Satara: तरुणाचा खून करुन त्याच्याच स्टेटसला ठेवले फोटो; महिलेसह चौघांना अटक, दोघे पसार
By ऑनलाइन लोकमत | Published: April 22, 2024 01:23 PM2024-04-22T13:23:05+5:302024-04-22T13:23:37+5:30
प्रेमसंबंधाच्या संशयातून मारहाण?
कऱ्हाड : लाकडी दांडक्यासह प्लास्टिक पाईपने बेदम मारहाण करून युवकाचा निर्घृण खून करण्यात आला. मुंढे, ता. कऱ्हाड येथे शनिवारी सायंकाळी ही घटना घडली. याप्रकरणी पोलिसांनी सहाजणांवर गुन्हा दाखल केला असून, चौघांना अटक करण्यात आली आहे तर दोघे पसार झाले आहेत.
करण संपत बर्गे (वय २८, रा. खराडे, ता. कऱ्हाड) असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे. अजित आनंदा सावंत (वय ३६), निवास आनंदा सावंत (४५), सुधीर खाशाबा सावंत (४१) व स्मिता संदीप सावंत (२८, सर्व रा. मुंढे) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. तर विनोद विश्वास माने व विनायक पवार हे दोघे पसार झाले आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खराडे येथील करण बर्गे हा युवक शनिवारी दुपारी कऱ्हाडला आला होता. त्यानंतर दुपारच्या सुमारास त्याला मुंढे येथे मारहाण झाल्याची माहिती नातेवाईकांना मिळाली. त्यामुळे नातेवाईक तातडीने त्याठिकाणी पोहोचले. त्यावेळी संशयित त्याचठिकाणी होते. त्यांनी नातेवाईकांनाही शिवीगाळ व दमदाटी केली. नातेवाईक पोहोचले त्यावेळी करण गंभीर जखमी तसेच बेशुद्धावस्थेत होता. त्यामुळे नातेवाईकांनी रिक्षातून त्याला कऱ्हाडच्या कृष्णा रुग्णालयात दाखल केले. त्याठिकाणी उपचार सुरू असताना रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास करणचा मृत्यू झाला.
दरम्यान, घटनेची माहिती मिळाल्यानंतर कऱ्हाड शहर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक के.एन. पाटील यांच्यासह गुन्हे शाखेचे पथक तातडीने मुंढे येथे पोहोचले. त्यांनी घटनास्थळाचा पंचनामा करून आरोपींचा शोध सुरू केला. रविवारी पहाटे वारुंजी येथून चार आरोपींना ताब्यात घेऊन अटक करण्यात आले. तर दोघेजण पसार झाले आहेत. पोलिस पथक त्यांचा शोध घेत आहेत. आरोपींनी मारहाणीसाठी वापरलेली प्लास्टिक पाईप पोलिसांनी जप्त केली आहे. पोलिस उपनिरीक्षक शेख तपास करीत आहेत.
प्रेमसंबंधाच्या संशयातून मारहाण?
मृत करण बर्गे हा एका महिलेला सोशल मीडियावर मेसेज पाठवित होता. तसेच त्याचे प्रेमसंबंध असल्याचा संशय होता. त्या संशयावरून आरोपींनी करणला मुंढे येथे बोलावून घेत मारहाण केल्याचा पोलिसांना संशय आहे. मात्र, खुनाचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. आरोपींकडे तपास केल्यानंतर खुनामागील कारण आणि घटनाक्रम स्पष्ट होईल, असे पोलिसांनी सांगितले.
मोबाईलला ठेवला ‘स्टेटस’
आरोपींनी मारहाण केल्यानंतर करणचा मोबाईल त्याच्याकडून काढून घेतला. तसेच त्याच्याच मोबाईलवर मारहाण केलेले फोटो, व्हिडीओ काढले. हे फोटो आणि व्हिडीओ त्यांनी त्याच्याच मोबाईलमध्ये सोशल मीडिया स्टेटसला ठेवले होते. करणचे सोशल मीडिया स्टेटस पाहूनच त्याला मारहाण झाल्याचे त्याच्या नातेवाईकांना समजले.