किरपे ते घारेवाडीपर्यंत रस्त्यात झुडपांचे साम्राज्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2021 04:39 AM2021-02-10T04:39:06+5:302021-02-10T04:39:06+5:30
तांबवे : किरपे ते घारेवाडी या रस्त्याच्या दुतर्फा काटेरी झुडपांचे साम्राज्य पसरले आहे. ढेबेवाडी तसेच कऱ्हाडला जाण्यासाठी परिसरातील ग्रामस्थ ...
तांबवे : किरपे ते घारेवाडी या रस्त्याच्या दुतर्फा काटेरी झुडपांचे साम्राज्य पसरले आहे. ढेबेवाडी तसेच कऱ्हाडला जाण्यासाठी परिसरातील ग्रामस्थ याच रस्त्याचा मोठ्या प्रमाणावर वापर करतात. रस्त्यावर वाहनांची नेहमी वर्दळ असते. मात्र, सध्या झुडपांमुळे वाहनचालकांना समोरून येणाऱ्या वाहनांचा अंदाज येत नाही. परिणामी, अपघाताचा सामना करावा लागतो. त्यातच काही ठिकाणी रस्त्याच्या साईडपट्ट्या खचल्या आहेत. त्यामुळे वाहनधारकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे.
काले ते मसूर बस वेळेत सोडण्याची मागणी
कऱ्हाड : काले ते मसूर बस वेळेत येत नसल्यामुळे ग्रामस्थांना बसची वाट पाहत ताटकळत थांबावे लागत आहे. सकाळी पावणेसात वाजता सुटणारी काले-मसूर बस सध्या आठ वाजता गावात येते. त्यामुळे महाविद्यालयीन शिक्षणासाठी कऱ्हाडला जाणाऱ्या विद्यार्थ्यांची तसेच ग्रामस्थांची गैरसोय होत आहे. ही वस्तुस्थिती लक्षात घेऊन कऱ्हाड आगाराने ही बस साडेसहा ते पावणेसात वाजण्याच्या सुमारास सुरू करावी, अशी मागणी विद्यार्थ्यांसह ग्रामस्थांतून केली जात आहे.
कऱ्हाड ते ढेबेवाडीपर्यंत दुभाजकांत वाढले गवत
मलकापूर : माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांच्या प्रयत्नाने कऱ्हाड-ढेबेवाडी रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम झाले. त्यावेळी अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी दुभाजकांची निर्मिती करण्यात आली. या रस्त्याचे काम केलेल्या कंत्राटदाराने देखभाल-दुरुस्ती करण्याची मुदत काही दिवस होती. ती मुदत संपल्यानंतर रस्त्याच्या देखभालीकडे बांधकाम विभागाचे दुर्लक्ष झाले आहे. हळहळू दुभाजकांतील झाडे वाळत गेली; तर पावसामुळे गवत वाढत गेले. महिला उद्योग ते चचेगाव परिसरात गवत वाढल्याने व रिफ्लेक्टरची मोडतोड झाल्यामुळे दुभाजकाची दुरवस्था झाली आहे.
रस्त्यानजीकच्या फलकांची मोडतोड
कऱ्हाड : तालुक्यातील ग्रामीण भागातील रस्त्याकडेला सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने सूचना तसेच दिशादर्शक फलक लावण्यात आलेले आहेत. उंडाळे ते येळगाव यादरम्यान लावण्यात आलेल्या दिशादर्शक फलकांची काही दिवसांपासून अज्ञातांकडून मोडतोड होत असल्याचे दिसून येत आहे. हे फलक अजूनही मोडलेल्या अवस्थेत दिसून येत आहेत. याबाबत संबंधित विभागाकडून उपाययोजना करण्याची मागणी होत आहे. या रस्त्यानजीक फलक नसल्यामुळे वाहनचालकांची फसगत होत आहे.
तांबवे विभागामध्ये ऊसतोडींना आला वेग
तांबवे : विभागातील ऊसतोडणीने वेग घेतला आहे. अनेक ठिकाणी मजुरांनी आपल्या झोपड्या घातल्या आहेत. पहाट होताच हे मजूर शिवाराचा रस्ता धरत आहेत. तसेच दिवसभर ऊसतोड करीत थंडीमुळे ऊसतोड करून रात्री लवकर परतत आहेत. शिवारात ऊसतोडीची लगबग सुरू असल्यामुळे शेतकरीही सकाळी लवकर शिवारात जात असून, पुढील हंगामासाठी शेतीची मशागत करण्यात ते व्यस्त असल्याचे चित्र ग्रामीण भागात दिसत आहे.
कऱ्हाडमध्ये सिमेंटच्या बाकड्यांची मोडतोड
कऱ्हाड : येथील पालिकेने शहरात ठिकठिकाणी बसविलेली सिमेंटची बाकडी तुटली आहेत. त्यामुळे स्थानिकांतून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. बाकडी तुटल्याने ज्येष्ठ नागरिकांना बसण्याची सोय नाही. बाकडी तातडीने बदलण्याची मागणी होत आहे. काही बाकडी तुटल्यामुळे अडचणी निर्माण होत आहेत. याबाबत पालिकेने योग्य ती कार्यवाही करण्याची मागणी होत आहे.