Kirit Somaiyya : हसन मुश्रिफांच्या स्वागतासाठी राष्ट्रवादीचे कार्यकर्ते येणार होते की गुंड?
By ऑनलाइन लोकमत | Published: September 20, 2021 09:42 AM2021-09-20T09:42:35+5:302021-09-20T09:43:10+5:30
Kirit Somaiyya : गणेश विसर्जनादिवशी सकाळी मला माझ्याच कार्यालयात ४ तास रोखण्यात आलं. मला का रोखण्यात आलं याचं उत्तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गृहमंत्री दिलीप वळसे पाटील देणार का? मला कोल्हापूरात प्रवेशबंदी आहे. मग मुंबईत मला का रोखलं जातंय?
सातारा - भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांना कराड पोलिसांनी ओगलेवाडी येथील रेल्वे स्टेशनवर ताब्यात घेतले आहे. आज मंगळवार रोजी पहाटे साडेचारच्या सुमारास ते कोल्हापूरकडे जात असताना त्यांना ताब्यात घेण्यात आले. त्यांना शासकीय विश्रामगृहाकडे नेण्यात आले. त्यानंतर, किरीट सोमैय्यांनी पत्रकार परिषद घेऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांना सवाल केला.
गणेश विसर्जनादिवशी सकाळी मला माझ्याच कार्यालयात ४ तास रोखण्यात आलं. मला का रोखण्यात आलं याचं उत्तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गृहमंत्री दिलीप वळसे पाटील देणार का? मला कोल्हापूरात प्रवेशबंदी आहे. मग मुंबईत मला का रोखलं जातंय? कोल्हापूरच्या वेशीवर रोखा, असं म्हणत सोमय्यांनी पोलिसी कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. मला कोल्हापूरपर्यंत पोहोचू दिलं जाणार नाही. हसन मुश्रिफांमुळे किरीट सोमैय्याला कोल्हापूरच्या अंबेमाईचं दर्शन करता आलं, नाही, असे म्हणत सोमैय्यांनी पत्रकार परिषदेची सुरुवात केली.
घोटाळेबाजाऐवजी, घोटाळा उघड करणाऱ्यांनाच ठाकरे सरकारने अटक केली. मला कोल्हापूर जिल्हा प्रवेशबंदी करण्यात आली. कागल येथे हसन मुश्रिफ यांचा दौरा आहे, त्याचवेळेस सोमैय्या कोल्हापूरात येत आहेत. त्यामुळे, गनिमी काव्याने किरीट सोमैय्यांवर हल्ला होण्याची शक्यता आहे, असे मला पत्रातून कळविण्या आले आहे. हसन मुश्रीफ यांच्या स्वागताला राष्ट्रवादीचे कार्यकर्ते येणार होते की राष्ट्रवादीचे गुंड. राष्ट्रवादीचे कार्यकर्तेच गुंड आहेत का? असा प्रश्न किरीट सोमैय्या यांनी विचारला आहे.
हसन मुश्रीफ यांच्याविरोधातील ईडीच्या तक्रारीमुळेच माझ्यावर पोलिस कारवाई करण्यात आली. माझ्या जीवाला धोका असल्याचं, माझ्यावर गनिमी काव्याने हल्ला होणार असल्याचं पोलिसांनी दिलेल्या पत्रात म्हटले आहे. मग, पोलिसांना ही माहिती कोणी दिली? असा सवालही किरीट सोमैय्यांनी विचारला आहे. दरम्यान, मुश्रिफांचे घोटाळे जनतेसमोर मांडण्याची सूचना मला देवेंद्र फडणवीस आणि भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिल्याचेही ते म्हणाले.
सर सेनापती साखर कारखान्यात हसन मुश्रीफ यांचा 100 कोटींचा घोटाऴा
अलिबाग आणि जरंडेश्वर येथेही उद्धव ठाकरे आणि अजित पवार यांनी केलेल्या चुकीच्या व्यवहारांची माहिती घेण्यासाठी जाणार
सोमवारी अलिबाग येथे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रश्मी ठाकरे यांच्या नावाने घेतलेल्या बेनामी मालमत्तेची चौकशी करण्यासाठी जाणार
राष्ट्रवादी समर्थकांचा विरोध
राष्ट्रवादीचे आमदार हसन मुश्रीफ यांच्यावर गेल्या दोन-तीन दिवसापूर्वी किरीट सोमय्या यांनी भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत. तसेच त्यांच्या विरोधात पुरावे गोळा करण्यासाठी आणि तक्रार दाखल करण्यासाठी ते कोल्हापूरला जाणार होते. या पार्श्वभूमीवर हसन मुश्रीफ यांच्या समर्थकांनी किरीट सोमय्या यांना कोल्हापुरात येण्यास मज्जाव केला होता. तसेच प्रक्षोभक वक्तव्येही केली आहेत.
पोलिसांनी घेतलं ताब्यात
या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी यांनी किरीट सोमय्या यांना कोल्हापूर जिल्ह्यात येऊ नये म्हणून नोटीस दिली होती. तरीही, किरीट सोमय्या हे महालक्ष्मी एक्सप्रेसमधून मुंबईतून कोल्हापूरकडे रविवारी रात्री रवाना झाले होते. पण, सोमवारी पहाटे साडेचार वाजण्याच्या सुमारास कराड येथील पोलिसांनी कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, म्हणून ताब्यात घेतलेले आहे. यावेळी ओगलेवाडी येथील रेल्वे स्थानकावर दोनशेहून अधिक पोलिसांचा बंदोबस्त होता. भाजप जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर, कराड शहराध्यक्ष एकनाथ बागडे यांच्यासह भाजपचे कार्यकर्ते ओगलेवाडी येथील रेल्वे स्टेशन उपस्थित होते. किरीट सोमय्या यांना पोलीस बंदोबस्तात त्यांना ताब्यात घेऊन येथील शासकीय विश्रामगृहाकडे नेण्यात आले आहे.