जिल्ह्यात अडखळत खरीपची पेरणी ८१ टक्के पूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 9, 2021 04:25 AM2021-07-09T04:25:18+5:302021-07-09T04:25:18+5:30

सातारा : जिल्ह्याच्या पश्चिम भागात चांगला पाऊस झाला असला तरी पूर्वेकडे अजूनही समाधानकारक पाऊस झालेला नाही. त्यामुळे खरीप हंगामातील ...

Kharif sowing in the district is 81 percent complete | जिल्ह्यात अडखळत खरीपची पेरणी ८१ टक्के पूर्ण

जिल्ह्यात अडखळत खरीपची पेरणी ८१ टक्के पूर्ण

Next

सातारा : जिल्ह्याच्या पश्चिम भागात चांगला पाऊस झाला असला तरी पूर्वेकडे अजूनही समाधानकारक पाऊस झालेला नाही. त्यामुळे खरीप हंगामातील पेरणी रडतखडत सुरू असून, आतापर्यंत ८१ टक्के पेरणी पूर्ण झाली आहे. यामध्ये सोयाबीनची सर्वाधिक १०५ टक्के पेरणी झाली आहे. सोयाबीनचा ६७ हजार हेक्टवर पेरा आहे तर बाजरीची पेरणी अवघी ५७ टक्के आहे. अनेक ठिकाणी पाऊसच झाला नसल्याने पेरणी खोळंबली आहे.

जिल्ह्यातील खरीप हंगाम सर्वात मोठा असतो. या हंगामातील जिल्ह्याचे ऊस वगळून सर्वसाधारण क्षेत्र ३ लाख १६ हजार ७०१ हेक्टर आहे. यामध्ये बाजरीचे क्षेत्र सर्वाधिक ६४ हजार हेक्टर आहे तर सोयाबीन ६३,७५४, भात ४९ हजार, भुईमूग ३८,२२७, ज्वारी २४,२०३, मका १८,५९८, नाचणी ५,८८७ हेक्टर असे प्रमुख पिकांचे क्षेत्र आहे. गळीतधान्याचे क्षेत्र हे १ लाख ४ हजार हेक्टरवर आहे. ही पिके विविध तालुक्यांत पावसाच्या प्रमाणात घेतली जातात. पूर्व भागात बाजरी हेच प्रमुख पीक राहते. त्याचबरोबर मका, सोयाबीन अन् गळीतधान्ये काही प्रमाणात घेतली जातात. तर पश्चिमेकडे भात, सोयाबीन, ज्वारी, भुईमूग या पिकांना प्राधान्य दिले जाते.

जिल्ह्यात आतापर्यंत पावसाचे प्रमाण विसंगत राहिले आहे. पूर्व भागात वळवाचा आणि मान्सूनपूर्व पाऊस कमी झाला तर मान्सूननेही दमदार हजेरी लावली नाही. आता तर पावसाचा खोळंबा आहे. याचवेळी पश्चिम भागात मागील २० दिवसांपूर्वी दमदार पाऊस झाला होता, त्यामुळे पेरण्या सुरू आहेत. काही ठिकाणच्या पेरण्या पूर्णही झाल्या असून, भांगलणीची कामे सुरू आहेत. मात्र, अनेक ठिकाणी पाऊस नसल्याने पेरणी खोळंबली आहे.

जिल्ह्याचे खरीप हंगामातील एकूण सर्वसाधारण क्षेत्र ऊस वगळून ३ लाख १६ हजार हेक्टरवर असले तरी आतापर्यंत २ लाख ५५ हजार ८७१ हेक्टरवर पेरणी झाली आहे. एकूण टक्केवारीत हे प्रमाण ८०.७९ आहे. आतापर्यंत सातारा तालुक्यात ७५.४१ टक्के क्षेत्रावर पेरणी झाली आहे. तर जावळीत ६६.४० टक्के, पाटणला ९७ टक्के क्षेत्रावर पेरणी झाली. कऱ्हाडला ७५ टक्के, कोरेगाव ९०, खटाव ६५, माण १०१, फलटण ८०, खंडाळा ६१, वाई ६६ आणि महाबळेश्वर तालुक्यात ५३ टक्के क्षेत्रावर पेरणी झाली आहे.

..........................................

Web Title: Kharif sowing in the district is 81 percent complete

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.