'मुख्यमंत्री अन् रश्मी ठाकरेंच्या बेनामी मालमत्तेच्या चौकशीसाठी अलिबागला जाणार'
By ऑनलाइन लोकमत | Published: September 20, 2021 10:44 AM2021-09-20T10:44:47+5:302021-09-20T10:45:28+5:30
अलिबाग आणि जरंडेश्वर येथेही उद्धव ठाकरे आणि अजित पवार यांनी केलेल्या चुकीच्या व्यवहारांची माहिती घेण्यासाठी जाणार आहे. सोमवारी अलिबाग येथे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रश्मी ठाकरे यांच्या नावाने घेतलेल्या बेनामी मालमत्तेची चौकशी करण्यासाठी जाणार
सातारा - भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांना कराड पोलिसांनी ओगलेवाडी येथील रेल्वे स्टेशनवर ताब्यात घेतले आहे. आज मंगळवार रोजी पहाटे साडेचारच्या सुमारास ते कोल्हापूरकडे जात असताना त्यांना ताब्यात घेण्यात आले. त्यांना शासकीय विश्रामगृहाकडे नेण्यात आले. त्यानंतर, किरीट सोमैय्यांनी पत्रकार परिषद घेऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांना सवाल केला. तसेच, मुख्यमंत्र्यांच्या बेनामी संपत्तीची माहिती घेण्यासाठी लवरच अलिबागला जाणार आहे, असेही सोमैय्यांनी म्हटलं.
अलिबाग आणि जरंडेश्वर येथेही उद्धव ठाकरे आणि अजित पवार यांनी केलेल्या चुकीच्या व्यवहारांची माहिती घेण्यासाठी जाणार आहे. सोमवारी अलिबाग येथे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रश्मी ठाकरे यांच्या नावाने घेतलेल्या बेनामी मालमत्तेची चौकशी करण्यासाठी जाणार असल्याचे किरीट सोमय्यांनी म्हटले. तर, सर सेनापती साखर कारखान्यात हसन मुश्रीफ यांचा 100 कोटींचा घोटाळा असल्याचा गंभीर आरोपही त्यांनी केला आहे. कराड येथे माध्यमांशी बोलताना त्यांनी ठाकरे सरकारवर टीका करत, महाविकास आघाडीचे जनक शरद पवारांनाही लक्ष्य केले.
हसन मुश्रिफांमुळे दर्शन घेता आलं नाही
गणेश विसर्जनादिवशी सकाळी मला माझ्याच कार्यालयात ४ तास रोखण्यात आलं. मला का रोखण्यात आलं याचं उत्तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गृहमंत्री दिलीप वळसे पाटील देणार का? मला कोल्हापूरात प्रवेशबंदी आहे. मग मुंबईत मला का रोखलं जातंय? कोल्हापूरच्या वेशीवर रोखा, असं म्हणत सोमय्यांनी पोलिसी कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. मला कोल्हापूरपर्यंत पोहोचू दिलं जाणार नाही. हसन मुश्रिफांमुळे किरीट सोमैय्याला कोल्हापूरच्या अंबेमाईचं दर्शन करता आलं, नाही, असे म्हणत सोमैय्यांनी पत्रकार परिषदेची सुरुवात केली.
घोटाळे उघड करणाऱ्यांनाच अटक
घोटाळेबाजाऐवजी, घोटाळा उघड करणाऱ्यांनाच ठाकरे सरकारने अटक केली. मला कोल्हापूर जिल्हा प्रवेशबंदी करण्यात आली. कागल येथे हसन मुश्रिफ यांचा दौरा आहे, त्याचवेळेस सोमैय्या कोल्हापूरात येत आहेत. त्यामुळे, गनिमी काव्याने किरीट सोमैय्यांवर हल्ला होण्याची शक्यता आहे, असे मला पत्रातून कळविण्यात आले आहे. हसन मुश्रीफ यांच्या स्वागताला राष्ट्रवादीचे कार्यकर्ते येणार होते की राष्ट्रवादीचे गुंड. राष्ट्रवादीचे कार्यकर्तेच गुंड आहेत का? असा प्रश्न किरीट सोमैय्या यांनी विचारला आहे.
वरिष्ठांच्या सूचनेनूसार घोटाळे बाहेर काढणार
हसन मुश्रीफ यांच्याविरोधातील ईडीच्या तक्रारीमुळेच माझ्यावर पोलिस कारवाई करण्यात आली. माझ्या जीवाला धोका असल्याचं, माझ्यावर गनिमी काव्याने हल्ला होणार असल्याचं पोलिसांनी दिलेल्या पत्रात म्हटले आहे. मग, पोलिसांना ही माहिती कोणी दिली? असा सवालही किरीट सोमैय्यांनी विचारला आहे. दरम्यान, मुश्रिफांचे घोटाळे जनतेसमोर मांडण्याची सूचना मला देवेंद्र फडणवीस आणि भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिल्याचेही ते म्हणाले.