खुले आरक्षण असल्याने खुल जा सिमसिम...
By admin | Published: October 6, 2016 11:31 PM2016-10-06T23:31:47+5:302016-10-07T00:15:03+5:30
इच्छुकांची मांदियाळी : मातब्बर नशीब आजमविणार
साहील शहा -- कोरेगावकोरेगाव : जिल्ह्यात नव्याने अस्तित्वात आलेल्या कोरेगाव नगरपंचायतीचे नगराध्यक्षपदाचे आरक्षण हे सर्वसाधारणसाठी खुले राहिल्याने अनेक इच्छुकांनी आनंद व्यक्त केला आहे. पहिले नगराध्यक्षपद आपल्याच पक्षाला मिळावे, यासाठी सर्वच राजकीय पक्ष ताकदीने निवडणूक रिंगणात उतरणार आहेत. आजवर विविध पदे भूषविणारी मातब्बर नेतेमंडळी नशीब आजमविण्याची शक्यता आहे.
नवनिर्मित कोरेगाव नगरपंचायतीची प्रभाग रचना व त्यावरील आरक्षणे जाहीर झाल्यानंतर १७ पैकी ९ महिला नगरपंचायतीत दिसणार असून, पाच जागा सर्वसाधारणसाठी राहिल्या आहेत. तीन जागा आरक्षित झालेल्या आहेत. प्रभाग क्र. ४, ८, ९, ११ व १३ हे सर्वसाधारणसाठी खुले झाले आहेत. प्रभाग क्र. २, ३, ५, ६, ७ हे सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी राखीव झालेले आहेत. प्रभाग क्र. १ व १५ हे नागरिकांचा इतर मागास प्रवर्गासाठी राखीव झाले असून, प्रभाग क्र. १२, १४ व १६ हे नागरिकांचा इतर मागास प्रवर्ग स्त्रीसाठी राखीव ठेवण्यात आले आहेत. प्रभाग क्र. १० हा अनुसूचित जाती महिला प्रवर्गासाठी राखीव ठेवण्यात आला असून, प्रभाग क्र. १७ हा अनुसूचित जातीसाठी राखीव झालेला आहे. नगरपंचायतीचे प्रभाग निहाय आरक्षण जाहीर झाले असले तरी नगराध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर झाले नाही. विविध पदे भूषविलेले पदाधिकारी अजून ‘वेट अॅण्ड वॉच’ची भूमिका घेताना दिसत होते. आरक्षण सोडतीसाठी नेतेमंडळींनी हजेरी लावली होती.
यांच्या नावांची झाली चर्चा सुरू...
कोरेगावमध्ये नगराध्यक्षपद सर्वसाधारण खुले झाल्याने जिल्हा परिषदेचे माजी सदस्य किरण बर्गे, पंचायत समितीचे माजी सभापती संजय झंवर, माजी सरपंच अॅड. प्रभाकर बर्गे, प्रतिभा बर्गे, दिनेश बर्गे, युवराज बर्गे, धनंजय बर्गे, राजाभाऊ बर्गे, संजय पिसाळ, राहुल रघुनाथ बर्गे, सचिन बर्गे, दिलीप बर्गे, संजय पाटील, महेश बर्गे, सुनीलदादा बर्गे, अभिजित केंजळे, किशोर बर्गे, नितीन ओसवाल, हणमंतराव पवार यांच्यासह आजी-माजी सदस्य निवडणूक लढविणार.