मायक्रो कंपन्यांविरुद्ध लाटणं
By admin | Published: April 21, 2017 10:25 PM2017-04-21T22:25:45+5:302017-04-21T22:25:45+5:30
रणरागिणींचा एल्गार : चचेगाव, वाठार, नांदलापुरात महिला मेळावा
सातारा : ‘राज्यात सुमारे आठ हजार कोटींचे कर्जवाटप मायक्रो फायनान्सच्या मार्फत झाले आहे. त्यातील राष्ट्रीयीकृत बँकांव्यतिरिक्त अन्य ठिकाणाहून आलेली रक्कम नेमकी कोणत्या स्त्रोतांकडून आली, याची आरबीआयमार्फत त्यांची चौकशी व्हावी, महिलांना अपमानास्पद वागणूक देणाऱ्यांना धडा शिकवायला हवा. महिलांनी आता हातात लाटणं आणि फुकणी घेऊन त्यांच्यावर धावून जाण्याचा निर्धार केला पाहिजे, ’ असे आवाहन ‘मनसे’चे नते संदीप मोझर यांनी केले.
मायक्रो फायनान्स कंपन्यांच्या मनमानी आणि जाचक कर्जवसुली व फसवणुकीविरुद्ध मनसेने कऱ्हाड तालुक्यातील वाठार, नांदलापूरसह चचेगाव येथे महिला मेळाव्यात रणरागिणींचा एल्गार जनजागृती मेळावा घेऊन आगामी आंदोलनाची दिशा ठरविण्यात आली आहे. यामुळे मायक्रो फायनान्स कंपन्यांविरोधात चांगलेच वातावरण तापले आहे.
नांदलापूर येथे झालेल्या कार्यक्रमात बळीराजा शेतकरी सघटनेचे बी. जी. ऊर्फ काका पाटील, मराठा महासंघाचे सांगली जिल्हाध्यक्ष सागर पाटील, दिलीप सुर्वे, झुंझारराव यादव, दशरथ पवार, स्वरूप निकम, राजेंद्र कांबळे, सुशील गायकवाड, नंदू रानभरे, अनिता गंगावणे, महिला आघाडी जिल्हा सचिव स्वाती माने, इंदुमती लावंड, शांता तासगावकर, आशा सावंत, सुजाता चव्हाण उपस्थित होते.
संदीप मोझर म्हणाले, ‘आजवरचे विविध मोर्चे, आंदोलनापेक्षा २४ एप्रिलचा नियोजित मोर्चा आगळा-वेगळा असणार आहे. मायक्रो फायनान्स कंपन्यांच्या जंजाळातून संसार वाचविण्यासाठी या मोर्चाचे नियोजन करण्यात आले आहे.’ (प्रतिनिधी)