कोरोना लसीकरणात खंडाळा तालुका अव्वल!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2021 04:57 AM2021-02-23T04:57:09+5:302021-02-23T04:57:09+5:30
खंडाळा : कोरोनावर मात करण्यासाठी प्रशासनासह आरोग्य विभागाचे शर्थीचे प्रयत्न आहेत. या महामारीचा धोका टळला नसला तरी कोरोनाची लस ...
खंडाळा : कोरोनावर मात करण्यासाठी प्रशासनासह आरोग्य विभागाचे शर्थीचे प्रयत्न आहेत. या महामारीचा धोका टळला नसला तरी कोरोनाची लस उपलब्ध झाल्याने काहीअंशी दिलासा आहे. सातारा जिल्ह्यात कोरोना लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यात ३३ हजारजणांनी लस घेतली, तर उद्दिष्टांपैकी ९० टक्के काम पूर्ण करून खंडाळा तालुका जिल्ह्यात अव्वल राहिलाय.
सातारा जिल्ह्यात कोरोना लसीकरणाला प्रारंभ झाल्यानंतर सर्वप्रथम आरोग्य विभागाचे कर्मचारी, पोलीस यंत्रणा, महसूल, शिक्षण विभाग, अंगणवाडी सेविका, आशा सेविका यांना लस उपलब्ध करून दिली. यासाठी शासनाने दिलेल्या ऑनलाईन अॅपवर नोंदणी करणे आवश्यक होते. त्यानुसार जिल्ह्यात पहिल्या टप्प्यात ४६ हजार ११० कर्मचाऱ्यांची नोंदणी करण्यात आली होती. त्यापैकी ३२ हजार ९४० जणांनी लस घेतली आहे. यामध्ये १८ हजार ६९२ आरोग्य अधिकारी व कर्मचारी आणि १४ हजार २४८ ग्रामीण भागात क्षेत्रीय स्तरावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.
जिल्ह्यात सरासरी ७१ टक्के काम पूर्ण झालेले आहे. यामध्ये खंडाळा तालुक्यातील लसीकरण पथकाने दिलेल्या उद्दिष्टांपैकी ९० टक्के काम पूर्ण करून जिल्ह्यात अव्वल नंबर राखला आहे, तर सर्वांत कमी ५८ टक्के लसीकरण कोरेगाव तालुक्यात झाले आहे.
चौकट :
जिल्ह्यात तालुकावार नोंदणी केलेली संख्या. लस घेतलेली आरोग्य कर्मचारी संख्या. क्षेत्र कर्मचारी संख्या. लस घेतलेली एकूण संख्या. टक्केवारी खालीलप्रमाणे.
सातारा - ९८९६ - ३९८३ - ३३७९ - ७३९२ - ७४ %
फलटण - ३७९५ - १३०८ - १३३१ - २६३९ - ७० %
माण- २७०८ - ९६४ - १०८६ - २०५० - ७६ %
पाटण - ३६३९ - १२६३ - १११४ - २३७७ - ६५ %
कोरेगाव - ३०७२ - ११३६ - ६४८ - १७८४ - ५८ %
महाबळेश्वर - १७६० - ५०३ - ७२५ - १२२८ - ७० %
वाई - २७११ - ११९२ - १०७६ - २२६८ - ८४ %
खंडाळा - २०७३ - ९४८ - ९१४ - १८६२ - ९० %
खटाव - ३३२४ - ११२२ - १३१२ - २४३४ - ७३ %
कऱ्हाड - ११२५५ - ५६१७ - १८४० - ७४५७ - ६६ %
जावळी - १८७७ - ६५६ - ८२३ - १४७९ - ७९ %
कोट :
खंडाळा तालुक्यात कोरोना लसीकरण मोहीम सुरळीतपणे सुरु आहे. ग्रामीण रुग्णालयात लसीकरण अधिकारी म्हणून शलाका ननावरे व स्मिता आरडे यांची टीम चांगले काम करीत आहे. काही लोकांना झालेला किरकोळ त्रास वगळता अन्य कोणालाही लसीकरणाचा त्रास झाला नाही. यापुढील मोहीमसुद्धा यशस्वीपणे राबविली जाईल.
- डॉ. रवींद्र कोरडे, वैद्यकीय अधीक्षक, खंडाळा ग्रामीण रुग्णालय
फोटो दि.२१खंडाळा कोरोना फोटो... (फोटो आवश्यक)
फोटो ओळ : जिल्ह्यात कोरोना लसीकरण वेगाने सुरू आहे.
...........................................................