पालकवर्गाच्या थ्रिलिंग गेम ठरतायत चिमुरड्यांसाठी किलिंग!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2017 11:37 PM2017-08-28T23:37:26+5:302017-08-28T23:37:26+5:30

Killing for parents' thrilling game! | पालकवर्गाच्या थ्रिलिंग गेम ठरतायत चिमुरड्यांसाठी किलिंग!

पालकवर्गाच्या थ्रिलिंग गेम ठरतायत चिमुरड्यांसाठी किलिंग!

Next



लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : आपल्याला मिळालं नाही ते आपल्या मुलांना मिळालं पाहिजे, या अट्टहासापायी बोबडे बोल बोलणाºया मुलांचे हात टचस्क्रिनवर लिलया फिरू लागले आहेत. पालकांनाही त्याचे विशेष कौतुक! पालकांचा मोबाईल घेऊन त्यावर अपलोड केलेल्या थ्रिलिंग गेम्स चिमुरड्यांसाठी किलिंग ठरत आहेत. पालकांनी मुलांना स्मार्ट फोन देण्याआधी त्याचा वापर कसा स्मार्टली केला पाहिजे, याविषयी स्वत:च धडे घेण्याची वेळ आता आली आहे.
कोरेगाव येथील सुभाषनगरमध्ये मुळचे रंगनाथस्वामी निगडी, ता. कोरेगाव येथील महेश जगताप मुंबईला आपल्या कुटुंबासह राहतात. गणेशोत्सवासाठी ते गावी आले होते. काही कामानिमित्त त्यांची पत्नी व मुलगी श्रावणी सुभाषनगर येथे दोन दिवस मावशीकडे आली होती. रविवारी सकाळी घरातील सर्वजण कामात असताना श्रावणी मोबाईलवर गेम खेळत होती. श्रावणीला कफ झाला होता. हा कफ श्वसनलिकेत अडकून श्वास कोंडून तिचा मृत्यू झाला असल्याचा प्राथमिक अंदाज वैद्यकीय सूत्रांनी व्यक्त केला.
कोरेगावमध्ये घडलेल्या या घटनेमुळे पुन्हा एकदा मुलांचा मोबाईल वापर आणि त्यावर पालकांचे नियंत्रण हे विषय ऐरणीवर आले आहेत. कित्येकदा पालक खेळत असलेले खेळच मुलंही खेळतात. आपल्यापेक्षा आपली पोरं लई हुश्शार! म्हणत पालकही एक-एक लेव्हल कसे पुढं जायचं हे मुलांसमोर खेळून दाखवतात. त्यामुळे मुलांनाही मोबाईलवर हे गेम खेळण्याचे आकर्षण वाटते. पालकांच्या वयाचे गेम त्यांच्या मुलांनी खेळण्यातील धोके अनेक असतात. बहुतांश पालकांच्या मोबाईलवर हाणामारी आणि युध्दाच्या किंवा मग थ्रिलिंग गेम असतात. हे गेम खेळताना पालक सजग असतात, त्यातील जय-पराजयाची धास्ती पालकांना नसते. म्हणूनच ही गेम खेळताना त्यांच्या हृदयाचे ठोके वाढणे, श्वास कोंडून राहणे हे प्रकार होत नाहीत. या उलट प्रत्येक लेव्हलवर यशस्वी होण्याच्या नादात मुलं शब्दश: श्वास घेण्यासही विलंब करतात. मुलांच्या अजाणतेपणात ही नैसर्गिक क्रिया ते रोखून धरतात, हे कित्येकदा पालकांच्याही लक्षात येत नाही. अंतिम टप्प्यातील लेव्हल सुटली की मुलं मोठा श्वास सोडतात, हे त्या मागचे कारण आहे. मात्र, मुलांच्या हातात मोबाईल देऊन कामात व्यस्त असणाºया पालकांच्या हे लक्षात येत नाही. मुलांच्या हातात स्मार्टफोन देताना त्याचा वापर स्मार्टली करण्याची सवय लावणं हे पालकांचे कर्तव्य आहे. पण अनेक घरांत मुलं स्वतंत्रपणे मोबाईल हाताळतात, हे भूषणावह समजले जाते.
श्वास रोखून थरार...
वैद्यकीय तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, लहान मुलं मोबाईलमधील गेम जिंकण्यासाठी खेळतात म्हणून काहीही झाले तरी जिंकणं हे त्यांचे अंतिम साध्य असते. याउलट मोठी माणसं त्यांचा ताण घालविण्यासाठी गेम खेळतात. त्यामुळे त्यातून निव्वळ करमणूक हा एकच भाग असतो. पण मोठ्यांच्या खेळातील ही मुलभूत चिमुरड्यांना समजत नाही आणि हे त्यांना सांगायची गरज आहे, हे पालकांच्या लक्षात येत नाही. त्यामुळे थ्रिलिंग गेम खेळताना मुलांचा रक्तदाब, हृदयाचे ठोके हे सामान्य असत नाहीत.
एकाग्रता गेली
एकाकीपणा आला!
कोणतीही गोष्ट साध्य करायची असेल तर लहान होऊन प्रयत्न करा, असे म्हटले जाते. पण आजच्या डिजीटल युगात मुलांमधील ही एकाग्रता मोबाईलमुळे संपुष्टात आली आहे. मोबाईल नसेल तर मुलांना एकाकीपणाची भावना येऊ लागली आहे. ‘आई-बाबा तुम्ही बाजारात जाऊन या फक्त आमच्यासाठी मोबाईल ठेवा,’ हे वाक्य अनेक घरांमध्ये ऐकणारे पालक आहेत. भविष्यातील एकलकोंडेपणाची ही सुरुवात तर नसेल ना, याविषयी पालक फारसे गंभीर असत नाहीत.
मुलांसाठी विशेष खेळ...
इंटरनेटवर मुलांची कल्पकता वाढविण्याबरोबरच त्यांच्यातील अभ्यासाची आवड निर्माण करण्यासाठी खूप गेम्स आहेत. पण पालकांच्या मोबाईलवर त्यांच्याच पसंतीच्या गेम्स अपलोड केल्या जातात. त्यामुळे मुलांना आपल्या आवडीचेही गेम्स आहेत, हे कित्येकदा मित्र-मैत्रिणींकडून समजते. आजच्या युगात मुलांना आधुनिक ठेवायचं असेल तर त्यांच्या वयाच्या विश्वात जाऊन त्यातून त्यांच्यासाठी आवश्यक गेम्स शोधले पाहिजेत.
लाड का लक्ष..!
अनेक घरांमध्ये आजी-आजोबांनी नातवंडांचे काय हट्ट पुरवायचे आणि किती पुरवायचे याचा निर्णय मुलांचे आई-बाबा घेतात. नातवंडांची कोणतीही इच्छा पूर्ण केली की, त्याला आजी-आजोबांचे लाड असा टॅग लावून पालक रिकामे होतात. पण नातवंडांच्या वयात जाऊन त्यांच्याशी मैत्री करण्या इतपत वेळ आता केवळ त्यांच्याकडेच आहे. म्हणूनच त्याला लाड म्हणण्यापेक्षा ‘लक्ष’ म्हणणे कदाचित योग्य ठरेल. आजच्या जगात रहायचे असेल तर मुलांना सगळं दिलंच पाहिजे, या मानसिकतेत असलेले पालक मुलांचे जे अतिलाड करतात, त्याला पालकांचे ‘दुर्लक्ष’ म्हणावे लागेल. मुलांना भौतिक साधने देण्यापेक्षा त्यांना गुणात्मक वेळ देणं आता गरजेचे असल्याचे मत डॉ. उदयराज फडतरे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.

Web Title: Killing for parents' thrilling game!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.