मुलाला वाचविण्यासाठी मातेकडून किडनीदान

By admin | Published: September 18, 2015 10:34 PM2015-09-18T22:34:05+5:302015-09-18T23:14:30+5:30

शेती विकून केले उपचार : पाचवड येथील शिर्के कुटुंबीयांच्या धडपडीला यश - गूड न्यूज

Kidney donation from the mother to save the child | मुलाला वाचविण्यासाठी मातेकडून किडनीदान

मुलाला वाचविण्यासाठी मातेकडून किडनीदान

Next

महेंद्र गायकवाड - पाचवड --परमात्म्यास पृथ्वीवर येता येत नाही म्हणून त्याने आई निर्माण केली. संकटात धीर देणारी, दु:खात मायेची ऊब देणारी, प्रेमाने पाठीवर हात फिरवत निश्चयाचा मेरूमणी हो असे सांगणारी वात्सल्यसिंंधू आईशिवाय दुसरे कोणीही नाही. आईविषयी असणाऱ्या सर्व गोष्टींचा प्रत्यय येणारी घटना घडली आहे वाई तालुक्यातील अमृतवाडी या छोट्याशा गावात. येथील कुसुम किसन शिर्के यांनी आपल्या मुलाला स्वत:ची किडनी देऊन त्याला जीवदान देण्याची किमया केली आहे.
अमृतवाडी येथील कुसुम शिर्के या शेतकरी कुटुंबातील मध्यमवर्गीय गृहिणी आहेत. पती व दोन मुले असा त्यांचा परिवार. लग्नापासून संपूर्ण कुटुंबाचा भार त्या पतीच्या साथीने व स्वत:च्या हिमतीवर पेलत आल्या आहेत. त्यांचा मोठा मुलगा प्रमोद हा त्यांना त्याच्यापरीने शेतीकामात हातभार लावत असे. अचानक एकेदिवशी प्रमोद चक्कर येऊन पडला. परंतु ही किरकोळ बाब समजून त्यावर साधे उपचार करण्यात आले. काही दिवसांनंतर प्रमोदच्या पोटात व कमरेच्या बाजूचे दुखणे वाढून पायांना मोठी सूज आली. हा आजार गंभीर असल्याचे लक्षात आल्यावर कुसुम यांनी आपल्या मुलाला सातारा येथील हॉस्पिटलमध्ये उपचाराकरिता दाखल केले. सर्व तपासणीनंतर प्रमोदच्या दोन्ही किडन्या निकामी झाल्याचे निदान करण्यात आले. हे ऐकल्यावर आईच्या पायाखालची जमीनच सरकली. बेताची परिस्थिती व त्यावर एवढा मोठा आघात त्यांच्या कुटुंबावर झाला होता. अशाही परिस्थितीमध्ये खचून न जाता त्यांनी धीर सोडला नाही. अशातच भणंग, ता. वाई येथील एका पत्नीने आपल्या पतीला किडनी देऊन जीवदान दिल्याची घटना नातेवाइकांकडून त्यांना समजली. कुसुम यांनी या दाम्पत्याला भेटण्याचा निर्णय घेतला.
या दाम्पत्याला भेटल्यावर कुसुम यांनी आपणही आपल्या मुलाला दोन एक किडनी देण्याचा निश्चय केला. किडनी दान केल्यानंतरही या प्रत्यारोपणाच्या संपूर्ण उपचारासाठी सुमारे दहा ते पंधरा लाख रुपयांपर्यंत खर्च येणार होता.
शिर्के कुटुंबीयापुढे ही रक्कम जुळविण्याचा यक्ष प्रश्न उभा राहिला. शेवटी किसन शिर्के यांनी आपली वडिलोपार्जित जमिनीतील काही हिस्सा विकून ही रक्कम उभी केली. पुणे येथील आदित्य बिर्ला हॉस्पिटलमध्ये रक्तगटाच्या व इतर चाचण्या केल्यानंतर दि. २२ आॅगस्ट रोजी किडनी प्रत्यारोपणाची प्रक्रिया पार पडली.
उच्चशिक्षित, उच्चभ्रू वर्गातील संशयित इंद्राणी मुखर्जीसारखी माता पैशासाठी आपल्या मुलीचा बळी देते तर दुसरीकडे अल्पशिक्षित व सामान्य कुटुंबातील कुसुम शिर्केसारखी माता आपल्या मुलाला स्वत:ची किडनी देऊन त्याचे प्राण वाचवित आहे.


मुलाच्या आनंदातच माझा आनंद आहे. मुलांच्या भावी आयुष्यासाठी प्रसंगी मी माझ्या दोन्हीही किडनी त्यांच्यासाठी दान केल्या असत्या.
- कुसुम किसन शिर्के, आई

मी आईविषयी एवढेच सांगतो की, आई थोर तुझे उपकार, नऊ महिने गर्भी असता शोशिला भार! देहाचा पाळणा, नेत्राचा दिवा, पाजली आठरा धार ! आई थोर तुझे उपकार !
- प्रमोद शिर्के, मुलगा


मला माझ्या पत्नीने केलेल्या त्यागाचा अभिमान वाटतो. अशी पत्नी व माता प्रत्येक घरात असावी, असे मला वाटते.
किसन शिर्के, वडील

Web Title: Kidney donation from the mother to save the child

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.