खंडाळ्यातील ३६ हजार सातबारा उतारे कोरे!
By admin | Published: September 11, 2015 09:10 PM2015-09-11T21:10:56+5:302015-09-12T00:10:58+5:30
पुनर्वसनाचा शिक्का काढला: पाणीटंचाई आढावा बैठकीत मकरंद पाटील यांच्या इतरही सूचना
खंडाळा : खंडाळा तालुक्यात यावर्षी पावसाने पाठ फिरवल्यामुळे पाण्याअभावी पिकांची परिस्थिती गंभीर आहे. धोम-बलकवडी प्रकल्पाचे पाणी सध्या तालुक्यात पोहोचले आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्याची समस्या सध्यातरी जाणवत नाही; परंतु जानेवारीनंतरही पाण्याचा प्रश्न उद्भवू नये, यासाठी संभाव्य टंचाईच्या पार्श्वभूमीवर अधिकाऱ्यांनी सतर्क राहावे. गावोगावी आवश्यक उपाययोजनांचा आराखडा तयार करून घ्यावा,’ असे आवाहन आमदार मकरंद पाटील यांनी केले. दरम्यान, यावेळी ३६ हजार सातबारा उताऱ्यांवरील पुनर्वसनाचे शिक्के काढण्यात आले. त्याचे वाटपही झाले.खंडाळा पंचायत समितीच्या सभागृहात पाणीटंचाई आढावा बैठकीत ते बोलत होते. प्रांताधिकारी रवींद्र खेबुडकर, तहसीलदार शिवाजी तळपे, सभापती रमेश धायगुडे, उपसभापती सारिका माने, सदस्य दीपाली साळुंखे, अनिरुद्ध गाढवे, जिल्हा बँक संचालक दत्तानाना ढमाळ, गटविकास अधिकार विलास साबळे, चंद्रशेखर म्हेत्रे आदी उपस्थित होते.आमदार पाटील म्हणाले, ‘तालुक्यात टंचाई जाणवत नसली तरी उपलब्ध पाणीसाठ्याचा वापर गरजेपुरता आणि काटकसरीने केला पाहिजे. यावर्षी पाऊस कमी असल्याने भविष्यात पिण्याच्या पाण्याची व जनावरांच्या चाऱ्याची समस्या निर्माण होऊ शकते. त्यामुळे पुढील धोका टळण्यासाठी अधिकाऱ्यांनी पाण्याचे नियोजन करावे. धोम-बलकवडीचे पाणी शिवारात पोहोचले नसते तर बिकट परिस्थती उद्भवली असती. यापुढे खंडाळ्याच्या हक्काचे पाणी देण्याचाही प्रयत्न केला जाणार आहे. गावोगावच्या पाणी स्त्रोताचे सर्वेक्षण करून ठेवावे. टंचाईच्या काळात कोणाचीही वीज कनेक्शन तोडण्यात येऊ नयेत. इंधन विहिरींची तातडीने दुरुस्ती करण्यात यावी. जनावरांना पुरेसा चारा उपलब्ध व्हावा. यासाठीच्या उपाययोजना आतापासून करण्याची गरज आहे.तालुक्यातील सर्व गावांतील सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक यांच्याकडून सध्याच्या पाणी परिस्थतीचा आढावा घेण्यात आला. सरपंचांच्या मागणीनुसार सर्वेक्षण नियोजन करण्यात आले. तालुका कृषी अधिकारी शिवाजी मांगले यांनी पीक परिस्थितीचा आढावा दिला. बाजरीचे पीक वगळता अन्य पिकांची स्थिती अतिशय बिकट आहे. त्यामुळे उत्पन्न घटणार आहे. त्यामुळे धान्याचेही नियोजन करणे गरजेचे आहे.’
यावेळी तालुक्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांचीही उपस्थिती मोठी होती. तहसीलदार शिवाजीराव तळपे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. (प्रतिनिधी)
तिसरा टप्प्याला विरोध...
खंडाळा तालुक्यातील खंडाळा, शिवाजीनगर, मोर्वे, हरळी, अहिरे, बावडा, म्हावशी या गावातून होणाऱ्या एमआयडीसीच्या तिसऱ्या टप्प्याला शेतकऱ्यांचा विरोध आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या संमतीशिवाय भूसंपादन केले जाऊ नये, बागायती जमिनी घेतल्या जाणार नाहीत. यासाठी आमदार मकरंद पाटील यांनी परखड भूमिका घेतली. त्याचबरोबर तालुक्यतील ३६ हजार सातबाराच्या उताऱ्यावरील पूनर्वसनाचे शिक्के काढण्यात आले. त्याचे वाटपही करण्यात आले.