बँकांची कोंडी : खरीप नियोजन लॉकडाऊन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2020 10:21 PM2020-05-26T22:21:21+5:302020-05-26T22:22:31+5:30
नितीन काळेल । सातारा : कोरोनाचा परिणाम सर्वच घटकांवर झाला असून, बळीराजालाही खरीप हंगामासाठी पीक कर्ज घेताना अडथळ्यांचा सामना ...
नितीन काळेल ।
सातारा : कोरोनाचा परिणाम सर्वच घटकांवर झाला असून, बळीराजालाही खरीप हंगामासाठी पीक कर्ज घेताना अडथळ्यांचा सामना करावा लागतोय. एकीकडे बँका कर्जवाटपासाठी सज्ज असल्यातरी शेतकरी लॉकडाऊनमुळे तिथपर्यंत पोहोचतच नाही. त्यामुळे बँकांना २ हजार २७० कोटींचे टार्गेट असलेतरी आतापर्यंत फक्त ३७६ कोटी रुपये वाटप झाले आहे. हे प्रमाण अवघे १७ टक्के आहे.
जिल्ह्यात खरीप हंगामाचे क्षेत्र साडेतीन लाख हेक्टरहून अधिक आहे. यामध्ये भात, सोयाबीन, बाजरी, भुईमूग अशी महत्त्वाची पिके घेण्यात येतात. खरीप हंगामासाठी शेतकरी विविध बँका, सोसायट्यांकडून कर्ज घेतो. त्यानंतर या कर्जाची फेडही होते. दरवर्षी एप्रिलपासून शेतकऱ्यांना कर्जपुरवठा करण्यास प्रारंभ होतो. सप्टेंबर अखेरपर्यंत खरीप हंगामाचा कर्ज पुरवठा होतो. त्यासाठी विविध बँकांना उद्दिष्टही देण्यात येते. यंदाच्या खरीप हंगामासाठी एप्रिल ते सप्टेंबर या काळासाठी जिल्ह्यातील जवळपास ३५ बँकांना २ हजार २७० कोटी रुपये कर्ज वाटपाचे उद्दिष्ट दिले आहे.
त्यापैकी ११०० कोटींचे उद्दिष्ट हे जिल्हा बँकेला आहे. आतापर्यंत सर्व बँकांनी मिळून ३७६ कोटी रुपयांचे कर्ज वाटप शेतकऱ्यांना केलेले आहे. यामध्ये जिल्हा बँकेने सर्वाधिक ३५७ कोटी रुपयांचे वाटप शेतकºयांना केलंय. सरासरी पाहिली तर आतापर्यंत फक्त १७ टक्केच कर्ज वाटप झालेले आहे. तर ७४ हजार ७९८ शेतकºयांनी पीक कर्ज घेतलेले आहे.
कोरोना विषाणूमुळे लॉकडाऊन असल्याने बहुतांशी शेतकºयांना बँकांपर्यंत पोहोचताच येत नाही. त्यातच विविध कागदपत्रेही लागतात. अशा प्रकारामुळे खरीप हंगामासाठी कर्ज मिळविताना शेतक-यांना अनेक अडथळ्यांची शर्यत पार पाडावी लागत आहे. कोरोनाचे संकट दूर होत नाही, तोपर्यंत बळीराजाची ही परवड सुरूच राहणार आहे.
कारण, एकीकडे बँका खरीप हंगामासाठी कर्ज देण्यास सज्ज असताना बळीराजाला गावच सोडता येत नाही. त्यातच बँकांमध्येही पैसे काढणे आणि भरणे अशीच कामे मोठ्या प्रमाणात सुरू असल्याचे दिसते. कर्ज विभाग हा तात्पुरताच सुरू असतो. त्यामुळे कोरोना विषाणूचे संकट कमी झाल्यानंतरच बळीराजाची पावले बँका, सोसायट्यांकडे वळतील, अशी सद्य:स्थिती आहे.
जिल्ह्यातील खरीप हंगामासाठी बँकांना २२७० कोटींचे पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट आहे. आतापर्यंत ७४ हजारांवर शेतकऱ्यांना ३७६ कोटींचे वाटप झालेले आहे. कोरोना स्थितीमुळे वाटपाचे प्रमाण कमी आहे. बँकांनीही मेळावे घेऊन शेतकऱ्यांना अधिकाधिक कर्जपुरवठा करून उद्दिष्टपूर्ती करावी.
- महादेव शिरोळकर, जिल्हा व्यवस्थापक, अग्रणी बँक. बँक आॅफ महाराष्ट्र