फळांचा राजा सामान्यांच्या अवाक्यात - सातारा बाजारातील उच्चांकी आवक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 2, 2018 08:14 PM2018-05-02T20:14:15+5:302018-05-02T20:14:15+5:30
सातारा : बाजारात दाखल झाल्यापासून सर्वसामान्यांना वाकुल्या दाखवणारा फळांचा राजा अखेर सामान्यांच्या अवाक्यात आला आहे. बुधवारी साताऱ्याच्या बाजारपेठेत ६० गाड्या भरून आंब्याची आवक झाली.
सातारा : बाजारात दाखल झाल्यापासून सर्वसामान्यांना वाकुल्या दाखवणारा फळांचा राजा अखेर सामान्यांच्या अवाक्यात आला आहे. बुधवारी साताऱ्याच्या बाजारपेठेत ६० गाड्या भरून आंब्याची आवक झाली. त्यामुळे सातशे रुपये डझनच्या घरात तोऱ्यात बसलेला हापूस आता साडेतीनशे रुपयांपर्यंत खाली उतरला आहे. आंब्यांच्या दरातील या घसरणीमुळे सामान्यांच्या चेहऱ्यावर हसू फुलले आहे.
साताऱ्याच्या बाजारपेठेत फेब्रुवारीपासूनच आंब्यांची आवक झाली होती. १५०० ते १७०० रुपयांचा उच्चांकी दर पटकावल्याने डझनभर आंबा नेणंही सामान्यांच्या अवाक्याबाहेर होते. अक्षय्यतृतीयेच्या मुहूर्तावर साताºयात आंबरस पुरीचा बेत ठरलेला; पण नेमकं या मुहूर्तावर आंब्यांची पुरेशी आवक न झाल्याने दर चढेच राहिले. त्यामुळे अनेकांनी नगावर आंबे नेऊन हा सण साजरा करण्याचा प्रयत्न केला. रविवारीही आंब्यांची मोठी आवक होणं अपेक्षित होती. मात्र, त्यादिवशीही पुरेशी आवक न झाल्यामुळे आंब्यांचे दर सहाशे ते आठशेच्या रुपयांपर्यंत पोहोचले होते. बुधवारी बाजारपेठेत मोठी आवक झाल्यामुळे आंबा सामान्यांच्या अवाक्यात पोहोचला आहे.
पहिला आंबा फेब्रुवारीत!
कोकणातून येणारा आंबा कोल्हापूरमार्गे साताऱ्याच्या बाजारपेठत येतो. यंदा फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात हापूस दाखल झाला होता. दरवर्षी एप्रिल महिन्याच्या दुसºया आठवड्यापासून सामान्यांच्या अवाक्यात येणाºया आंब्याचे यंदाचे दर चढे राहिले. एप्रिल महिना संपेपर्यंत हे दर सहाशे ते आठशेच्या सुमारास राहिल्यामुळे आंबा दिसूनही त्याची विक्री पुरेशा प्रमाणात होत नव्हती. मे महिन्याच्या पहिल्याच सप्ताहात मोठ्या प्रमाणावर दाखल झालेल्या आंब्यांमुळे सातारकरांच्या घरात आमरसाचा बेत सुरू होईल.
साताऱ्याच्या बाजारपेठेत आज पहिल्यांदाच एवढी मोठी आवक झाली. कोकण, कर्नाटक आणि उत्तरप्रदेश येथील आंब्यांची आवक झाली आहे. याचे दर घाऊक बाजारात २५० रुपयांपासून ३५० रुपयांपर्यंत आहेत. सकाळी स्टॉलवर आंबा लावल्यानंतर खरेदीसाठी ग्राहकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
- इकबाल बागवान, फळ विक्रेता, राजवाडा.