रयतेचा राजा मंत्रिपदी हवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2021 04:40 AM2021-02-24T04:40:34+5:302021-02-24T04:40:34+5:30

युगपुरूष श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राजघराण्याचा थेट वारसा लाभलेले उदयनराजे दिसायला राकट व करारी बाण्याचे असले तरी, मनाने ...

The king of the ryots should be a minister | रयतेचा राजा मंत्रिपदी हवा

रयतेचा राजा मंत्रिपदी हवा

Next

युगपुरूष श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राजघराण्याचा थेट वारसा लाभलेले उदयनराजे दिसायला राकट व करारी बाण्याचे असले तरी, मनाने मात्र, कमालीचे हळवे आहेत, हे त्यांच्या सान्निध्यात असलेल्या व्यक्तींशिवाय फार कमी लोकांना माहीत आहे. सर्वसामान्य लोकांना होणारा त्रास ते पाहू शकत नाहीत. सामान्य लोकांच्या प्रश्नांच्या सोडवणुकीला महाराजसाहेबांनी नेहमीच पहिले प्राधान्य दिले आहे. प्रश्नांची सोडवणूक करताना प्रसंगी त्यांनी वेळोवेळी कठोर भूमिका घेतल्याचे उभ्या महाराष्ट्राने पाहिले आहे. लोकांच्या प्रश्नात आडव्या येणाऱ्या अपप्रवृत्तींना उदयनराजे भोसले त्यांच्या स्टाईलने उत्तर देतात.

प्रश्न समोर आल्यानंतर त्याची सोडवणूक होईपर्यंत ते गप्प बसत नाहीत, हे जिल्ह्यातील सर्वसामान्य नागरिकही जाणतो. गोरगरीब जनतेच्या समस्या जाणून घेताना हा माणूस कमालीचा हळवा होतो. डोळे भरून आलेला त्यांचा चेहरा अनेकांनी हृदयसिंहासनावर जपून ठेवला आहे. जनतेच्या सुख-दु:खाशी एकरूप होताना व्यक्तिगत अडचणींचे त्यांनी कधीच भांडवल केले नाही. उलट लोकांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी तन, मन व धन अर्पण करण्यास त्यांनी कधीच मागेपुढे पाहिले नाही. म्हणूनच लोकांच्या मनात त्यांच्याविषयी अपरंपार माया आहे.

हा राजा जनतेशी एकरूप असल्यानेच राजकारणातील धुरंधर नेत्यांना जलमंदिर कायमच आपलेसे वाटत आले आहे. येथे भेट देणाऱ्या राजकीय क्षेत्रातील बलाढ्य व्यक्तींच्या चेहऱ्यावरील समाधान हे त्याचे उदाहरण असते. तोच विश्‍वास येथे येणाऱ्या गोरगरीब, वंचित आणि सामान्य जनतेच्या चेहऱ्यावरही दिसतो. म्हणून जलमंदिरवर येणाऱ्या बलाढ्य आणि धनाढ्यांच्या अगोदर गोरगरिबांना प्राधान्य मिळते.

उदयनराजेंचे व्यक्तिमत्त्वच राजबिंडे असले तरी, त्यात राजेपणाचा उन्माद कधीच दिसणार नाही. स्वत: राजे असूनही सर्वांना सर्वकाही देण्याचा त्यांचा सातत्याने प्रयत्न असतो. स्वत:च्या अंगावर गुंजभरही सोनं न घालणारा हा राजा म्हणूनच जनतेचा लाडका आहे. तरी त्याला दरडावून जाब विचारणाऱ्या कार्यकर्त्यांविषयी ते आकस ठेवत नाहीत. म्हणूनच काही कारणाने विरोधात गेलेल्याला महाराजसाहेब पुन्हा आसरा देतात. व्यक्तीचा द्वेष करण्यापेक्षा त्याच्या प्रवृत्तीचा द्वेष केला पाहिजे, या विचारांचे असलेले उदयनराजे म्हणूनच सहसा कोणालाही अंतर देत नाहीत. पत्थराला पाझर फोडेल, असे कर्तृत्व गाजवून उदयनराजेंनी आपली हुकूमत सिद्ध करून दाखवली आहे.

राज्याच्या राजकारणात खळबळ उडवून देणारा, गोरगरीब जनतेसाठी राजेपद विसरून जाणारा, समाजकारणासाठी दिंड्या-पताका हातात घेणारा, रस्त्यावरील मातीत फाटक्या कपड्यांत मुलांमध्ये मिसळून जाणारा हा राजा लोककल्याणकारी आहे. ज्यावेळी कोणतीही अन्यायी घटना घडते, त्यावेळी ती दूर करण्यासाठी जनतेच्या मुखातून एकच नाव येते, ते म्हणजे फक्त उदयनराजे.

श्रीमंत छत्रपती उदयनराजे यांनी कायमच श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आपल्या राजकारण, समाजकारणाचा सर्वसामान्य माणूस केद्रबिंदू मानला आहे. गरिबाच्या भाजीच्या देठालाही हात लागता कामा नये, ही भूमिका जपणाऱ्या उदयनराजेंनी स्वार्थ न पाहता सर्वसामान्यांचे हितच जोपासण्याचे काम केले. एखाद्या धनिकापेक्षा गोरगरिबाला मदत करणे ही त्यांची विचारधारा आहे. हीच त्यांची विचारधारा महाराष्ट्रासोबत देशभर पोहोचण्याची आवश्यकता आहे. लोककल्याणासाठी कार्य करणाऱ्या या राजाला केंद्र सरकारमध्ये मंत्रीपद द्यावे. त्यांना मंत्रीपद देऊन तमाम हिंदूंचे आराध्य दैवत हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या थेट वंशजांचा पर्यायाने महाराष्ट्राचा सन्मान करावा, हीच जनसामान्यांची इच्छा आई जगदंबेने पूर्णत्वास न्यावी, याच वाढदिवसाच्या निमित्ताने शुभेच्छा...

- सुनील काटकर

माजी शिक्षण व अर्थ सभापती

जिल्हा परिषद सातारा.

Web Title: The king of the ryots should be a minister

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.