वरुणराजा पावला; सातारा जिल्ह्यात खरीप पेरणी १०६ टक्के
By नितीन काळेल | Published: August 26, 2024 07:16 PM2024-08-26T19:16:59+5:302024-08-26T19:17:48+5:30
३ लाख हेक्टरवर पिकाखालील क्षेत्र : सात तालुक्यांत १०० टक्क्यांवर पेर; उत्पादनाकडून आशा
सातारा : जिल्ह्यात जूनपासूनच वरुणराजा प्रसन्न झाल्याने यावर्षी खरीप हंगामातील पेरणी १०६ टक्के झाली आहे. ३ लाख ५ हजार हेक्टर क्षेत्र पिकाखाली आहे. तर जिल्ह्यातील ७ तालुक्यांत १०० टक्क्यांवर पेरणी झालेली आहे. यावर्षी पिकांची स्थिती पाहता शेतकऱ्यांना उत्पादनाकडून आशा आहे.
जिल्ह्यातील खरीप हंगाम पूर्णपणे पावसावर अवलंबून असतो. जून महिन्यात मान्सूनचा पाऊस वेळेत दाखल झाला की पेरणीलाही सुरूवात होते. मागील तीन वर्षांचा अनुभवत पाहता यंदा मान्सूनचा पाऊस जून महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात दाखल झाला. त्यानंतर जिल्ह्यात सर्वत्र पावसाने समाधानकारक हजेरी लावली. त्यामुळे जूनच्या मध्यापासूनच खरीप पेरणीला सुरूवात झाली. खरीपातील पेरणी पूर्ण झाली आहे. यंदा १०६ टक्के पेरणी झाली तर ३ लाख ५ हजार ७८८ हेक्टर क्षेत्र पिकाखाली आहे.
जिल्ह्यात खरीप हंगामात भात, बाजरी, सोयाबीन, मका, खरीप ज्वारी, भुईमूग आदी प्रमुख पिके घेतली जातात. खरीपचे सर्वसाधारण क्षेत्र २ लाख ८८ हजार ४९४ हेक्टर निश्चीत करण्यात आलेले. यामध्ये सोयाबीनचे सर्वाधिक ७४ हजार ८०० हेक्टर होते. तर बाजरीचे ६० हजार ७३४ हेक्टर, भाताचे सुमारे ४४ हजार हेक्टर, खरीप ज्वारी ११ हजार, मका १५ हजार, भुईमुगाचे २९ हजार ४३५ हेक्टर असे क्षेत्र निश्चीत होते. तर नागली, मूग, उडीद, तीळ, कारळा, सूर्यफूल यांचे क्षेत्रही जिल्ह्यात असते. पण, इतर प्रमुख पिकांच्या तुलनेत यांचे प्रमाण कमी असते. जिल्ह्यात यावर्षीही सोयाबीनच्या क्षेत्रात वाढ झालेली आहे. ९६ हजार हेक्टरवर पीक आहे.
सोयाबीन पेरणीची टक्केवारी १२८ इतकी झाली आहे. भाताची लागण ४२ हजार ६०४ हेक्टरवर आहे. ९७ टक्के क्षेत्रावर लागण झालेली आहे. बाजरीचे क्षेत्रात यंदाही घट आहे. ७३ टक्के क्षेत्रावरच पेर झालेली आहे. त्यामुळे बाजरीचे ४४ हजार हेक्टर क्षेत्र राहिले आहे. खरीप ज्वारी क्षेत्रातही घट आहे. ६१ टक्के क्षेत्र असून ६ हजार ८५८ हेक्टरवर पेरणी पूर्ण झाली आहे. मका क्षेत्रात वाढ होत चालली आहे. सुमारे २२ हजार हेक्टरवर पेर झाली आहे. मकेची १४३ टक्के पेरणी झाली आहे. भुईमुगाचे २७ हजार ४९५ हेक्टरवर पेरणी झाली. ९३ टक्के पेरणीचे प्रमाण आहे.
यावर्षी पाऊस चांगला असूनही तूर क्षेत्र कमीच राहिले आहे. ४९ टक्के क्षेत्रावर पेरणी झाली. तर अवघे ४७९ हेक्टर क्षेत्रात तूर आहे. मुग पेरणी वाढली आहे. मुगाची १२ हजार हेक्टरवर पेरणी झाली. तर उडीदही सुमारे चार हजार हेक्टरवर आहे. उडीद क्षेत्राची टक्केवारी १८० इतकी झाली आहे. तीळाची अवघी २८ तर कारळजाची २१ हेक्टरवर पेरणी झालेली आहे.
मका अन् सोयाबीन क्षेत्रात वाढ..
जिल्ह्यात आतापर्यंत सर्वच तालुक्यात चांगला पाऊस झालेला आहे. त्यामुळे कोरेगाव, खटाव, माण, फलटण, खंडाळा, वाई आणि महाबळेश्वर या तालुक्यात १०० टक्क्यांवर पेरणी झाली. यामध्ये खंडाळा तालुक्यात सर्वाधिक १४३ टक्क्यांवर पेर आहे. तर सातारा तालुक्यात ९८, जावळीत ९९, पाटण आणि कऱ्हाड तालुक्यात प्रत्येकी ९६ टक्के पेरणी आहे. जिल्ह्यातील माण, खटाव, फलटण, खंडाळा तालुक्यात बाजरी पीक महत्वाचे असते. पण, यंदा फलटण वगळता इतर तालुक्यांत बाजरी क्षेत्रात घट आहे. सातारा, जावळी तालुक्यात भात क्षेत्रात वाढ झाली आहे. माण, खटाव, फलटण तालुक्यात मका क्षेत्रात वाढ झाली आहे. तसेच पाटण, कऱ्हाड, कोरेगाव, खटाव या तालुक्यात सोयाबीन क्षेत्रात वाढ झाली आहे.