सल्या चेप्याच्या मुलाला अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2015 11:00 PM2015-07-31T23:00:52+5:302015-08-01T00:23:57+5:30

कऱ्हाडातील टोळीयुद्ध : बबलू मानेच्या खुनाच्या कटात सहभाग

The kidnapper's child is arrested | सल्या चेप्याच्या मुलाला अटक

सल्या चेप्याच्या मुलाला अटक

Next

कऱ्हाड : बबलू मानेच्या खूनप्रकरणी कऱ्हाड शहर पोलिसांनी कुख्यात गुंड सलीम शेख ऊर्फ सल्या चेप्या याच्या मुलाला ताब्यात घेऊन अटक केली आहे. असिफ सलीम शेख (वय २३, रा. शिंदे गल्ली, शनिवार पेठ, कऱ्हाड) असे त्याचे नाव आहे. बबलूच्या खुनाच्या कटात असिफचा क्रियाशील सहभाग असल्याचे पोलीस तपासात स्पष्ट झाले असून, इतर आरोपींचा शोध सुरू असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बी. आर. पाटील यांनी सांगितले. शहरातील मंगळवार पेठेत २० जुलै रोजी सकाळी नऊच्या सुमारास बबलू माने याच्यावर बाबर खानने गोळ्या झाडून त्याचा खून केला. तर खून करून पळून जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या बाबरला जमावाने दगडाने ठेचून ठार मारले. या टोळीयुद्धामुळे शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. बाबरला ठेचून ठार मारल्याप्रकरणी आत्तापर्यंत पोलिसांनी पाचजणांना अटक केली आहे. तर बबलूच्या खूनप्रकरणी सहाजण अटकेत आहेत. शहरातील टोळीयुद्धाच्या पार्श्वभूमीवर चार दिवसांपूर्वी पोलिसांनी शहरात अचानक छापासत्र चालविले. पोलिसांनी सल्या चेप्याच्या घरासह आठ घरांवर छापे टाकले. त्यामध्ये पोलिसांनी महत्त्वाच्या कागदपत्रांसह संपूर्ण घरांची झडती घेतली. या झडतीत सल्याच्या घरात पिस्तूल तसेच जिवंत काडतुसे आढळून आली होती. त्यामुळे शस्त्रास्त्र कायद्यान्वये पोलिसांनी सल्या चेप्या याच्यासह त्याची पत्नी शहनाज हिच्यावर गुन्हा दाखल करून तिला अटक केली. सध्या शहनाज न्यायालयीन कोठडीत आहे. बबलू मानेच्या खून प्रकरणात यापूर्वी अटकेत असलेल्या फिरोज कागदी, मोहसिन जमादार, इब्राहिम सय्यद, जावेद शेख व इरफान इनामदार या पाचजणांकडे पोलिसांनी कसून चौकशी केली. त्यावेळी बबलूच्या खुनाच्या कटात सल्या चेप्याचा मुलगा असिफ याचाही क्रियाशील सहभाग असल्याचे स्पष्ट झाले. त्यानुसार गुरुवारी रात्री पोलिसांनी असिफला ताब्यात घेऊन अटक केली. त्याला शुक्रवारी न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचा आदेश देण्यात आला आहे.
 बाबरला ठेचून ठार मारल्याप्रकरणी यापूर्वी पोलिसांनी सागर चंद्रकांत माने (वय २५), हृषीकेश आनंदा शेंदरे (२३, दोघेही रा. गुरुवार पेठ, कऱ्हाड) व विशाल हिंदुराव कांबळे (रा. मंगळवार पेठ, कऱ्हाड) या तिघांना अटक केली आहे.
शुक्रवारी आणखी दोघांना पोलिसांनी या प्रकरणात अटक केली आहे. अक्षय सुनील शेंद्रे (२०), विक्रम ऊर्फ अक्षय विश्वास शिंदे (२८, दोघेही रा. गुरुवार पेठ, कऱ्हाड) अशी त्यांची नावे आहेत. (प्रतिनिधी)

सांगलीत दुचाकी जप्त
बबलू मानेवर गोळ्या झाडण्यासाठी गेलेल्या बाबर खानसोबत फिरोज कागदी होता, हे यापूर्वीच स्पष्ट झाले आहे. पोलिसांनी त्याला अटकही केली आहे. फिरोज दुचाकी रायडर होता. बबलूच्या खुनानंतर तो तेथून पळून जाण्यासाठी बाबरला मदत करणार होता. मात्र, जमावाने बबलूला ठेचून मारल्याचे दिसताच घाबरून फिरोज तेथून पळून गेला. फिरोजने वापरलेली दुचाकी पोलिसांनी सांगलीतून हस्तगत केली आहे.

Web Title: The kidnapper's child is arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.