‘किर्णास’ने नोंदले तब्बल सव्वा लाख भूकंप !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2021 04:38 AM2021-04-25T04:38:27+5:302021-04-25T04:38:27+5:30
कऱ्हाड : कोयना विभागात १९६७ ला ६.६ रिश्टर स्केलचा शक्तिशाली भूकंप झाला होता. त्यानंतर आजपर्यंत या विभागात एवढ्या मोठ्या ...
कऱ्हाड : कोयना विभागात १९६७ ला ६.६ रिश्टर स्केलचा शक्तिशाली भूकंप झाला होता. त्यानंतर आजपर्यंत या विभागात एवढ्या मोठ्या तीव्रतेचा भूकंप झाला नसला तरी येथील ‘किर्णास’ भूकंपमापन वेधशाळेत लहानमोठे तब्बल सव्वा लाख धक्के नोंदले गेलेत.
महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी समजल्या जाणाऱ्या कोयना धरणाची निर्मिती झाल्यानंतर सुरक्षिततेच्या दृष्टीने येथे भूकंपमापन वेधशाळा उभारण्यात आली. राज्य शासनाच्या अखत्यारित असलेल्या या वेधशाळेत प्रादेशिक भूकंपांची नोंद घेतली जाते. या वेधशाळेतील नोंदीनुसार गत ५८ वर्षांत सव्वा लाखावर भूकंपांची नोंद झाली आहे. या भूकंपांचा केंद्रबिंदू कोयना तसेच वारणा खोऱ्यामध्ये आहे. मात्र, कोयना खोऱ्यात केंद्रबिंदू असलेल्या भूकंपांपेक्षा वारणा खोऱ्यात केंद्रबिंदू असलेल्या भूकंपांची संख्या अधिक असल्याचे समोर आले आहे. तसेच वारणा खोऱ्यात केंद्रबिंदू असलेल्या भूकंपांची तीव्रताही जास्त असल्याचे त्या-त्या वेळच्या नोंदीवरून दिसून येते. ११ डिसेंबर १९६७ पासून सांगली जिल्ह्यातील चांदोली व कोयना विभागात खऱ्या अर्थाने भूकंपांची मालिका सुरू झाली. तेव्हापासून आजपर्यंत या दोन्ही खोऱ्यांना अनेक धक्के बसलेत. मात्र, गत दहा वर्षांत झालेल्या भूकंपांपैकी एकच भूकंप ५ रिश्टर स्केलपर्यंत नोंदला गेला आहे. हा भूकंप २०१२ ला झाला होता. तसेच त्याचा केंद्रबिंदू वारणा खोऱ्यात होता. या भूकंपाने त्यावेळी वित्तहानीही झाली होती.
- चौकट
दहा वर्षांतील भूकंप
२०११ : ६१८
२०१२ : १,१४०
२०१३ : ४०३
२०१४ : ४०२
२०१५ : २५३
२०१६ : २७
२०१७ : ३५
२०१८ : ४०
२०१९ : ४४
२०२० : १४८
- चौकट
हेळवाकपासून दक्षिणेला वारणा खोरे
कोयना नदी पाटण तालुक्यातील हेळवाकपर्यंत येऊन तेथून ९० अंशामध्ये कऱ्हाडकडे वळते. तेथून दक्षिणेकडील भाग हा वारणा खोरे म्हणून ओळखला जाता, तर उत्तरेकडे कोयना खोरे सुरू होते. मळे, कोळणे, पाथरपुंज, नाव, मोरगिरी खोरे, चांदोली, सिद्धेश्वर, चांदेल, पांढरपाणी यासह चांदोलीचा भाग वारणा खोऱ्यात येतो, तर कोयना खोऱ्याने सातारा जिल्ह्यातील बहुतांश भाग व्यापला आहे.
- चौकट
किर्णास का म्हणतात?
कोयनेला १९६७ ला विनाशकारी भूकंप झाला. त्यावेळी रशिया बनावटीचे ‘किर्णास’ हे त्याकाळचे अत्याधुनिक यंत्र कोयना वेधशाळेला देण्यात आले होते. त्या यंत्रावरूनच पुढे या वेधशाळेला ‘किर्णास’ हे नाव पडल्याचे सांगितले जाते.
- चौकट
१९६३ ते २०२० अखेर...
१,२१,१३७ : एकूण भूकंप
१,१९,३७३ : ३ रिश्टर स्केलपेक्षा कमी (अति सौम्य)
१,६५९ : ३ ते ४ रिश्टर स्केल (सौम्य)
९६ : ४ ते ५ रिश्टर स्केल (मध्यम)
९ : ५ रिश्टर स्केलपेक्षा जास्त (तीव्र )
- चौकट
कोयनेच्या भूकंपमापन वेधशाळेत ३२ चौरस किलोमीटर परिसरातील भूकंपांची नोंद घेतली जाते. या वेधशाळेत मी पस्तीस वर्षे काम केले आहे. सुरुवातीच्या कालावधीतील भूकंपाचा केंद्रबिंदू कोयना खोऱ्यात असायचा. मात्र, गत काही वर्षांपासून हा केंद्रबिंदू वारणा खोऱ्याकडे सरकला आहे.
- डी. एम. चौधरी
सेवानिवृत्त संशोधन सहायक
फोटो : २४केआरडी०१
कॅप्शन : प्रतीकात्मक