Satara News: पालमध्ये पार पडला खंडोबा-म्हाळसा यांचा विवाह सोहळा, लाखो वऱ्हाडींकडून भंडाऱ्याची उधळण
By ऑनलाइन लोकमत | Published: January 5, 2023 07:50 PM2023-01-05T19:50:00+5:302023-01-05T19:53:04+5:30
अजय जाधव उंब्रज : ‘येळकोट येळकोट जय मल्हारऽऽऽ’चा जयघोष करत अन् पिवळ्या धमक भंडारा व खोबऱ्याच्या तुकड्यांची उधळण करत ...
अजय जाधव
उंब्रज : ‘येळकोट येळकोट जय मल्हारऽऽऽ’चा जयघोष करत अन् पिवळ्या धमक भंडारा व खोबऱ्याच्या तुकड्यांची उधळण करत गुरुवारी खंडोबा-म्हाळसा यांच्या मुखवट्यांचा अनोखा विवाह सोहळा पाल येथे गोरजमुहूर्तावर पार पडला. पिवळ्या धमक भंडाऱ्याच्या उधळणीमुळे सूर्यास्ताची किरणे विवाहाच्या बोहल्यासह पालनगरी सोन्याचीनगरी झाल्याचे दिसत होती.
महाराष्ट्र, कर्नाटकसह आंध्र प्रदेशातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या खंडोबा व म्हाळसा विवाह सोहळ्यासाठी लाखो वऱ्हाडी भाविक पालमध्ये दाखल झाले होते. या काळात कायदासुवस्था ठेवण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा, ग्रामपंचायत, यात्रा कमिटी, देवस्थान ट्रस्ट यांनी यात्रेची तयारी महिन्यापासून केली होती. भाविकांना खंडोबा व म्हाळसा यांच्या मुखवट्याचे व्यवस्थित दर्शन व्हावे यासाठी दर्शनबारीची सोय केली होती.
प्रशासनातर्फे जादा पोलिस फौजफाटा तैनात केला होता. पोलिस प्रशासनाने आपत्कालीन जलद कृती दल, जमाव नियंत्रण पथक तैनात केले होते. जिल्हा प्रशासनाचे आपत्कालीन पथक, अग्निशामकदलाची पथके, आरोग्य पथके, रुग्णवाहिका सज्ज ठेवली होती.
परंपरेनुसार दुपारी एकच्या सुमारास देवस्थान ट्रस्टने बनवलेल्या सागवानी रथातून मिरवणुकीस कऱ्हाड पंचायत समितीचे माजी सभापतीप्रमुख मानकरी देवराज पाटील यांच्या वाड्यापासून सुरुवात झाली. देवळात आरती केल्यानंतर प्रमुख मानकरी देवराज पाटील खंडोबा व म्हाळसा यांचे मुखवटे पोटाला बांधून रथात बसले. सर्व मानाचे गाडे, मानकरी यांच्यासह मिरवणूक बोहल्याकडे निघाली. यळकोट यळकोट जय मल्हार असा जयघोष करीत भाविक भंडारा, खोबऱ्यांची उधळण करत होते.
ही शाही मिरवणूक तारळी नदी ओलांडून विवाह मंडपात बोहल्यावर पोहोचली. त्यानंतर वऱ्हाडी मंडळीचा मानपानाचा विधी उरला. गोरज मुहूर्तावर श्री खंडोबा व म्हाळसा विवाह सोहळा पार पडला. यावेळी भंडाऱ्याच्या उधळणीमुळे पालनगरी सोनेरी झाल्याचे चित्र दिसून येत होते.