लोणंद ग्रामपंचायतीत राष्ट्रवादीला पडले खिंडार

By admin | Published: March 2, 2015 09:45 PM2015-03-02T21:45:25+5:302015-03-03T00:35:45+5:30

भ्रष्टाचाराचा आरोप : काळभैरवनाथ पॅनेलला चार सदस्यांचा रामराम

Khandar falls in Lonand grampanchayat NCP | लोणंद ग्रामपंचायतीत राष्ट्रवादीला पडले खिंडार

लोणंद ग्रामपंचायतीत राष्ट्रवादीला पडले खिंडार

Next

लोणंद : लोणंद ग्रामपंचायतीत राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत काळभैरवनाथ सत्ताधारी पॅनेलला अडचणीत आणले आहे. स्थानिक नेत्यांची मनमानी, ग्रामपंचायत बैठकीतील ठरावाची अंमलबजावणी होत नाही, यासह अनेक आरोप करत लोणंदचे उपसरपंच गणीभाई कच्छी यांच्यासह लक्ष्मणराव शेळके, सुवर्णा क्षीरसागर, सुरेखा बोडरे तसेच माजी सदस्य विश्वास शिरतोडे या सदस्यांनी सत्ताधारी राष्ट्रवादी पुरस्कृत काळभैरवनाथ पॅनेलला रामराम ठोकला.
यावेळी सदस्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, लोणंदच्या जनतेला १५ वर्षांची भैरवनाथ पॅनेलची सत्ता उलथवून टाकताना राष्ट्रवादी पुरस्कृत काळभैरवनाथ पॅनेलला स्वच्छ कारभार करण्याचे आश्वासन दिले होते; परंतु गेल्या अडीच वर्षांत स्थानिक नेते असणाऱ्यांनी मनमानी व सामान्य जनतेची लूट करणारा भ्रष्ट कारभार चालू आहे. खोकीधारकांची रोजची दहा रुपयांची पावती शंभरापर्यंत वाढवली. घरपट्टी, पाणीपट्टीत भरमसाठ वाढ करून जनतेची लूट चालवली आहे. बाजारतळावरील फ्लड लाईट दिवे, गटार काम, सिमेंट रस्ते या कामामध्ये भ्रष्टाचार झालेला आहे. पेट्रोल पंपावरून खासगी गाड्यांना पेट्रोल, डिझेल पुरवून ग्रामपंचायतींकडून त्याची बिले अदा केली जात आहेत. सध्याचा पेट्रोलपंप बदलून दुसऱ्या पेट्रोलपंपावरून ग्रामपंचायतीने पेट्रोल, डिझेल घेण्याचा सात विरुद्ध दहा असा ठराव होऊनही कोणताच निर्णय झाला नाही, असे आरोप केले आहेत. (वार्ताहर)


ग्रामपंचायत बैठकीत बहुमताने होणाऱ्या ठरावाची अंमलबजावणी केली जात नाही. ग्रामविकास अधिकारी यांची बदली व कारवाईची वेळोवेळी मागणी करूनही याकडे दुर्लक्ष केले जात आहे. नवीन खरेदी करण्यात आलेल्या पाण्याच्या टँकरमध्ये भ्रष्टाचार करण्यात आला असून, त्याचे पुरावे देऊन तक्रार दाखल करणार आहे.
- गणीभाई कच्छी, उपसरपंच


काँगे्रसची भूमिका काय?
लोणंद ग्रामपंचायतीत १७ पैकी ११ जागांवर राष्ट्रवादी पुरस्कृत काळभैरवनाथ पॅनेलने विजय मिळवून सत्ता स्थापित केली होती. आता राष्ट्रवादीचे चार सदस्य फुटल्याने विरोधी राष्ट्रीय काँग्रेस पुरस्कृत भैरवनाथ पॅनेलचे नेते व ग्रामपंचायत सदस्यांची भूमिका काय राहणार, याकडे लोणंदवासीयांचे लक्ष लागले आहे.

Web Title: Khandar falls in Lonand grampanchayat NCP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.