कऱ्हाडात दाटला शास्त्रीय संगीताचा गारवा
By admin | Published: January 27, 2015 09:23 PM2015-01-27T21:23:43+5:302015-01-28T00:56:21+5:30
प्रीतिसंगम संगीत महोत्सव : पंडित व्यंकटेश कुमारांच्या स्वरांनी सजली रौप्यमहोत्सवी मैफल
कऱ्हाड : येथील वेणूताई चव्हाण सभागृहात रौप्यमहोत्सवी संगीत महोत्सवाची मैफिल सोमवारी सजली़ ख्यातनाम पंडित व्यंकटेशकुमार यांच्या चढत्या सुरेल स्वरांनी रसिकमनावर गारूड केले़ त्यांनी लिलया सादर केलेल्या रागदारीने कऱ्हाडकर रसिक चिंब न्हाऊन गेले़ सांस्कृतिक वारसा जपणाऱ्या कऱ्हाड शहरात कऱ्हाड जिमखान्याने प्रीतिसंगम संगित महोत्सवाचे आयोजन केले आहे़ त्याचे उद्घाटन ग्वल्हेरच्या किराणा घराण्याचे गायक पंडित एम़ व्यंकटेशकुमार यांच्या हस्ते करण्यात आले़ यावेळी जिमखान्याचे अध्यक्ष सुधिर एकांडे, सचिव डॉ़ मिलिंद पेंढारकर, चंद्रशेखर देशपांडे, अनिल शहा, विवेक ढापरे, चंद्रकांत जाधव आदिंची प्रमुख उपस्थिती होती़ पंडित व्यंकटेशकुमार यांनी ‘यमन’ रागाच्या तारा छेडत मैफिलीचा प्रारंभ केला़ अन् ‘सखी येरी आली पियाबीन’ ही चिज त्यांनी खुलवून श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले़ त्यांनंतर दुर्गा रागातील ‘सखी मोरी रूमझुम’, ‘भाग मोरी येरी धन धन’ या दोन चिज छोट्याछोट्या बारकाव्यांसहीत उलगडून दाखविल्या़ दिवंगत वसंतराव देशपांडे यांनी अजरामर केलेल्या ‘आशा निराशा’ या नाटकातील ‘अविरत सलाम घ्यावा देवा’,‘मजगाली कलिका लावी देवा’ हे मिश्र मांड रागातील नाट्यगित उपस्थितांना अतिशय भावले़ ‘राजन के राज श्री रामचंद्र उद्दार’ ही कौशिक कानडा रागातील बंदिश पेश करत व्यंकटेशकुमारांनी रसिकांची वाहवा मिळविली़ याच रागातील ‘काय करत मुझे भर जोगी’ ही चिज सादर करताना त्यांनी त्यावर स्वरवर्षावच केला़ शेवटी ‘समझा मन कोई नही अपना’ या तरल भैरवीचे स्वरशिंपण करत त्यांनी मैफिलीला स्वरविराम दिला़ आपल्या खड्या आणि पहाडी आवाजाने सादर केलेल्या एकामागून एक चिज ऐकल्यावर कऱ्हाडकरांनी व्यंकटेशकुमार यांची स्वरावरील मदार अनुभवली़ पंडित रविंद्र कोतोटी यांनी संवादिनी, अविनाश पाटील यांनी तबला, प्रमोद किरपेकर व शिवराज पाटील यांनी तानपुऱ्यावर साथ केली़ रसिकांनी याला भरभरून दाद दिली. (प्रतिनिधी)
मैदानावरील खेळाडू संगिताच्या मैफिलीत
खरंतर कऱ्हाड जिमाखान्याची ओळख क्रीडा क्षेत्रातील काम करणारी संस्था अशीच आहे़ परंतू संगित क्षेत्राची आवड असणाऱ्या अबालवृध्दांची सेवा करण्याच्या उद्देशाने कला, क्रीडा व साहित्य क्षेत्रातही ते सक्रीय दिसत आहेत़ म्हणूनच संगीत महोत्सवच्या निमित्ताने मैदानावरचे खेळाडू आज संगीताच्या मैफिलीत दिसत होते़