पावसाने उघडीप दिल्याने खरीप हंगाम संकटात
By admin | Published: July 25, 2016 10:27 PM2016-07-25T22:27:13+5:302016-07-25T23:42:55+5:30
वाई तालुका : अंतर्गत मशागतीच्या कामांना वेग; सोयाबीन, मूग, चवळी, भुईमूग, हळद पिकांना दिलासा
पसरणी : वाई तालुक्यात उशिरा पावसाने जरी सुरुवात केली असली तरीही या तालुक्यातील शेतकऱ्यांनी थोडी जोखीम घेतल्याने व धूळफेक पेरणी केल्याने आज पिकांची उगवण चांगली झाली आहे. सध्या खरीप हंगाम चांगलाच जोमात आहे शेतीची अंतर्गत मशागत चालू आहे. तर दुसऱ्या बाजूला पावसाने उघडीप दिल्याने बळीराजा चिंतेत आहे. निसर्गाने साथ न दिल्यास व थोड्या दिवासांत पाऊस पडला नाहीतर खरीप हंगाम वाया जाण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.
सध्या अंतर्गत मशागत चालू आहे. पाऊस वेळेत न पडल्यास हाताशी आलेले पीक वाया जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्याचा उत्पन्नावर मोठा विपरीत परिणाम होऊ शकतो. सध्या जरी पावसाने साथ दिली असली तरीही दमदार पावसाच्या प्रतीक्षेत हा तालुका आजही आहे. तालुक्यातील धरणांची पातळी आजही खालावलेली आहे.
पावसाचे काही महिने बाकी असले तरीही तालुक्यातील धरणे पूर्ण क्षमतेने न भरल्यास भयानक दुष्काळाची परिस्थिती निर्माण होऊ शकते. तसेच कृषी विभागानेही पुढचे पाऊल टाकत पिकांचा विमा उतरविण्याचा आग्रह शेतकऱ्यांकडे केला आहे. त्यावर बळीराजाने सकारात्मक विचार करावा, असे आवाहनही कृषी विभागाकडून करण्यात आले आहे.
तालुक्यात सोयाबीन, हिरवा मूग, चवळी, भुईमूग, बाजरी, हळद, ऊस या सर्व पिकांची परिस्थिती चांगली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. (प्रतिनिधी)
पंतप्रधान पीक विमा योजना सुरू
२०१६ खरीप हंगामासाठी पंतप्रधान पीक विमा योजना लागू झाली असून, या योजनेअंतर्गत कर्जदार शेतकऱ्यांना हा विमा उतरवणे बंधनकारक आहे. बिगर कर्जदार शेतकऱ्यांसाठी ऐच्छिक आहे. शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेऊन आपल्या पिकाचा विमा उतरविण्यात यावा, असे आवाहन तालुका कृषी अधिकारी राजेंद्र कांबळे यांनी केले आहे.