खरीप पिकांवर संक्रांत !
By admin | Published: July 11, 2017 02:34 PM2017-07-11T14:34:34+5:302017-07-11T14:34:34+5:30
खटाव तालुका : पाऊस लांबल्याने दुबार पेरणीचे संकट
खटाव : पावसाने ओढ दिल्याने खटाव तसेच परिसरात खरिपाच्या पेरण्या पूर्ण करुन बसलेल्या शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढावले आहे. गेल्या एक महिन्यांपासून पूर्वेकडील माण, खटाव तालुक्याकडे पावसाने पाठ फिरवल्याने शेतकरी चिंतातूर झाले आहेत.
पावसाळा सुरू होताच खटावसह परिसरात चार ते पाच वेळा पावसाने हजेरी लावली. या पावसामुळे जमीनीत ओलावा निर्माण झाल्याने अनेक शेतकऱ्यांनी खरीपाच्या पेरण्या पूर्ण केल्या. परंतु पेरणीनंतर अपेक्षीत असणारा पाऊसच लांबल्यामुळे शेतकरी वर्गाच्या आशा फोल ठरु लागल्या आहेत.
ऐन पावसाळ्यात कडक ऊन पडू लागल्याने जमीनीतील ओलावा सुध्दा हळूहळू कमी होऊ लागला आहे. त्यामुळे उगवुन आलेले पीक माना टाकत आहे. बऱ्याच ठिकाणी जमिनीतून कोंबही बाहेर आले नसल्यामुळे शेतकरी चिंतातुर झाला आहे. शेतकरी वगार्ने महागाईचे बीयाणे विकत घेऊन पेरणी केली आहे. त्यामुळे आर्थिक संकट समोर आहेच त्याच बरोबर खरीप हंगाम पुन्हा वाया जातो की काय? अशी भितीही व्यक्त केली जात आहे.
आर्थिक नुकसानीची भीती
खटावसह परिसरातील बहुतांश शेतकऱ्यांनी यंदा वाघा घेवड्याची लागण मोठ्या प्रमाणात केली असून अनेकांना सोयाबीनही पेरला आहे. परंतु निसर्गाच्या लहरीपणाचा फटका शेतकऱ्याला सोसावा लागतो की काय अशी सध्या स्थिती निर्माण झाली आहे. हे वातावरण राहीले तर शेतकरी वगार्ला आर्थिक संकटाला तोंड तर द्यावेच लागेल त्याबरोबर दुबार पेरणीच्या संकटाचा सामनाही करावा लागेल.