राजे, हे वागणं बरं नव्हं..!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2019 12:53 AM2019-09-23T00:53:12+5:302019-09-23T00:53:16+5:30

सातारा : ‘दिल्ली भेटीवेळी स्वाभिमानाची वागणूक मिळाली नाही, म्हणून मोघलांच्या दरबारातून बाहेर पडणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज आता दिल्ली ...

King, it was not good to behave ..! | राजे, हे वागणं बरं नव्हं..!

राजे, हे वागणं बरं नव्हं..!

Next

सातारा : ‘दिल्ली भेटीवेळी स्वाभिमानाची वागणूक मिळाली नाही, म्हणून मोघलांच्या दरबारातून बाहेर पडणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज आता दिल्ली दरबारात मुजरा घालत आहेत. १५ वर्षे सत्तेत असताना यांनी काय केलं?’ असा सवाल करत ‘तुमचं हे वागणं बरं नव्हं,’ अशा शब्दांत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी साताºयाच्या राजघराण्यावर निशाणा साधला.दिल्ली दरबारात लाचारी पत्करणाऱ्यांना जनताच आता जागा दाखवेल, असेही पवार म्हणाले.
राष्ट्रवादी काँग्रेसचा मेळावा रविवारी साताºयात पार पडला. या मेळाव्याला राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजीवराजे नाईक-निंबाळकर, आमदार दीपक चव्हाण, आमदार बाळासाहेब पाटील, माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील, आमदार शशिकांत शिंदे, आमदार मकरंद पाटील, ज्येष्ठ नेते विक्रमसिंह पाटणकर, सत्यजित पाटणकर, रुपाली चाकणकर, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुनील माने, युवकचे जिल्हाध्यक्ष तेजस शिंदे, राष्ट्रवादी आयटी सेलचे सारंग पाटील, दीपक पवार, प्रभाकर घार्गे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
पवार म्हणाले, ‘सीमेवर छातीचा कोट करून लढणाºया सैनिकांचा आणि प्रगतीच्या रस्त्यावर देशाला घेऊन जाणाºया यशवंतराव चव्हाणांचा हा जिल्हा आहे. त्यामुळे हा इतिहास कोणी पुसून टाकण्याचा प्रयत्न करणार असेल तर त्यांना जनता जागा दाखवेल. पंधरा वर्षे सत्तेत असूनही ज्यांना विकास करता आला नाही ते आता विकास करण्यासाठी इतर पक्षामध्ये जात आहेत, याचे आश्चर्य वाटते. पक्षाच्या चौकटीत न राहणाºयांचा वेगळा विचार व्हावा, असं जयंतराव म्हटल्याचे सांगून पवार म्हणाले, ‘आम्ही छत्रपतींच्या गादीला मानतो. त्या गादीबद्दल आदर आहे. म्हटलं चुका होत असतील तर सुधारून घेऊ; पण राजघराण्यानं लाचारीचा रस्ता पकडला, त्याला आता काय म्हणावं.’
प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले, ‘सातारा जिल्ह्याने शरद पवार यांना कायम साथ देऊन त्यांना दैवत मानलं. सोडून गेलेल्यांकडे मतदार बघून घेतील. तुम्ही खूप काम केली असती तर ते सांगत फिरायची अशी वेळ आली नसती. निवडणुकीत भरतीचं आश्वासन देणाºया सत्ताधाºयांनी चक्क पक्षातच मेगाभरती सुरू केली आहे. सत्तेच्या लालसेने ज्यांनी तिकडे उड्या मारल्या, त्यांची पोटनिवडणूक जाहीर न झाल्यामुळे पोटात गोळा उठला आहे. ते आता निवडणूक लावा म्हणून त्यांना मुजरा घालतायत. हातात बॅट धरली म्हणून कोणी धोनी होत नाही आणि राष्ट्रवादी सोडली तर कोणी साताºयात खासदार होत नाही, ही वस्तुस्थिती सातारकर निश्चित दाखवतील.’
शशिकांत शिंदे म्हणाले, ‘राष्ट्रवादीतून भारतीय जनता पक्षात जाऊन राजे जिंकले असले तरीही तहात मात्र ते हरले आहेत. शरद पवार हे समीकरण वेगळं आहे. तुमच्या वयाइतकं त्यांचं राजकारण झालंय. सांगली, कोल्हापूरच्या पूरग्रस्त परिस्थितीची प्रत्यक्ष पाहणी करून त्यांना मदत मिळवून देण्यासाठी वयाच्या ८० व्या वर्षी आमचे नेते कार्यरत असताना मुख्यमंत्र्यांनी मात्र या दौºयाचा सोपस्कार विमानाने उरकला. मावळे पेटल्याशिवाय इतिहास होत नाय आणि साताºयाचा गड राखण्याची जिद्द प्रत्येक मावळ्याच्या मनात धगधगणार आहे.’
राष्ट्रवादीत डेरेदाखल झालेले दीपक पवार म्हणाले, ‘गेल्या सहा वर्षांत भाजपच्या संकल्पना तळागाळापर्यंत पोहोचविण्यासाठी निष्ठेने काम केले. माझं काम बघून मुख्यमंत्र्यांनी कामाला लागायचे आदेश दिले. गांधी मैदानावर मुख्यमंत्री आणि चंद्र्रकांत पाटील यांनी चारवेळा माझं नावही जाहीर केलं. मी जर पदाला हावरा असतो तर मंत्रिपद आणि झेडपीचा राजीनामा दिला नसता. ज्यांचा घरात राष्ट्रवादीने भरभरून सत्तास्थाने दिली, त्यांनीच सातारा-जावळीची वाट लावली. कॉलेजच्या दिवसांपासून माझं शरद पवारांवर प्रेम आहे.’
यावेळी प्रा. कविता म्हेत्रे, पार्थ पोळके, सुधीर धुमाळ, किरण साबळे-पाटील, सुरेंद्र गुदगे, सुरेखा पाटील, अविनाश मोहिते, समिंद्र्रा जाधव यांच्यासह जिल्ह्यातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मी शरद पवार... आम्ही साहेबांसोबतच..!
राष्ट्रवादी पक्षाच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या कार्यकर्ता मेळाव्यात ग्रामीण भागातील तरुण आणि ज्येष्ठ कार्यकर्त्यांची मोठी उपस्थिती होती. शरद पवार यांचे आगमन होण्यापूर्वी उपस्थित मान्यवर कार्यकर्त्यांनी आघाडी सरकारवर सडकून टीका केली. मेळाव्यासाठी उपस्थित असलेल्या कार्यकर्त्यांनी मी शरद पवार.. आम्ही साहेबांसोबत असे लिहिलेल्या गांधी टोप्या परिधान केल्या होत्या.

राष्ट्रवादीच्या गीतावर थिरकले कार्यकर्ते
राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे आगमन कार्यकर्त्यांनी टाळ्यांच्या कडकडाटात केले. यावेळी राष्ट्रवादी पक्षाचे गीत ध्वनिक्षेपकावर लावण्यात आले. या गाण्याच्या तालावर कार्यकर्त्यांनी ठेका धरला आणि उत्साही वातावरणात त्यांचे स्वागत करण्यात आले.

विरोधकांकडून पैसे घ्या आणि...!
निवडणुका आल्या की आपल्याला जेवण आणि पैशांचे आमिष दाखवलं जातं. तुम्हाला कोणी पैसे दिले तर ते घ्या आणि ते आपल्या उमेदवाराला द्या, असा सल्ला शशिकांत शिंदे यांनी दिला.
४.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या मेळाव्यात विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांचे बंधू व जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजीवराजे नाईक-निंबाळकर यांच्या उपस्थितीने उपस्थितांच्या भुवया उंचावल्या. आपल्या भाषणात संजीवराजे यांनी ‘मी मेळाव्याला आलो आहे, म्हणजे समजून घ्या,’ असे सूचक विधान केले.

राष्ट्रवादी पक्षाचा राजीनामा दिल्यानंतर माजी खासदार उदयनराजे भोसले यांनी लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांना कवड्यांची माळ आणि पगडी घातली होती. त्यानंतर दिल्लीत गृहमंत्री अमित शहा, साताºयात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि नाशिकमध्ये प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना पगडी घातली होती. शरद पवार यांच्या भाषणाच्या प्रारंभी तुतारीवादकानेही एक पगडी परिधान केली होती. भाषणाला सुरुवात करताना शरद पवार यांनी त्याला, ‘तुलापण त्यांनी पगडी घातली का?’ असा मिश्कील सवाल केला. यावर उपस्थितांमध्ये हशा पिकला.

Web Title: King, it was not good to behave ..!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.