काकासाहेब शिंदे यांना शहीद घोषित करा मायणीत मोर्चा ; शासनाच्या निषेधार्थ सभा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2018 11:40 PM2018-07-25T23:40:58+5:302018-07-25T23:41:49+5:30
मराठा समाजामार्फत बुधवारी संपूर्ण मायणी शहरातून विविध मागण्यांसाठी निषेध मोर्चा काढण्यात आला. तसेच मल्हारपेठ-पंढरपूर व मिरज-भिगवण राज्यमार्गावरील चांदणी चौकांमध्ये शासनाचा निषेध करून सभा घेण्यात आली.
मायणी : मराठा समाजामार्फत बुधवारी संपूर्ण मायणी शहरातून विविध मागण्यांसाठी निषेध मोर्चा काढण्यात आला. तसेच मल्हारपेठ-पंढरपूर व मिरज-भिगवण राज्यमार्गावरील चांदणी चौकांमध्ये शासनाचा निषेध करून सभा घेण्यात आली. यावेळी काकासाहेब शिंदे यांच्या मृत्यूची जबाबदारी स्वीकारून शासनाने त्यांना शहीद घोषित करावे, अशी मागणी मराठा समाजबांधवांनी केली.
बुधवारी सकाळपासूनच संपूर्ण बाजारपेठ व्यापाऱ्यांनी बंद ठेवून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. येथील चांदणी चौकामध्ये सकाळी दहा वाजल्यापासून सकल मराठा समाज बांधव एकत्र येऊ लागले. त्यानंतर साडेदहा वाजता एकत्र आलेल्या समाजबांधवांकडून शहरातील मराठी शाळा, बसस्थानक, चावडी चौक, उभी पेठ, नवी पेठ यासह संपूर्ण शहरातून निषेध मोर्चा काढून आरक्षणाची मागणी केली.
त्यानंतर मिरज-भिगवण व मल्हारपेठ-पंढरपूर राज्यमार्गावरील चांदणी चौकामध्ये शासनाच्या निषेधार्थ घेण्यात आलेल्या सभेमध्ये आरक्षणाच्या मागणीबरोबरच काकासाहेब शिंदे यांच्या मृत्यूची जबाबदारी स्वीकारून शासनाने त्यांना शहीद घोषित करून पन्नास लाख रुपये व घरातील एका सदस्याला नोकरीत घेण्याची मागणी केली. यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून शासनाच्या निषेधार्थ घोषणा देऊन मंडलाधिकारी, तलाठी व पोलिसांना निवेदन देण्यात आले. यावेळी मराठा समाज बांधव उपस्थित होते.
सकल मराठा समाजाकडून मोर्चा काढण्यात आला. यावेळी मंडल अधिकारी व पोलिसांना निवेदन देण्यात आले.