वेणेगावच्या मुलाणी कुटुंबात १२ जणांच्या अंगावर खाकीची वर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2018 12:05 AM2018-06-06T00:05:48+5:302018-06-06T00:05:48+5:30

 Kheki uniform on 12 people in Vaynegaon's Mauli family | वेणेगावच्या मुलाणी कुटुंबात १२ जणांच्या अंगावर खाकीची वर्दी

वेणेगावच्या मुलाणी कुटुंबात १२ जणांच्या अंगावर खाकीची वर्दी

Next

स्वप्नील शिंदे ।
सातारा : वेणेगावच्या मुलाणी कुटुंबात जन्मणारा प्रत्येक मुलगा जणू काही पोलीस खात्यात काम करण्यासाठी जन्मतो, असे समीकरण झाले आहे. या मुलाणी कुटुंबाच्या दोन पिढीतील तब्बल बाराजणांनी पोलीस खात्यामध्ये काम केले आहे.

या घरात जन्मलेल्या अब्बास मुलाणी यांना देशसेवा करायची इच्छा होती. म्हणून ते स्वातंत्र्यानंतर सैन्यात दाखल झाले. त्यावेळी त्यांनी युद्धात सहभाग घेतला होता. त्यांना आठ अपत्ये झाली. त्यामध्ये पाच मुले व तीन मुलींचा समावेश आहे.

अब्बास मुलाणी सेवानिवृत्त झाल्यानंतर आपल्या मुलांनी देशसेवेसाठी सैन्यात भरती व्हावे, असे स्वप्न होते. म्हणून त्यांनी सिंकदर मुलाणीला सैन्यात नोकरी लावली. त्यानंतर दुसरा मुलगा मुबारक मुलाणी सातारा पोलीस दलाच्या बँड पथकात रुजू झाले. त्यांच्या पाठोपाठ यासीन आणि लतीफ हेही पोलीस दलात भरती झाले. लतीफ मुलाणी यांनी तर बँड पथकात केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल राष्ट्रपती पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. दरम्यान, सिंकदर हे सैन्य दलातून निवृत्त झाल्यानंतर माजी सैनिक कोट्यातून पुन्हा सातारा पोलीस दलात सेवा केली. मुलाणी कुटुंबातील पाचही भाऊ सेवानिवृत्त झाले.

त्यानंतर त्यांच्या तिसऱ्या पिढीला वर्दीचे वेध लागले. मुबारक यांचे दोन चिरंजीव इसाक ऊर्फ राजू मुलाणी व इकबाल, बालेखान यांचा मुलगा मोमीन, यसीन यांचे चिरंजीव इमरान व इरफान आणि लतीफ यांचा मुलगा अमीर हे सहा चुलत भाऊपण पोलीस दलात भरती झाले आहेत.

मुलाणी कुटुंबातील दुसºया पिढीने पोलीस खात्यात केलेल्या कामाचा आदर्श डोळ््यासमोर ठेवून तिसरी पिढीही काम करत आहे. या कुटुंबाचा आदर्श घेऊन गावातील युवक तसेच नातेवाईकांमधील अनेक जण पोलीस खात्यात भरती झाले. मुलाणी कुटुंबांनी समाजापुढे एक आदर्श निर्माण करून ठेवला आह.े

जावईही पोलीस खात्यातला
मुलाणी कुटुंबीयांना पोलीस दलाचे इतके आकर्षण आहे की, कुटुंबातील मुलांना पोलीस दलात भरती तर केले. त्याशिवाय मुलींचा विवाह करत असताना जावईही पोलीस खात्यातील हवा, असा त्यांचा आग्रह असतो. सध्या तीन जावई पोलीस दलात काम करीत आहेत.

चौथ्या पिढीलाही लागले वेध
मुलाणी कुटुंबातील चौथी पिढी शिक्षण घेत आहे. त्यापैकी काहीजणांचे यूपीएससी व एमपीएससी परीक्षेच्या माध्यमातून पोलीस खात्यात काम करण्याचे वेध लागले आहे. त्या दिशेने त्यांचे प्रयत्नही सुरू आहेत.

 

कुटुंबातील वडीलधाऱ्यांना आम्ही लहानपणापासून वर्दीत पाहिले आहे. त्यामुळे वर्दीचे आकर्षण निर्माण झाले. पोलीस व सैन्यात भरती होणे, ही आता आमच्या कुटुंबाची परंपराच झाली आहे. याचा आम्हाला अभिमान आहे.
-राजू मुलाणी, पोलीस हवालदार

Web Title:  Kheki uniform on 12 people in Vaynegaon's Mauli family

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.