कोरोनाला रोखण्यासाठी खटाव पाच दिवस बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2021 04:38 AM2021-04-18T04:38:11+5:302021-04-18T04:38:11+5:30
खटाव : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव तसेच बाजारपेठ खुली असल्यामुळे अत्यावश्यक सेवेच्या नावाने वाढणाऱ्या गर्दीमुळे खटावमध्ये कोरोनाच्या रुग्ण संख्येत वाढ ...
खटाव : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव तसेच बाजारपेठ खुली असल्यामुळे अत्यावश्यक सेवेच्या नावाने वाढणाऱ्या गर्दीमुळे खटावमध्ये कोरोनाच्या रुग्ण संख्येत वाढ होत आहे. यामुळे खटाव ग्रामपंचायत तसेच ग्रामस्तरीय समितीच्यावतीने कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी १८ ते २२ एप्रिल दरम्यान पूर्णपणे लॉकडाऊन म्हणजेच जनता कर्फ्यू होणार आहे. याबाबत ग्रामपंचायतीच्यावतीने ध्वनीक्षेपकाच्या माध्यमातून जाहीर आवाहन करण्यात येत आहे.
खटाव गावामध्ये कोरोना रुग्ण जास्त प्रमाणात सापडू लागले आहेत. तसेच गृह विलगीकरणात असणारे नागरिकही रस्त्यावर बेधडक फिरत असल्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे. कोरोनाची वाढती रुग्ण संख्या ही खटावकरांच्या दृष्टीने अत्यंत चिंतेची बाब बनली आहे. त्यामुळे कोरोनाची साखळी तोडण्यासाठी खटाव ग्रामपंचायत आणि ग्रामस्तरीय समितीने खटाव बंदचा निर्णय घेतलेला आहे.
ग्रामपंचायतीच्यावतीने संपूर्ण गावात असलेल्या दुकानदारांना बंद संदर्भात सरपंच, उपसरपंच तसेच सदस्य आवाहनही करताना दिसून येत आहेत.
खटाव ग्रामस्थांनी शासनाचे सर्व नियम पाळून ग्रामपंचायतीस व ग्रामस्तरीय समितीला सहकार्य करावे. विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्यांवर ग्रामपंचायतीच्यावतीने दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे.
कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे रविवार ते गुरुवार सर्व दुकाने कडक बंद राहतील. फक्त दवाखाने, मेडिकल व डेअरी व्यवसाय सुरू राहणार आहे. नियमांचे उल्लंघन करेल त्यांच्यावरती कडक कारवाई करण्यात येईल, असा इशारा ग्रामपंचायतीच्यावतीने सरपंच नंदकुमार वायदंडे, उपसरपंच अमर देशमुख यांनी दिला आहे.
फोटो आहे...