वाढदिनी दुष्काळग्रस्तांना खाऊचा वाटा!
By admin | Published: September 17, 2015 10:57 PM2015-09-17T22:57:10+5:302015-09-18T23:37:26+5:30
‘अभिनव’ उपक्रम : ‘लोकमत बालविकास मंच’चा सदस्य बोभाटेने दिले पैसे -- गूड न्यूज
जगदीश कोष्टी --- सातारा ‘दुष्काळग्रस्तांसाठी मदत करा,’ अशी चळवळ ‘लोकमत’ सुरू करताच अनेकजण या मोहिमेत सहभागी होण्यासाठी पुढे आहेत. साताऱ्यातील अभिनव बोभाटे या चौथीतील मुलाने खारीचा वाटा उचलला आहे. अभिनवने वाढदिवसाला खाऊसाठी म्हणून आलेली रक्कम दुष्काळग्रस्तांचे अश्रू पुसण्यासाठी मुख्यमंत्री सहायता निधीला दिली. ही रक्कम निवासी जिल्हाधिकारी संजीव देशमुख यांच्याकडे प्रदान केली.‘देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे... घेणाऱ्यांने घेता-घेता देणाऱ्याचे हात घ्यावे,’ असं म्हटलं जातं. निसर्गाची चक्र फिरल्यामुळे राज्यावर बहुतांश जिल्ह्यांवर दुष्काळाचे ढग जमायला लागले आहेत. त्यामुळे अन्नदाता अडचणीत आला आहे. पाऊस पडेल, या आशेवर त्याने पेरण्याही केल्या; मात्र पावसाअभावी पेरण्या वाया गेल्या आहेत. यासंदर्भात ‘लोकमत’ने दुष्काळग्रस्तांसाठी मदतीसाठी ‘बाप्पाच्या मंडपात माणुसकीचा जागर’ ही मोहीम सुरू केली. शेकडो गणेश मंडळे पुढे सरसावली आहेत. डॉल्बीसह इतर खर्च कमी करून दुष्काळग्रस्तांसाठी मदत केली आहे. याच संस्कारातून घडलेला साताऱ्यातील अभिनव बोभाटे या मुलाने वाढदिवसाला खाऊसाठी आलेला पैसादुष्काळग्रस्तांसाठी देण्याचा निर्णय घेतला. अभिनव हा साताऱ्यातील प्राथमिक सैनिक स्कूलमध्ये इयत्ता चौथीत शिकत आहे. मंगळवार, दि. १ सप्टेंबरला त्याचा वाढदिवस होता. वाढदिवस साजरा करत असताना शेजार-पाजारचे, नातेवाईक खाऊसाठी पैसे देत होते. हे पैसे अभिनवने न खर्च करता दुष्काळग्रस्तांसाठी देण्याचा हट्ट आई-वडिलांकडे धरला. चिमुकल्याचा हा हट्ट पूर्ण करत अभिनवला घेऊन त्याचे आई-वडील दोघेही बुधवार, दि. १६ रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात आले. त्यांनी येताना पाचशे रुपयांचा धनादेश व एक पत्र आणले होते. पाचशे रुपयांचा धनादेश निवासी जिल्हाधिकारी संजय देशमुख यांच्याकडे सुपूर्द केला. तेथून बाहेर आल्यानंतर या चिमुकल्याच्या चेहऱ्यावरचा आनंद गगनात मावत नव्हता.
‘लोकमत’कडून प्रेरणा--अभिनव बोभाटे याचे वडील बापूसाहेब हे ग्रामसेवक असून ते अपंग साहित्य संमेलन भरवत असतात. अभिनव हा ‘लोकमत’चा वाचक असून तो बालविकास मंचचा सदस्य आहे. ‘लोकमत’ने सुरु केलेल्या मोहिमेमुळे पेरित झालेल्या अभिनवने वाढदिवस साध्या पद्धतीने साजरा केला. कपडे, केक, मित्रांना पार्टी देण्यासाठी केला जात असलेल्या खर्चात कपात करुन पाचशे रुपयांची मदत दुष्काळग्रस्तांसाठी दिली आहे.
अभिनव बोभाटे हा सर्वसामान्य कुटुंबातील मुलगा आहे. त्याने दिलेली मदत लाख मोलाची आहे. वाढदिवसाला जमा झालेली रक्कम दुष्काळग्रस्तांसाठी द्यावी, असं वाटणंच महत्त्वाचे आहे.
- संजीव देशमुख, निवासी उपजिल्हाधिकारी