खारीक कवडीमोल दरात
By Admin | Published: July 10, 2015 10:14 PM2015-07-10T22:14:49+5:302015-07-10T22:14:49+5:30
गावोगावी फिरून विक्री : उत्पादन वाढल्याचा परिणाम; कऱ्हाड तालुक्यात ट्रक दाखल
कोपर्डे हवेली : महागडी मिळणारी खारीक राजस्थानमध्ये अतिरिक्त उत्पादन झाल्यामुळे गावोगावी कवडीमोल दराने विकली जात आहे. राजस्थानमधील काही किरकोळ व्यापारी खारीकचे ट्रक भरून कऱ्हाड तालुक्यात दाखल झाले आहेत. हे व्यापारी गावोगावी फिरून खारीकची विक्री करीत आहेत. ग्राहकांकडूनही त्याला चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे दिसत आहे.
खारीक महागडी असल्याने खरेदी करणाऱ्यांची संख्या मर्यादित असते. बारा महिने बाजारपेठेत खारीक उपलब्ध असते; पण किंमत जास्त असल्याने अनेकजण खारीक खरेदी करण्याचे टाळतात. खारीक पौष्टीक असल्याने खुराक म्हणूनही त्याचा वापर होतो. लहान मुलांची वाढ चांगली होण्यासाठी त्यांना खारीक खायला दिली जाते. तसेच उपवासाच्या कालावधीत श्रावण महिन्यामध्ये खारीक जास्त दराने विकली जाते. त्यावेळी मागणीही जास्त असल्याने विक्रेते त्याचा फायदा घेत खारीकचा दर वाढवतात. मात्र, तरीही ती हमखास खरेदी केली जाते. एरव्हीही खारकेचे दर कायमच जास्त राहिलेले आहेत. ८० रूपयांपासून १२० रूपयांपर्यंत खारकेचा किलोचा दर असतो.
राजस्थान, गुजरात आदी राज्यांमध्ये खारीकचे उत्पादन घेतले जाते. यावर्षी संबंधित राज्यामध्ये खारीकचे उत्पादन जास्त झाल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे राजस्थानातून खारीकचे ट्रक घेऊन व्यापारी सध्या कऱ्हाड तालुक्यातील ग्रामीण भागात दाखल झाले आहेत. कऱ्हाडात आल्यानंतर हे व्यापारी लहान वाहनातून गावोगावी फिरत आहेत.
या व्यापाऱ्यांनी खारीकच्या एक किलोच्या पिशव्यांमध्ये पॅकिंग बनविले आहे. किलोचा दर ५० रूपये त्यांच्याकडून सांगितला जातो. मात्र काहीवेळेस ४० रूपयांनी विक्रेते घेवून त्याची विक्री करत आहेत. मसूर, उंब्रज, कोपर्डे हवेली परिसरात खारीकची विक्री लहान टेम्पोतून होत आहे. गावात असा टेम्पो दाखल होताच ग्राहक खरेदी करीत आहेत. (वार्ताहर)
रमजानमुळे मागणी...
मुस्लिम बांधवांचा रमजान महिना सध्या सुरू आहे. या महिन्यात मुस्लिम बांधव उपवास करतात. या उपवासादरम्यान मुस्लिम बांधव खारीक खातात. त्यामुळे खारीकला या महिन्यात चांगली मागणी असते. सध्या गावोगावी खारीक कमी किंमतीत मिळत असल्याने त्याला मागणी वाढली आहे. तसेच मुस्लिम बांधवांच्या या उपवासाची सांगता रमजान ईदला होत असते. यादिवशी प्रत्येक कुटूंबात शिरर्खुरमा बनविला जातो. हा शिरर्खुरमा बनविण्यासाठीही खारीकचा वापर केला जातो.