अपहरण, जबरी चोरी करणारे दोघे जिल्ह्यातून हद्दपार; दोन वर्षांसाठी कारवाई; पोलीस अधीक्षकांचा आदेश
By दत्ता यादव | Published: March 5, 2023 03:36 PM2023-03-05T15:36:20+5:302023-03-05T15:36:45+5:30
सातारा शहरात जबरी चोरी करणे, विनयभंग, अपहरण, शिवीगाळ, दमदाटी यासारखे गंभीर गुन्हे दाखल असणाऱ्या दोघांना सातारा जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी हद्दपार करण्यात आले आहे. ही कारवाई पोलिस अधीक्षक समीर शेख यांनी केली.
सातारा - सातारा शहरात जबरी चोरी करणे, विनयभंग, अपहरण, शिवीगाळ, दमदाटी यासारखे गंभीर गुन्हे दाखल असणाऱ्या दोघांना सातारा जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी हद्दपार करण्यात आले आहे. ही कारवाई पोलिस अधीक्षक समीर शेख यांनी केली.
संजय सायबू पवार (वय २२, रा. नामदेववाडी, झोपडपट्टी, सातारा), आशुतोष सयाजीराव भोसले (वय २३, रा. कृष्णविहार सोसायटी, शाहुनगर, गोडोली, सातारा) अशी हद्दपार करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, संजय पवार आणि आशुतोष भोसले या दोघांवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असल्याने त्यांना वेळोवेळी पोलिसांनी सुधारण्याची संधी दिली होती. मात्र, त्यांच्यामध्ये कसलीही सुधारणा होत नव्हती. संशयितांच्या या कृत्यांमुळे सर्वसामान्य नागरिकांचे फार आर्थिक व शारीरिक नुकसान झाले आहे. त्यांचा सर्वसामान्य जनतेस उपद्रव होत होता. यामुळे जनतेमधून संशयितांवर कडक कारवाई व्हावी, अशी मागणी होत होती.
सातारा शहर पोलिस ठाण्याने या दोघांचा प्रस्ताव तयार करून तो पोलिस अधीक्षकांकडे पाठवला. याप्रकरणी सुनावणी झाल्यानंतर संजय पवार आणि आशुतोष भोसले या दोघांना दोन वर्षांसाठी सातारा जिल्ह्याच्या हद्दीतून हद्दपार करण्यात आले.
दरम्यान, आतापर्यंत पोलिस अधीक्षक समीर शेख यांनी ४ प्रस्तावात ११ जणांना हद्दपार केले आहे. या कामी हद्दपार प्राधिकरणापुढे सरकार पक्षाच्या वतीने अपर पोलिस अधीक्षक बापू बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अरुण देवकर, पोलिस उपनिरीक्षक मधुकर गुरव, पोलिस नाईक प्रमोद सावंत, केतन शिंदे, महिला पोलिस अनुराधा सणस यांनी योग्य पुरावा सादर केला. या कारवाईचे सर्व स्तरांतून समाधान व्यक्त होत आहे.