तरुणाईच्या उद्रेकापुढे एसटी नमली
By admin | Published: October 19, 2015 09:35 PM2015-10-19T21:35:25+5:302015-10-19T23:40:53+5:30
वसंतगडला विद्यार्थ्यांचे आंदोलन : दोन तास १३ बसेस रोखल्या; सवलत पास स्वीकारला जात नसल्याचा आरोप; प्रशासनाविरोधात संताप
कऱ्हाड/तांबवे : कऱ्हाड आगारातून एसटी वेळेवर येत नसल्याने व विद्यार्थ्यांचे पास असूनही, त्यांना एसटीमध्ये घेतले जात नसल्यामुळे सोमवारी शेकडो संतप्त विद्यार्थ्यांनी आंदोलन केले. वसंतगड येथे विद्यार्थ्यांनी पाटणहून येणाऱ्या सर्व एसटी बसेस रोखल्या. सुमारे दोन तास विद्यार्थ्यांनी एसटी अडवून ठेवल्या. अखेर पोलिसांनी हस्तक्षेप केल्यानंतर एसटी सोडण्यात आल्या. विद्यार्थ्यांनी आगारप्रमुखांची भेट घेऊन योग्य ती कार्यवाही करण्याची मागणी
केली. आगारप्रमुखांच्या आश्वासनानंतर विद्यार्थ्यांनी आंदोलन मागे घेतले.
पंढरपूर-चिपळूण राज्यमार्गालगत असलेल्या विहे, म्होप्रे, साकुर्डी, वसंतगड, सुपने या गावांतील हजारो विद्यार्थी शिक्षण घेण्यासाठी कऱ्हाडला येतात. दररोज सकाळी या विद्यार्थ्यांची त्यांच्या गावातील बसथांब्यावर गर्दी असते. या राज्यमार्गावरून कऱ्हाड व पाटण आगाराच्या एसटीही वारंवार धावत असतात. मात्र, सकाळी महाविद्यालयात येण्यासाठी थांबलेल्या विद्यार्थ्यांनी पाटणहून येणाऱ्या एसटीला हात दाखविल्यास चालक एसटी थांबवत नाहीत. एकापाठोपाठ येणाऱ्या एसटी न थांबताच निघून जातात. त्यामुळे विद्यार्थी-विद्यार्थिनींना तासन्तास थांब्यावर ताटकळत थांबावे लागते. यातून त्यांचे शैक्षणिक नुकसानही मोठ्या प्रमाणावर होते. बसथांब्यांवर एसटी थांबवाव्यात, अशी मागणी गावोगावच्या विद्यार्थ्यांनी यापूर्वीच केली आहे. तसेच त्यासाठी आंदोलनेही केली आहेत. मात्र, आगार व्यवस्थापन त्याकडे लक्ष देत
नाही. परिणामी, विद्यार्थ्यांच्या अडचणीत दिवसेंदिवस भरच पडत आहे.
या मार्गावरील एसटी फुल्ल होत असल्याने आगाराने जादा एसटी पाठविण्याची मागणीही विद्यार्थ्यांनी यापूर्वी केली. मात्र, आगाराने ती मागणीही गांभीर्याने घेतली नाही. परिणामी, सध्या विद्यार्थ्यांना आपले शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागत आहे. खिशात पास असूनही, दर महिन्याला विद्यार्थ्यांना शेकडो रुपयांचा भुर्दंड सहन करावा लागत आहे.
हा प्रकार होत असतानाच एसटीच्या चालक व वाहकांनी नवीन प्रकार सुरू केला आहे. थांब्यावर बस थांबूनही विद्यार्थ्यांना त्याचा काहीच फायदा होत नाही. गत अनेक महिन्यांपासून विद्यार्थी हा त्रास सहन करीत आहेत.
विद्यार्थ्यांचे हे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी यापूर्वी सुपने येथे आंदोलन झाले होते. त्यावेळी जिल्हा परिषद सदस्य सुरेखा पाटील यांनीही आगार व्यवस्थापनाकडे जादा
एसटी सोडण्याची मागणी केली होती. मात्र, व्यवस्थापनाने त्याकडेही गांभीर्याने लक्ष दिले नाही.
अखेर सोमवारी विद्यार्थ्यांच्या संयमाचा बांध फुटला. वसंतगड येथे
एकत्रित आलेल्या दीडशे ते दोनशे विद्यार्थ्यांनी पाटणहून
कऱ्हाडकडे निघालेल्या सर्व एसटी बसेस व मिनीबस अडविल्या. सकाळी सात वाजण्याच्या सुमारास विद्यार्थ्यांनी हे आंदोलन सुरू केले. विद्यार्थिनींही उत्स्फूर्तपणे या आंदोलनात सहभागी झाल्या. विद्यार्थी व विद्यार्थिनींनी चिपळूण-पंढरपूर राज्यमार्गावर ठिय्या मांडला. त्यामुळे राज्यमार्गावरील वाहतूक ठप्प झाली.
दरम्यान, अचानक झालेले हे आंदोलन समजताच कऱ्हाड तालुका पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी तातडीने त्याठिकाणी पोहोचले. त्यांनी विद्यार्थ्यांची
समजूत घातली. तसेच वाहतूक न अडविण्यासंदर्भात सूचना
केली.
पोलिसांच्या मध्यस्थीनंतर विद्यार्थ्यांनी आंदोलन मागे घेत कऱ्हाड आगारात येऊन आगारप्रमुख अविनाश थोरात यांची भेट घेतली. त्यांच्याशी त्यांनी चर्चा केली. त्यावेळी थोरात यांनी तत्काळ एसटी चालक व वाहकांना सूचना करण्याचे आश्वासन दिले. तसेच यापुढे प्रत्येक थांब्यावर एसटी थांबविली जाईल, असेही सांगितले. त्यामुळे विद्यार्थ्यांनी आंदोलन मागे घेतले. (वार्ताहर)
म्हणे, पास चालत नाही...
कऱ्हाड-पाटण मार्गावर एसटीसोबतच आणखी काही मिनी बस धावतात. एसटी थांबली नाही तरी विद्यार्थ्यांना त्या मिनी बसमधून प्रवास करणे शक्य असते. मात्र, बसचे चालक पासधारक विद्यार्थ्यांना बसमध्ये घेत नाहीत. या बसला पास चालत नाही, असा जावईशोध त्या वाहकांनी लावला आहे.
ुचालकांना केल्या
सूचना
वसंतगड येथे सोमवारी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी सुमारे १३ एसटी बसेस अडवून आंदोलन केले. याबाबत विद्यार्थ्यांशी चर्चा करण्यात आली आहे. एसटी प्रत्येक थांब्यावर थांबविण्यात याव्यात, अशी चालकांना केली आहे.
- अविनाश थोरात, आगारप्रमुख, कऱ्हाड
कऱ्हाड, पाटण आगाराच्या एसटी विहे, साकुर्डी, वसंतगड तसेच सुपने या ठिकाणी थांबविल्या जात नाहीत. एसटी न थांबल्याने महाविद्यालयात जाण्यासाठी आम्हाला उशीर होतो. याशिवाय मिनी बसमध्ये पासही स्वीकारला जात नसल्याने विद्यार्थ्यांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागतो. याबाबत कऱ्हाड आगारप्रमुखांशी अनेकवेळा चर्चा केली आहे. त्यांनी दुर्लक्ष केल्याने आम्हाला आंदोलन करावे लागले.
- विराज पाटील, विद्यार्थी