अंधाराचे साम्राज्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 8, 2021 04:26 AM2021-07-08T04:26:30+5:302021-07-08T04:26:30+5:30
कऱ्हाड : शहरानजीक वारूंजी फाटा येथे पथदिव्यांची सोय नाही. परिणामी, या परिसरात रात्रीच्या वेळी अंधाराचे साम्राज्य असते. वारूंजी फाट्यावर ...
कऱ्हाड : शहरानजीक वारूंजी फाटा येथे पथदिव्यांची सोय नाही. परिणामी, या परिसरात रात्रीच्या वेळी अंधाराचे साम्राज्य असते. वारूंजी फाट्यावर उड्डाणपूल आहे. तसेच पाटण रस्ताही याच ठिकाणी सुरू होतो. येथे रात्रीच्या वेळीही वर्दळ असते. मात्र, पथदिवे नसल्यामुळे परिसरात अंधाराचे साम्राज्य असते. पथदिव्यांची सोय करणे गरजेचे आहे़
पावसाचा शिडकावा
कऱ्हाड : शहरात बुधवारी दुपारी पावसाचा शिडकावा झाला. गत पंधरा दिवसांपासून पावसाने पूर्णपणे दडी मारली आहे. त्यामुळे शेतकरी चिंतेत आहेत. बुधवारी मोठ्या प्रमाणावर ढगाळ वातावरण झाल्याने पाऊस हजेरी लावण्याची शक्यता होती. मात्र, रिमझिम पाऊस पडून गेल्यानंतर आकाश निरभ्र झाले. सध्या पिकांसाठी मोठ्या पावसाची गरज आहे.
व्यापाऱ्यांना आवाहन
कऱ्हाड : पालिकेच्या वतीने घंटागाडीवरील ध्वनिक्षेपकाच्या माध्यमातून सध्या व्यापारी, विक्रेत्यांना आवाहन केले जात आहे. टाळेबंदी झुगारून कोणीही व्यवसाय सुरू करू नये, असे सांगण्यात येत आहे. तसेच नियमाचे उल्लंघन केल्यास कडक कारवाई करण्याचा इशाराही दिला जात आहे. गल्लोगल्ली हे आवाहन करणारी घंटागाडी फिरत आहे.
डासांचा प्रादुर्भाव
कऱ्हाड : शहरासह परिसरात सध्या डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. ढगाळ वातावरण आणि अधूनमधून पडणारा रिमझिम पाऊस यामुळे डासांची उत्पत्ती वाढली आहे. पालिकेने शहर परिसरात धूरफवारणी करणे गरजेचे आहे. अन्यथा आजारांना निमंत्रण मिळू शकते. सध्या डासांच्या प्रादुर्भावामुळे नागरिक हैराण झाले आहेत.