यासाठी सरावाची सुविधा असणे गरजेचे होते. ही बाब लक्षात घेऊन खंडाळा तालुक्यातील क्रीडा संकुलाला मंजुरी दिली होती. मात्र निधीअभावी संकुलाचे काम रखडले होते. या क्रीडांगणाचे काम प्रत्यक्ष सुरू व्हावे, यासाठी आमदार मकरंद पाटील यांनी शासन दरबारी पाठपुरावा करून १ कोटी २० लाखांचा निधी मंजूर केला आहे. त्यामुळे तालुक्याच्या क्रीडा संकुलाला गती मिळणार आहे.
खंडाळा तालुक्यातील नवोदित खेळाडूंना विविध खेळांच्या सुविधा उपलब्ध व्हाव्यात. ग्रामीण भागातील खेळाडू देशपातळीवर पोहोचण्यासाठी सुसज्ज क्रीडा संकुलाला मंजुरी घेण्यात आली होती. त्यासाठी लागणारी जागा उपलब्ध करून घेणे या प्रक्रियेसाठी काही कालावधी गेला होता; मात्र खंडाळा येथे होणारे संकुल शिरवळला स्थलांतरित करून जागेचा प्रश्न मार्गी लागल्यानंतर त्या जागी भव्य क्रीडा संकुल उभारण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या जागी सुसज्ज प्रेक्षागृह उभारण्यासाठी शासनाच्यावतीने १ कोटी २० लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे. यासाठी आमदार मकरंद पाटील यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता. या संकुलात सर्व खेळांच्या सुविधा निर्माण होणार असल्याने शालेय वयोगटातील खेळाडूंसह इतर सर्वाची सोय होणार आहे.
या संकुलात भव्य क्रीडांगण तयार झाल्यानंतर तालुक्यातील प्राथमिक, माध्यमिक व महाविद्यालयीन विद्यार्थ्याच्या क्रीडा स्पर्धा घेण्यासाठी हक्काचे ठिकाण उपलब्ध होणार आहे. याशिवाय शाळाबाहय खेळाडूंनाही सराव करता येणार असल्याने भावी खेळाडू सक्षमपणे उभे राहतील. खंडाळा तालुक्याच्या क्रीडा संकुलाचा प्रश्न मार्गी लागल्यामुळे तालुक्यातील जनतेमधून समाधान व्यक्त होत आहे.
चौकट
बंधिस्त खेळाची सुविधा
या संकुलात कबड्डी, खो-खो , व्हॉलिबॉल मैदान, बॅडमिंटन व टेनिस कोर्ट, धावणे ट्रॅक यासह थाळीफेक, गोळाफेक, भालाफेक हे वैयक्तिक खेळ तसेच कॅरम, बुद्धिबळ यासारखे इनडोअर खेळांची सुविधा उपलब्ध करण्यात येणार आहे.
कोट
खंडाळा तालुक्याचे सुसज्ज क्रीडा संकुल निर्माण व्हावे, यासाठी प्रयत्नशील आहे. या निधीतून प्रेक्षागृहाचे काम सुरू होईल. उर्वरित कामांसाठी, मैदानासाठी लागणारा निधी राज्य शासनाच्या क्रीडा विभागाकडून उपलब्ध करून घेणार आहे. यातून निर्माण होणारे नवोदित खेळाडू देशाचे नेतृत्व करतील.
- मकरंद पाटील,
आमदार