खटावचा आठवडा बाजार आता सोशल डिस्टन्समध्ये
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2021 04:40 AM2021-02-24T04:40:54+5:302021-02-24T04:40:54+5:30
खटाव : कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे खटाव ग्रामपंचायतीने गर्दी टाळण्यासाठी आठवडा बाजारात बदल केला आहे. सर्व भाजी विक्रेत्यांनी रस्त्याच्या दुतर्फा ...
खटाव : कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे खटाव ग्रामपंचायतीने गर्दी टाळण्यासाठी आठवडा बाजारात बदल केला आहे. सर्व भाजी विक्रेत्यांनी रस्त्याच्या दुतर्फा न बसता एका बाजूला तीन फुटांचे अंतर ठेवून बसावे, असा निर्णय घेण्याच आला असून, याची अंमलबजावणीही मंगळवारी तातडीने करण्यात आली.
कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा एकदा वाढू लागला आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणा अधिक सतर्क झाली असून, खटाव ग्रामपंचायतीनेदेखील ठोस पावले उचलली आहेत. आठवडा तसेच दैनंदिन बाजारात विनामास्क फिरणाऱ्यांवर ५०० रुपये दंडात्मक कारवाई करण्याचा इशारा ग्रामपंचायतीने दिला आहे. गावात ध्वनिक्षेपकाद्वारे याबाबत प्रबोधन करण्यात आले.
खटावमध्ये भरणाऱ्या आठवडा बाजारासाठी ग्रामीण भागातील नागरिक मोठ्या संख्येने हजेरी लावतात. कोरोनाचा वाढता संसर्ग पाहता आठवडा बाजार बंद करावा, असे मत अनेकांनी व्यक्त केले. दरम्यान, बाजार बंद झाल्याने अनेकांना आर्थिक फटका बसू शकतो, त्यामुळे आठवडा बाजार सोशल डिस्टन्सचे पालन करून रस्त्याच्या एकचा बाजूला भरवावा, असा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला. या निर्णयाची तातडीने अंमलबजावणीही करण्यात आली.
(कोट)
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायतीने घेतलेला निर्णय स्वागतार्ह आहे. ग्रामस्थ, व्यापारी, विक्रेत्यांनी नियमांचे काटेकोर पालन करावे. आठवडा बाजाराचे योग्य नियोजन केल्याने आता गर्दीवर नियंत्रण राहील.
- नंदकुमार वायदंडे, सरपंच
फोटो : २४ नम्रता भोसले
खटाव ग्रामपंचायतीच्या वतीने मंगळवारी आठवडा बाजार रस्त्याच्या दुतर्फा न भरविता तो एकाच बाजूला व सोशल डिस्टन्सचे पालन करून भरविण्यात आला. (छाया : नम्रता भोसले)