खटाव तालुक्यात राष्ट्रवादीच्या बरोबरीने महाविकास आघाडी जोमात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2021 04:40 AM2021-01-19T04:40:07+5:302021-01-19T04:40:07+5:30
वडूज : खटाव तालुक्यातील ९० ग्रामपंचायतींपैकी १४ ग्रामपंचायती बिनविरोध झाल्यानंतर ग्रामपंचायत मतदानानंतर ७६ ग्रामपंचायतींवर राष्ट्रवादीच्या बरोबरीने महाविकास आघाडीने सत्ता ...
वडूज : खटाव तालुक्यातील ९० ग्रामपंचायतींपैकी १४ ग्रामपंचायती बिनविरोध झाल्यानंतर ग्रामपंचायत मतदानानंतर ७६ ग्रामपंचायतींवर राष्ट्रवादीच्या बरोबरीने महाविकास आघाडीने सत्ता काबीज केली, तर सात ठिकाणी भाजपने मुसंडी मारत नेत्रदीपक विजय मिळविला, तर उर्वरित १३ ग्रामपंचायतींवर पक्षविरहित स्थानिक पॅनलने विजय प्राप्त केला. त्यामुळे राष्ट्रवादीच्या बरोबरीने महाविकास आघाडी जोमात असल्याचे चित्र स्पष्ट झाले.
तीन विधानसभा मतदारसंघांत विभागलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी व महाविकास आघाडीने सत्ता काबीज केली, तर राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असलेल्या एनकुळ, डांभेवाडी ग्रामपंचायतींमध्ये भाजपने जोरदार मुसंडी मारली. पुसेगाव, कलेढोण या दोन मोठ्या ग्रामपंचायतींमध्ये सत्ताधाऱ्यांना डावलून विरोधी पक्षाने एकहाती सत्ता मिळवली. राष्ट्रवादी पक्षाच्या २७, महाविकास आघाडीच्या १६, भाजप ७, काँग्रेस २ व इतर १३ असे बलाबल झाले आहे. माण मतदारसंघात राष्ट्रवादी व महाविकास आघाडीने सत्ता स्थापनेत बाजी मारली असली तरी भाजपने राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यातच खिंडार पाडण्यात यश मिळविले आहे, तर बहुतांश गावांमध्ये पक्षविरहित स्थानिक नेतृत्वाला मतदारांनी संधी दिली आहे.
राष्ट्रवादीने कलेढोण, चितळी, गुरसाळे, बोंबाळे, पळशी, कान्हरवाडी, मुळीकवाडी, गारळेवाडी, तरसवाडी, गारुडी, ढोकळवाडी, अनफळे, हिवरवाडी, गुंडेवाडी, ना. कुमठे, कळबी, जायगाव, कारंडेवाडी, कातरखटाव, विसापूर, नेर, पुसेसावळी, चोराडे, लोणी, पिंपरी, ज. स्वा. वडगाव तर महाविकास आघाडीने पुसेगाव, गादेवाडी, भोसरे, खातगुण, रेवलकरवाडी, गणेशवाडी, वाकेश्वर, गोपूज, मांजरवाडी, मोळ, वेटणे, रनसिंगवाडी, दातेवाडी, कणसेवाडी सूर्याचीवाडी व काँग्रेसने निमसोड व धोंडेवाडी या ग्रामपंचायतींत सत्ता मिळविली आहे. भाजपने हिंगणे, येरळवाडी, डांभेवाडी, एनकूळ, पाचवड, विखळे व सातेवाडी या ग्रामपंचायती ताब्यात घेतल्या आहेत, तर १३ ग्रामपंचायतीत पक्षविरहित स्थानिक नेतृत्वाला मतदारांनी कौल दिला.
सोमवारी सकाळी साडेसात वाजता वडूज तहसील कार्यालयात मतमोजणीला प्रारंभ झाला. सुरुवातीला ३५८ टपाली मते मोजण्यात आली. तद्नंतर १४ टेबलवर गावनिहाय मतमोजणीला सुरुवात झाली. निकाल समजताच कार्यकर्त्यांचा उत्साह वाढत होता. मात्र, प्रशासनाच्या अटींमुळे कार्यकर्त्यांना उत्साहाला आवर घालावा लागला. खटाव तालुक्यातील आजपर्यंतच्या निवडणूक निकालादरम्यान इतिहासात पहिल्यांदाच गुलाल उधळण व फटाक्यांची आतषबाजीविरहित आनंद विजयी उमेदवार व कार्यकर्त्यांना वडूज परिसरात घ्यावा लागला. सपोनि मालोजीराव देशमुख यांनी वडूज परिसरातील वाहतूक बदल व सुयोग्य बंदोबस्त यामुळे कोणतेही गालबोट लागले नाही.
फोटो : निकाल ऐकण्यासाठी खटाव तालुक्यातील ठिकठिकाणच्या कार्यकर्त्यांची तहसील कार्यालय परिसरात झालेली गर्दी. ( शेखर जाधव)