चिमुकल्यांच्या हातातून पतंगांनी घेतली भरारी!
By admin | Published: January 29, 2016 12:16 AM2016-01-29T00:16:01+5:302016-01-29T00:28:24+5:30
कऱ्हाडात महोत्सव उत्साहात : पाचशे मुलामुलींचा सहभाग; प्रीतिसंगम घाट रंगीबेरंगी पतंगांनी फुलला
कऱ्हाड : येथील प्रीतिसंगम घाटावर पतंग महोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. महोत्सवात सुमारे पाचशे चिमुकल्यांनी सहभाग घेतला. या चिमुकल्यांच्या हातातून शेकडो पतंगांनी आकाशात भरारी घेतली. रंगीबेरंगी पतंगामुळे घाटावर पतंग विश्व अवतरल्याचा भास होत होता. येथील विजय दिवस समारोह समितीच्या वतीने दरवर्षी प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून पतंग महोत्सवाचे आयोजन करण्यात येते. यावर्षीही महोत्सवाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. कोल्हापूरचे पतंगप्रेमी बाबा महाडिक यांच्या हस्ते महोत्सवाचे उद्घाटन झाले. विजय दिवस समारोह समितीचे उपाध्यक्ष शंकराप्पा संसुद्दी, महोत्सवाचे संयोजक माजी नगरसेवक अरुण जाधव, सुभेदार टी. डी. कुंभार, विनायक विभुते, महालिंग मुंढेकर, विष्णू पाटसकर, परवेज सुतार, संभाजी कणसे, आदी उपस्थित होते. महोत्सवात विद्यार्थी, विद्यार्थिनी, महिलांनी सहभाग घेतला. विजय दिवस समोराह समितीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या पतंग महोत्सवात पहिली ते नववी हा लहान गट व दहावी व त्यापासून पुढीलवयातील स्पर्धकांचा मोठा गट तयार करण्यात आला होता. लहान गटांतील स्पर्धकांना संयोकजकांतर्फे पतंग व मांजाचे मोफत वाटप करण्यात आले. तर मोठ्या गटातील स्पर्धकांना फक्त पतंग मोफत देण्यात आले. आपल्या आवडत्या पतंग उडविण्याच्या खेळात शाळकरी विद्यार्थ्यांनीही उत्स्फूर्त सहभाग नोंदवत पतंग उडविण्याचा मनमुरादपणे आनंद लुटला. कृष्णामायी घाटावर वडाच्या झाडाखाली आयोजित करण्यात आलेल्या पतंग महोत्सवात यावर्षी विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली. कुणाच्या हातात मांजा तर कुणाच्या हातात पतंग धरत आपल्या साथीदारासह कृष्णामायी घाटावर पंतग उडविण्यासाठी चिमुकल्यांना यावेळी चांगलीच कसरत करावी लागली. (प्रतिनिधी) विजयदिवसाच्या आठवणींच्या जागृतीसाठी महोत्सवाचे आयोजन विजयदिवसाची आठवणी जाग्या करण्यासाठी विजयदिवस समोराह समितीच्या वतीने पंतग महोत्सवाचे आयोजन केले जाते. प्रत्येक वर्षी जानेवारी महिन्यात हा पतंग महोत्सव साजरा केला जातो. याही वर्षी २६ जानेवारी यादिवशी दुपारी दोन ते सहा या वेळेत पतंग महोत्सव साजरा करण्यात आला. पतंग महोत्सवात लहान व मोठ्या गटांतील स्पर्धकांबरोबर उत्तेजनार्थ पारितोषिकेही देण्यात आली. यावेळी मोठ्या गटात वैभव मंडले प्रथम, जुबेर सुतार द्वितीय, महेश जाधव तृतीय, हर्षवर्धन डुबल चतुर्थ क्रमांक तसेच लहान गटात हैजान पटवेकर प्रथम, सौरभ मसूरकर द्वितीय, प्रतीक तांबवेकर तृतीय असे क्रमांक पटविले. यामध्ये विशेष उत्तेजनार्थ म्हणून उद्वैत गुरसाळे, धनश्री लादे, धीरज माने व प्रशांत मोहिते यांनी क्रमांक प्राप्त केले. पतंग उडविण्यासाठी आकर्षक नियम अन् अटीही विजय दिवस समोराह समितीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या पतंग महोत्सवावेळी नियम अन् अटीही स्पर्धकांसाठी ठेवण्यात आल्या होत्या. सर्वांत जास्त उंच कुणाचा पतंग गेला, प्रतीस्पर्ध्याचे किती पतंग कापले असता, पतंग उडविण्याची आकर्षक पद्धत असे नियम व अटीही स्पर्धकांना घालून देण्यात आल्या होत्या. तसेच या वैशिष्ट्यांवर स्पर्धकांचे क्रमांक काढण्यात आले.