‘हिरा’ऐवजी ‘राजा’ने केले उभे रिंगण

By ऑनलाइन लोकमत | Published: July 15, 2018 05:24 AM2018-07-15T05:24:36+5:302018-07-15T05:25:07+5:30

श्री संत ज्ञानेश्वर महाराजांच्या वारीतील पहिले उभे रिंगण शनिवारी सायंकाळी फलटण तालुक्यातील तरडगाव येथील चांदोबाचा लिंब येथे पार पडले.

'King' instead of 'diamond' stands | ‘हिरा’ऐवजी ‘राजा’ने केले उभे रिंगण

‘हिरा’ऐवजी ‘राजा’ने केले उभे रिंगण

googlenewsNext

तरडगाव/मलटण (सातारा) : श्री संत ज्ञानेश्वर महाराजांच्या वारीतील पहिले उभे रिंगण शनिवारी सायंकाळी फलटण तालुक्यातील तरडगाव येथील चांदोबाचा लिंब येथे पार पडले. दरवर्षी रिंगणात धावणाऱ्या माउलींच्या ‘हिरा’ या अश्वाचे नुकतेच पुण्यात निधन झाल्याने ‘राजा’ या अश्वाने हे रिंगण पूर्ण केले. भाविकांनी ‘याचि देही... याचि डोळा’ हा क्षण अनुभविला.
लोणंद (ता.खंडाळा) येथील दीड दिवसाचा मुक्काम आटोपून पालखी सोहळा फलटण तालुक्यातील तरडगावकडे शनिवारी सकाळी मार्गस्थ झाला. दुपारी माउलींचा मानाचा नगारखाना चांदोबाचा लिंब रिंगणस्थळी आला. पाठीमागून अश्व आले. त्यानंतर मंदिरासमोर पालखी आल्यानंतर चोपदारांनी रिंगण लावून घेतले.
टाळमृदंगाचा गजर, रोखलेला श्वास, ताणलेल्या नजरा अशा उत्साही व भक्तिमय वातावरणात वैष्णवांच्या मेळ्यातून माउलींच्या व स्वाराच्या अश्वांनी नेत्रदीपक दौड घेत वारीतील पहिले उभे रिंगण पूर्ण करताच सारा आसमंत दुमदुमला. डोळ्यांचे पारणे फेडणारा चांदोबाचा लिंब येथील सोहळा पाहून वारकºयांनी ‘माउली... माउली’चा एकच जयघोष केला.
>वारीतील पहिले उभे रिंगण : श्री संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे वारीतील पहिले उभे रिंगण शनिवारी फलटण तालुक्यातील तरडगाव येथील चांदोबाचा लिंब येथे झाला. यावेळी उपस्थितीत लाखो वारकºयांनी माउली-माउलींचा जयघोष केला. सोहळा पाहण्यासाठी अनेक वारकरी उंच वाहनांवर थांबले होते. तर काहींनी चिमुरड्यांना असे खांद्यावर घेतले होते. हा सोहळा पाहत असताना चिमुरडीचे हातही आपसूक जोडले गेले होते.
>फलटणला आज मुक्काम
आळंदीहून पंढरपूरला निघालेला श्री संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्याचा जिल्ह्यातील तिसरा मुक्काम रविवार, दि. १५ रोजी फलटण येथे असणार आहे.
>‘राजा’चा सराव
सहा दिवसांत पूर्ण
संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याच्या सेवेत असणारा ‘हिरा’ अश्व पुणे मुक्कामी निधन पावल्यानंतर त्याची जागा घेत राजाने सर्वांची मने जिंकली. लोणंद मुक्कामी राजाला रिंगणात पळण्याचा सरावही देण्यात आला.
मूळचा सातारा येथील राजा पहिल्यांदाच रिंगणात पळणार असल्याने भाविकांच्या प्रचंड गर्दीत दौड करणे तरबेज अश्वाशिवाय अशक्य होते. मात्र, राजाभाऊ चोपदार यांनी सातारा येथील तुकाराम माने यांचा राजा हा अश्व केवळ सहा दिवसांत तयार केला. प्रचंड गर्दीत पळण्याचा सराव त्याच्याकडून करून घेतला.
चांदोबाचा लिंब येथील उभ्या रिंगणातील सुरुवातीला पहिल्या फेरीत राजा थोडा बुजला, अडखळला; पण दुसºया फेरीत मात्र राजानं आपला करारीपणा दाखवत सर्वांची मनं जिंकली अन् रिंगणाची दौड मोठ्या दिमाखात पूर्ण केली.
>माती ललाटी लावण्यासाठी झुंबड
रिंगणात धावत येणाºया त्या अश्वांना पाहून स्पर्श करण्यासाठी असंख्य नजरा आतुर झाल्या होत्या. अखेर सायंकाळी ४ वाजून २० मिनिटांनी दोन्ही अश्व वैष्णवांच्या मेळ्यातून एकमेकांशी स्पर्धा करीत धावत आले. नेत्रदीपक दौड घेत, त्यांनी रथाकडे वळून त्यातील पादुकांचे दर्शन घेतले. या वेळी त्यांना नैवेद्य देण्यात आला. त्यानंतर, पुन्हा अश्वांनी जोरात धाव घेत उभे रिंगण पूर्ण केले. अश्वांच्या टापांची माती ललाटी लावण्यासाठी एकच झुंबड उडाली.

Web Title: 'King' instead of 'diamond' stands

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.